लेखापालाविना कोट्यवधींचा व्यवहार

By Admin | Updated: January 12, 2016 00:38 IST2016-01-12T00:38:16+5:302016-01-12T00:38:16+5:30

येथील तहसील कार्यालयात लेखापालाविनाच कोट्यवधींचे व्यवहार सुरू असल्याचे दिसून येत आहे.

Transaction of multi-billionaire without account | लेखापालाविना कोट्यवधींचा व्यवहार

लेखापालाविना कोट्यवधींचा व्यवहार

तहसीलचा कारभार : पैसे वाटपात उडतो नेहमीच गोंधळ
तुमसर : येथील तहसील कार्यालयात लेखापालाविनाच कोट्यवधींचे व्यवहार सुरू असल्याचे दिसून येत आहे.
संजय गांधी निराधार योजना पुरवठा विभाग, नैसर्गिक आपत्ती विभाग, शासनाच्या विविध मदत पॅकेजसह शासनाच्या विविध योजना तहसील कार्यालयामार्फत राबविल्या जातात. त्यासाठी दर महिन्यात लाखोंचा, तर वर्षभरात १३ ते १४ कोटींचा व्यवहार केला जातो. सदर व्यवहार सद्यस्थितीत दहावी व बारावी उत्तीर्ण असलेल्या कनिष्ठ कर्मचाऱ्यांमार्फत केला जात आहे. त्यामुळे या व्यवहाराबाबत अनेक प्रश्न निर्माण होत आहे.
इतर शासकीय कार्यालयात अशा प्रकारच्या व्यवहारासाठी लेखापालाची नियुक्ती केली जाते. मात्र येथील तहसील कार्यालयात एवढ्या मोठ्या व्यवहारासाठी लेखापाल नसल्याने कोट्यवधी रूपयांचे व्यवहार लेखापालाविनाच करण्यात येत आहे. त्यामुळे कनिष्ठ कर्मचाऱ्यांवर सदर व्यवहाराचा ताण येत आहे. या व्यवहारात तहसीलचीही कसोटी लागत आहे. सदर प्रकार एकट्या तुमसर तहसील कार्यालयात नसून जिल्ह्यात व राज्यात असाच प्रकार सुरू असल्याचे सांगण्यात येते.
संजय गांधी निराधार योजनेत दर महिन्याला लाखोंचा व्यवहार होतो. लाभार्थ्यांना लाखो रूपयांचे वाटप करण्यात येते. पुरवठा विभागातही लाखो रूपयांचे व्यवहार करण्यात येतात. नैसर्गिक आपत्ती विभागातही अनेकदा लाखोंचे लाभार्थ्यांना वाटप करण्यात येते. पॅकेजअंतर्गत शेतकऱ्यांना लाखो रूपयांचा मदत निधी देण्याचे कामही तहसील प्रशासनातर्फे कधी-कधी करण्यात येते. अशावेळी शेतकऱ्यांच्या मदत निधीच्या यादीत कधी नावच नसते, तर कधी ज्यांच्या नावाने धनादेश निघातो, तो शेतकरी मरण पावलेला असतो. (तालुका प्रतिनिधी)

लाभार्थ्यांची ओरड, निधी वाटपात गोंधळ
अनेकदा योग्य लाभार्थ्याला मदत पोहोचत नसल्याची ओरड प्रत्येकवेळी होत असते. तथापि जी यंत्रणा हे काम बघते, त्यांच्याकडे पुरेसा शिक्षित कर्मचारी वर्ग नसल्याची बाब समोर येते. ज्यांची कुवत नाही, अशा कर्मचाऱ्यांना सदर कामे दिली जातात व यामध्ये गोंधळ निर्माण होतो. दरवर्षी तहसील प्रशासनातर्फे १३ ते १४ कोटींचे व्यवहार होतात आणि तेही लेखापालाविनाच. महसूल प्रशासन इतर विभागाला व्यवहाराबाबत धारेवर धरते. मात्र त्यांच्याच कार्यालयामार्फत होणाऱ्या व्यवहारात सुत्रबद्धता नसल्याने प्रश्न निर्माण झाला आहे. योग्य लाभार्थ्यांना मदत पोहोचत नसल्याची ओरड हा प्रकार सर्वत्रच सुरू
येथील तहसील कार्यालयाप्रमाणेच हा प्रकार इतरत्र सुरू असल्याची माहिती आहे. त्यामुळे कोट्यवधी रूपयांच्या निधी वाटपात गोंधळ उडून दिरंगाई होण्याची शक्यता आहे. बरेचदा यात गैरप्रकार होण्याचीही शक्यता आहे. त्यामुळे कर्तव्यदक्ष लेखापालाची नियुक्ती करण्याची आवश्यकता आहे.

तहसील कार्यालयातील आर्थिक व्यवहाराची वार्षिक तपासणी होते. जरी या व्यवहारावर नियंत्रणासाठी लेखाधिकाऱ्याची नेमणूक नसली तरी नायब तहसीलदार हे सक्षम अधिकारी असल्याने त्यांच्यावर ही अतिरिक्त जबाबदारी असते.
- डी. टी. सोनवाने,
तहसीलदार, तुमसर.

Web Title: Transaction of multi-billionaire without account

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.