अभयारण्यामुळे ‘ढिवरधुटी’त पर्यटकबंदी

By Admin | Updated: July 21, 2014 23:41 IST2014-07-21T23:41:30+5:302014-07-21T23:41:30+5:30

ढिवरधुटी पर्यटन स्थळाचा समावेश उमरेड कऱ्हांडला अभयारण्याच्या पवनी वन्यजीव परिक्षेत्रातील जंगलात करण्यात आलेला आहे. त्यामुळे या जंगलात विना परवानगीने प्रवेश करण्यावर बंदी

Tourism Banis in 'Dhivardhuti' due to the sanctuary | अभयारण्यामुळे ‘ढिवरधुटी’त पर्यटकबंदी

अभयारण्यामुळे ‘ढिवरधुटी’त पर्यटकबंदी

गोसेबुज : ढिवरधुटी पर्यटन स्थळाचा समावेश उमरेड कऱ्हांडला अभयारण्याच्या पवनी वन्यजीव परिक्षेत्रातील जंगलात करण्यात आलेला आहे. त्यामुळे या जंगलात विना परवानगीने प्रवेश करण्यावर बंदी घालण्यात आलेली आहे. त्यामुळे यावर्षीपासून ढिवरधुटीकडे जाण्यासाठी पर्यटकांना प्रवेश बंदी करण्यात आली आहे. परिणामी पर्यटकांमध्ये निराशा पसरली आहे.
पवनी पासून नऊ किलोमीटर अंतरावर खापरी कोरंभीच्या डोंगरामध्ये ढिवरधुटी हा नैसर्गिक धबधबा आहे. माध्यमांच्या पाठपुराव्यामुळे लुप्त झालेले हे पर्यटनस्थळ जनतेच्या नजरेत आले. मागील सात वर्षात हजारो पर्यटकांनी या पर्यटनस्थळाला भेट दिली आहे. पर्यटकांनी या निसर्गरम्य परिसराचा स्वच्छंदपणे आनंद घेतला. ढिवरधुटीचा धबधबा पर्यटकांसाठी पर्वणी असल्यामुळे जुलै, आॅगस्ट व सप्टेंबर या तीन महिन्यात हजारोच्या संख्येने पर्यटक दुरवरून येत असतात.
३० फूट उंचीवरून ढिवरधुटी सुदृढ खोलगट भागात पडणाऱ्या जलधारेचे दृश्य व सभोवताल असलेले डोंगर व त्यावरील वनराजी पर्यटकांचे आकर्षणाचे केंद्र आहे. कोरंभी महादेव मंदिरासमोर पोहचल्यानंतर डावीकडे जंगलात जाणाऱ्या मार्गाने काही अंतरावर उजवीकडे जंगलातील मालाई तलावाकडे जाणारा मार्ग आहे. या तलावाच्या पाळीवरून सुमारे तीन कि़मी. अंतरापर्यंत पायी चालत जावे लागते. ढिवरधुटीपासून तलावापर्यंत वाहत आलेल्या झऱ्याचे आता ओढ्यात रूपांतर झाले आहे. तीन किलोमीटर पायी चालल्यानंतर आलेला थकवा ढिवरधुटीचे मनोहारी सांैदर्य पाहून नाहिसा होतो.
परंतु, ढिवरधुटी पर्यटन स्थळाचा समावेश उमरेड कऱ्हांडला अभयारण्याच्या पवनी वन्यजीव परिक्षेत्रातील जंगलात करण्यात आलेला आहे. त्यामुळे या जंगलात विना परवानगीने प्रवेश करण्यावर बंदी घालण्यात आलेली आहे. त्यामुळे यावर्षीपासून ढिवरधुटीकडे जाण्यासाठी पर्यटकांना प्रवेश बंदी करण्यात आली आहे. यासंदर्भात वनक्षेत्राधिकारी व्ही.जे. गायकवाड यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी पर्यटकांना बंदी घालण्यात आल्याचे ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.
पावसाळ्यात ढिवरधुटी पर्यटनक्षेत्रात पर्यटकांना प्रवेशबंदी केल्यामुळे ढिवरधुटी पाहणाऱ्या हजारो पर्यटन प्रेमीमध्ये निराशा पसरली आहे. अभयारण्य विभागाने ढिवरधुटीचा विकास करून पावसाळ्यात पर्यटकांना प्रवेश देण्यावर विचार केल्यास पूर्व विदर्भात ढिवरधुटी हे पर्यटनस्थळ म्हणून समोर येईल, यात शंका नाही.

Web Title: Tourism Banis in 'Dhivardhuti' due to the sanctuary

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.