तवेरा उलटून ११ जण जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2019 21:55 IST2019-01-19T21:55:06+5:302019-01-19T21:55:43+5:30
साक्षगंध आटोपून परतणारी तवेरा कार उलटून झालेल्या अपघातात ११ जण जखमी झाले. हा अपघात तालुक्यातील खापा येथे शुक्रवारी रात्री ११.१५ वाजताच्या सुमारास घडला. तवेरा कारची चारही चाके वर झाली. मात्र सुदैवाने यात प्राणहानी झाली नाही.

तवेरा उलटून ११ जण जखमी
लोकमत न्यूज नेटवर्क
तुमसर : साक्षगंध आटोपून परतणारी तवेरा कार उलटून झालेल्या अपघातात ११ जण जखमी झाले. हा अपघात तालुक्यातील खापा येथे शुक्रवारी रात्री ११.१५ वाजताच्या सुमारास घडला. तवेरा कारची चारही चाके वर झाली. मात्र सुदैवाने यात प्राणहानी झाली नाही.
नागपूर येथे साक्षगंधाचा कार्यक्रम शुक्रवारी आयोजित होता. तालुक्यातील विहिरगाव येथील मोहतुरे कुटुंब यात सहभागी झाले होते. रात्री साक्षगंध आटोपून एमएच ३६ एच ५८४० या कारने ते परतत होते. तुमसर येथे काही नातेवाईकांना सोडायला जात असताना खापा जवळ एका दुचाकीस्वाराला वाचविताना तवेरा कारच्या चालकाने ब्रेक मारले. त्यामुळे वाहन अनियंत्रीत होऊन चारही चाके वर झाली.
या अपघातात चांगो मोहतुरे (७८), सुमनबाई मोहतुरे (७५), सरला मोहतुरे (३५), संगीता मोहतुरे (४८), सारिका पडोळे (५५), कुणाल मोहतुरे (२८), ऋषभ मोहतुरे (२२), उत्कर्ष मोहतुरे (१०), राघव मते (२) सर्व राहणार विहिरगाव आणि चालक गणेश बोंद्रे रा.चिंचखेड अशी जखमींची नावे आहेत. अपघातानंतर जखमी वाहनात अडकले होते. मोठमोठ्याने आवाज देत होते. त्यावेळी खापा येथील लिलाधर वाडीभस्मे त्या ठिकाणी धावून गेले. त्यांनी रस्त्यावरून धावणाऱ्या वाहनांकडे मदत मागितली. मात्र कुणीही थांबत नव्हते. त्यावेळी गजानन सेलोटकर कुटुंबियांसह नागपूर येथून येत होते. त्यांनी आपल्या नातेवाईकांना खाली उतरवून जखमींना तात्काळ तुमसरच्या रुग्णालयात दाखल केले.