‘त्या’ लाकडांची लावली परस्पर विल्हेवाट!
By Admin | Updated: August 27, 2016 00:19 IST2016-08-27T00:19:41+5:302016-08-27T00:19:41+5:30
नगरपालिका हद्दीतील भंडारा वनविभागाच्या विभागीय कार्यालय व वनपरिक्षेत्राधिकारी कार्यालयातील सागवान व आडजात वृक्षांची कत्तल केली.

‘त्या’ लाकडांची लावली परस्पर विल्हेवाट!
कनिष्ठांवर दबावतंत्र : प्रकरण परवानगीविना वृक्षतोडीचे
प्रशांत देसाई भंडारा
नगरपालिका हद्दीतील भंडारा वनविभागाच्या विभागीय कार्यालय व वनपरिक्षेत्राधिकारी कार्यालयातील सागवान व आडजात वृक्षांची कत्तल केली. या वृक्षतोडीला परवानगीच मिळाली नसल्याचे वृत्त ‘लोकमत’मध्ये प्रकाशित झाले. यामुळे यात दोषी असलेल्या वनाधिकाऱ्यांनी स्वत:ला वाचविण्यासाठी कनिष्ठ कर्मचाऱ्यांवर दबावतंत्र सुरू केला असून कागृदपत्रांची जमवाजमव सुरू केली आहे.
वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी कार्यालयाचे विस्तारीकरण करण्याच्या नावावर येथील वनविभगाच्या विभागीय व वनपरिक्षेत्र कार्यालयाच्या आवारातील सागवान व आडजात वृक्षांची आॅक्टोंबर व नोव्हेंबर महिन्यात तोड केली. या बाबीला आता दहा महिन्यांचा कालावधी लोटला असतानाही तोडलेल्या वृक्षांपैकी केवळ ११ सागवान व एक जांभूळ वृक्षाची कटाई करण्याची परवानगी नगरपालिका प्रशासनाने दिली होती. उर्वरित ८० सागवान व १२९ आडजात वृक्षांना तोडण्याची परवानगी नसतानाही त्यांची परवानगीविनाच तोड करण्यात आल्याचा गंभीर प्रकार समोर आला.
दहा महिन्यापूर्वी या दोन्ही कार्यालय परिसरातील मोठ्या प्रमाणात वृक्ष कटाई करण्यात आली आहे. ऐवढे दिवस वृक्ष कटाई करण्याची परवानगी पालिकेकडून मिळालेली नसतानाही वनविभाग चूप्पी साधून होता. यावरून तोडलेल्या लाकडांपैकी अनेक लाकडांची अफरातफर करण्यासाठीच वनाधिकाऱ्यांनी पालिकेकडून परवानगी घेण्यास पुढाकार घेतला नसल्याचे आता वनकर्मचाऱ्यांमध्ये बोलले जात आहे. एखाद्या नागरिकांनी त्यांच्या अखत्यारितील सागवान वृक्षाची तोड केल्यास वनविभाग ताबडतोब कारवाईसाठी धावतो. येथे मात्र, वनविभागानेच वृक्षतोड केल्याने वनाधिकाऱ्यांवर आता कोण कारवाई करेल असा प्रश्न उपस्थित होत आहे.
वृक्षतोडीनंतर घेतली परवानगी
वनाधिकाऱ्यांनी परवानगी न घेता १२ वृक्षांची तोड केली. ही बाब त्यांच्या लक्षात येताच त्यांनी वृक्ष कटाईनंतर पालिकेकडे वृक्ष कटाईची परवानगी मागितली. मात्र ही परवानगी त्यांना वृक्ष कटाईच्या पूर्वीच्या तारखेत हवी असल्याने पालिका व वनाधिकाऱ्यांच्या संगणमताने मागील तारखेत परवानगी दिल्याचे कागदपत्र तयार करण्यात आले. यावरूनच वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी पहिल्या वृक्ष कटाईतून स्वत:ला वाचविले असले तरी, उर्वरित वृक्ष कटाईतूनही वाचण्यासाठी खटाटोप सुरू आहे.
मी नव्याने रूजू झालेलो आहे. परवानगीबिना वृक्ष कटाई केली असल्यास या गंभीर प्रकरणी दोषींवर कारवाई करण्याच्या दृष्टिने या प्रकरणाची सविस्तर माहिती घेतो. परवानगी नसल्यास कारवाई होईल.
- उमेश वर्मा,
उपवनसंरक्षक भंडारा