...अन् 'ते' मृत्यूच्या जबड्यातून परतले; गावकऱ्यांमुळे तिघांचे प्राण वाचले
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 25, 2020 16:24 IST2020-01-25T16:23:42+5:302020-01-25T16:24:17+5:30
झुडूपात लपून बसलेल्या वाघाची मोटरसायकलवर झडप

...अन् 'ते' मृत्यूच्या जबड्यातून परतले; गावकऱ्यांमुळे तिघांचे प्राण वाचले
चुल्हाड (भंडारा ) : राज्यमार्गावरुन जाणाऱ्या मोटरसायकलवर झडप घालून पट्टेदार वाघाने केलेल्या हल्ल्यात तीन जण जखमी झाल्याची घटना तुमसर तालुक्याच्या बिनाखी शिवारात शनिवारी सकाळी ११ वाजता घडली. वाघाला वेळीच पळवून लावण्यात गावकऱ्यांना यश आल्याने तिघांचे प्राण वाचले.
तुमसर तालुक्याच्या सिहोरा परिसरात गेल्या आठ दिवसांपासून पट्टेदार वाघाचा वावर आहे. तीन दिवसांपूर्वी एका वाघाचे दर्शन गावकऱ्यांना झाले होते. तेव्हापासून परिसरात भीतीचे वातावरण आहे. दरम्यान शनिवारी तुमसर - बपेरा राज्य मार्गावरुन सकाळी ११ वाजता मोटरसायकलवरुन दोन जण जात होते. बिनाखी शिवारात रस्त्यालगत झुडुपात लपून बसलेल्या वाघाने मोटरसायकलवर अचानक झडप घातली. त्यात छोटेलाल ठाकरे (रा. गोंदेखोरी) व शंकरलाल तुरकर (रा. मिरगपूर, मध्यप्रदेश) जखमी झाले. वाघ दिसल्याची माहिती होताच परिसरातील नागरिकांनी वाघ बघण्यासाठी धाव घेतली. त्यावेळी विजय शहारे (रा. शिंदपुरी) यांच्यावर वाघने हल्ला केला. त्यांच्या पोटाला वाघने जबर चावा घेतला. नागरिक धावून गेल्याने वाघ शेतशिवारात पळून गेला. जखमींना सीहोरा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घटना स्थळावर पोलीस व वन विभागाचे पथक दाखल झाले आहे.