‘त्या’ १८ जिगरबाजांचे सहा तास शर्थीचे प्रयत्न
By Admin | Updated: August 16, 2014 23:17 IST2014-08-16T23:17:22+5:302014-08-16T23:17:22+5:30
चार दिवसांपूर्वी वैनगंगा नदीच्या लहान पुलावरुन नदीपात्रात कोसळलेली कार शोधण्यासाठी अनेक निष्णात आणि पट्टीचे पोहणाऱ्यांनी जीवापाड मेहनत घेतली. त्यांच्या प्रयत्नांना अपयश आल्यानंतर

‘त्या’ १८ जिगरबाजांचे सहा तास शर्थीचे प्रयत्न
नंदू परसावार - भंडारा
चार दिवसांपूर्वी वैनगंगा नदीच्या लहान पुलावरुन नदीपात्रात कोसळलेली कार शोधण्यासाठी अनेक निष्णात आणि पट्टीचे पोहणाऱ्यांनी जीवापाड मेहनत घेतली. त्यांच्या प्रयत्नांना अपयश आल्यानंतर खमारी येथील १८ जिगरबाज तरुणांनी प्रयत्नांची पराकाष्ठा करीत नदीपात्रातील रेतीत घट्ट फसून असलेली कार शोधून काढली.
मंगळवार दि.१२ आॅगस्ट रोजी रात्री ९ वाजताच्या सुमारास भरधाव कार पुलावरुन नदीत कोसळली. त्यानंतर बेपत्ता कारचे शोधकार्य सुरू होते. प्रारंभी पोलिसांनी गोताखोरांची मदत घेऊन कार शोधली परंतु त्यांना सापडली नाही. त्यानंतर जिल्हा प्रशासनाने नागपूर महानगर पालिकेचे आपत्ती व्यवस्थापन तज्ज्ञांना बोलावून कारचा शोध घेतला. परंतु, त्यांनाही कार आढळून आली नाही. त्यानंतर शुक्रवारला खमारी येथील मत्स्यपालन सहकारी संस्थेच्या सदस्यांना बेपत्ता कार शोधण्यासाठी सांगण्यात आले.
सकाळी १२ वाजतापासून या जिगरबाज तरुणांनी संस्थेच्या मालकीचे लाकडी डोंगे आणून शोधकार्य सुरू केले. दरम्यान, दुपारी १.३० वाजताच्या सुमारास शेखर वानाजी चांदेकर या ३० वर्षीय तरुणाच्या हाताला कारचा स्पर्श झाला. कारच आहे कां? याची चाचपणी करण्यासाठी त्याने आणखी एकदा खोल पाण्यात शिरला असता कारच्या समोरचे काच फुटून मृतकाचा एक पाय बाहेर असल्याचे त्याला दिसले. कार आणि कारमध्ये मृतक असल्याची खात्री पटताच त्याने ही माहिती सहकाऱ्यांना दिली.
त्याच्या पाठोपाठ कुसन मेश्राम, प्रकाश चांदेकर, युवराज मेश्राम, धनराज मेश्राम, गोपीचंद केवट, इस्तारी मेश्राम, दिलीप मेश्राम, बबन मेश्राम, रामू मेश्राम, उमराव मेश्राम, कैलास चांदेकर, प्रभाकर मेश्राम, हरीश्चंद्र मेश्राम, स्वप्नील मेश्राम, जितेंद्र शेंडे, राकेश केवट, शैलेश भुरे, सुरेश चंदनबटवे आणि शेरु भुरे यांनी पाण्यात कार असल्याचे बघितले. २५ ते ३० फूट खोल पाण्यात फसलेल्या या कारची तीन चाके रेतीत फसून होती तर एक चाक वर दिसत होते.
समोरच्या काचातून मृतकाचा डावा पाय काच फोडून बाहेर होता, असे त्यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. त्यानंतर कारला बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू झाले. परंतु कार रेतील इतकी घट्ट फसून होती की, कारला बाहेर काढण्यासाठी हुक कुठे अडकवायचा त्यासाठी जागा मिळत नव्हती. दोरखंडाने बांधून काढण्याचा प्रयत्न केला असता दोरखंड तुटला. अखेर लोखंडी साखळीच्या सहाय्याने कारला हुक अडकविण्यात आला. हा हुक तीनदा निसटला. हुक अडकताच क्रेनच्या साहाय्याने कार बाहेर काढण्यासाठी नागपूर केंद्रीय आपत्ती नियंत्रण पथकाने पुढाकार घेतला. तरीसुद्धा कार शोधणे आणि बाहेर काढणे यासाठी सहा तासांपेक्षा अधिक तास या जिगरबाज तरुणांना शर्थीचे प्रयत्न करावे लागले. त्यानंतर पोलिसांनी कारमधून मृतदेह बाहेर काढला. आज या तरुणांची भेट घेतली असता ते म्हणाले, कारच्या समोरील भागाच्या डाव्या बाजुचा टायर फुटला होता. पुलावरच टायर फुटल्यामुळे कार नदीत कोसळली असावी, असे या मदत कार्यातील सुरेश चंदनबटवे व तरुणांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.