कोरोना संसर्गाच्या भीतीने चांदपुरात पर्यटकांची पाठ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2021 04:35 IST2021-04-08T04:35:23+5:302021-04-08T04:35:23+5:30
चुल्हाड ( सिहोरा ) : कोरोना विषाणू संसर्गाचा वाढता धोका लक्षात घेता राज्य शासनाने ब्रेक द चेन राबविण्यात सुरुवात ...

कोरोना संसर्गाच्या भीतीने चांदपुरात पर्यटकांची पाठ
चुल्हाड ( सिहोरा ) : कोरोना विषाणू संसर्गाचा वाढता धोका लक्षात घेता राज्य शासनाने ब्रेक द चेन राबविण्यात सुरुवात केली आहे. रात्रीची संचारबंदी आणि दिवसा जमावबंदी लागू केली आहे. कोरोना संसर्ग विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावाने चांदपूरच्या ग्रीन व्हॅली पर्यटन स्थळात पर्यटकांनी आधीच पाठ फिरवली आहे. जागृत हनुमान देवस्थान आठवड्यातून दोन दिवस बंद ठेवण्यात येणार असल्याची माहिती ट्रस्टचे सचिव तुलाराम बागडे यांनी दिली आहे.
राज्यात कोरोना विषाणू संसर्गाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता सरकारने ब्रेक द चेन राबविण्यात सुरुवात केली आहे. यात कडक नियम लागू करण्यात आले आहेत. मास्क व सोशल डिस्टन्सिंगचे पालन बंधनकारक करण्यात आले आहेत. परंतु ग्रामीण भागात नियमांचे नागरिक फज्जा उडवीत असल्याचे दिसून येत आहेत. गर्दीचे ठिकाण ठरणारे आठवडे बाजार बंद करण्यात आले असले तरी या गर्दीची उणीव अन्य व्यावसायिक भरुन काढत आहे. भंडारा जिल्ह्यात कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव वाढत असल्याची चर्चा नजीकच्या मध्यप्रदेशातील गेली. त्यामुळे पर्यटकांनी पाठ फिरवली आहे. लॉकडाऊन घोषित होण्याचे आधीच पर्यटन स्थळात येणे बंद केले आहेत. यामुळे पर्यटन स्थळात शुकशुकाट असल्याचे दिसून येत आहेत. पर्यटन स्थळात गावातील बेरोजगार तरुणांनी रोजगार शोधण्यासाठी दुकाने थाटले आहेत. परंतु कोरोना विषाणूच्या संसर्ग प्रादुर्भावाने व्यावसायिकाचे सत्यानाश केला आहे. यामुळे व्यवसाय चौपट झाले आहेत. या आधी व्यवसायावर उतरती कळा आली होती, नंतर त्यांनी सावरण्याचा प्रयत्न केला आहे. पुन्हा कोरोना विषाणू संसर्गाने डोके वर काढले आहे.
चांदपुरात असणाऱ्या जागृत हनुमान देवस्थानात एरवी भाविकांची गर्दी राहत आहे. परंतु जिल्ह्यातील शहर व ग्रामीण भागात कोरोना विषाणू संसर्गाचे रुग्ण वाढत असल्याचे कारणावरून भाविकांच्या संख्येत घट झाली आहे. देवस्थान परिसरात सुरुवातीपासून कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नियमांचे पालन करण्यात येत आहे. ब्रेक द चेन अंतर्गत पुन्हा नियम लागू करण्यात आले आहेत. या नियमाची अंमलबजावणी देवस्थान ट्रस्ट करणार आहेत. देवस्थान बंद करण्याचे दिशा निर्देश प्राप्त झाले नाहीत. असे असले तरी शासनाच्या निर्देशाचे पालन करण्यात येणार असल्याचे ट्रस्टच्या वतीने सांगण्यात येत आहे. शनिवार व रविवार असे दोन दिवस लॉकडाऊन घोषित होताच देवस्थान बंद ठेवण्यात येणार असल्याची माहिती ट्रस्टचे सचिव तुलाराम बागडे यांनी दिली आहे.