जुन्या वैमनस्यातून काढला काटा, युवकाची हत्या करून मृतदेह जाळला

By गोपालकृष्ण मांडवकर | Updated: March 30, 2024 13:43 IST2024-03-30T13:42:18+5:302024-03-30T13:43:32+5:30

केसलवाडा-गराडा शेतशिवाराजवळील घटना.

thorn removed from an old enmity the youth was killed and the body burned | जुन्या वैमनस्यातून काढला काटा, युवकाची हत्या करून मृतदेह जाळला

जुन्या वैमनस्यातून काढला काटा, युवकाची हत्या करून मृतदेह जाळला

गोपालकृष्ण मांडवकर, लोकमत न्यूज नेटवर्क, भंडारा : लाखनी तालुक्यातील केसलवाडा-गराडा शेतशिवाराजवळ एका ३२ वर्षीय युवकाची हत्या करून मृतदेह जाळल्याची खळबळजनक घटना शनिवारी सकाळी उघडकीस आली आहे. श्रीकांत माधव हटवार (३२) असे मृताचे नाव असून तो मुरमाडी (सावरी) येथील रहिवासी आहे.

पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहीतीनुसार, जुन्या भंडणातून श्रीकांतची हत्या करण्यात आली. या हत्येमध्येलाखनी येथील आनंद टेंभुर्णे (४०) याच्यासह वेदांत जांभुळकर व पियुष मेश्राम या दोन अल्पवयीनांचा समावेश आहे. जुन्या भांडणातून संगनमताने श्रीकांतची हत्या करून नंतर पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह जाळला.

ही घटना २९ मार्चला रात्री ९ वाजता दरम्यान घडली. श्रीकांतचे आनंद टेंभुर्णे यांच्यासोबत जुने भांडण होते. त्याबाबतची तक्रार लाखनी पोलिस स्टेशनला करण्यात आली होती. तेव्हापासून दोघेही एकमेकांचे कट्टर वैरी झाले होते. याच वैमनस्यातून आनंदने आपल्या मित्रांना सोबत घेवून हत्येचा कट रचला. त्याची हत्या करून मृतदेहाला जाळून पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला.

फिर्यादी सचिन हटवार याच्या तक्रारीवरून लाखनी पोलिसांनी आरोपींविरोधात भादंवी कलम ३०२ , २०१ व १२० (ब) अंतर्गत गुन्हा नोंद केला. आनंद टेंभुर्णे याला सकाळी अटक करण्यात आली असून दोन्ही अल्पवयीन आरोपींना ताब्यात घेतले आहे. पुढील तपास ठाणेदार नरेंद्र निस्वादे यांच्या मार्गदर्शनात सहायक पोलिस निरीक्षक सोनवणे करीत आहेत.

Web Title: thorn removed from an old enmity the youth was killed and the body burned