'हा माझा शेवटचा फाेटो, गुडबाय'! संदेश व्हायरल करून युवतीने घेतला जगाचा निरोप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2023 20:28 IST2023-03-08T20:27:53+5:302023-03-08T20:28:15+5:30
Chandrapur News ‘हा माझा शेवटचा फोटो आहे.. गुडबाय’ असा समाज माध्यमावर मेसेज लिहिलेला स्वत:चा फोटो टाकून भंडारा जिल्ह्यातील एका तरुणीने चक्क महिला दिनी म्हणजे ८ मार्च राेजी आत्महत्येचे टोकाचे पाऊल उचलले.

'हा माझा शेवटचा फाेटो, गुडबाय'! संदेश व्हायरल करून युवतीने घेतला जगाचा निरोप
चंद्रपूर : ‘हा माझा शेवटचा फोटो आहे.. गुडबाय’ असा समाज माध्यमावर मेसेज लिहिलेला स्वत:चा फोटो टाकून भंडारा जिल्ह्यातील एका तरुणीने चक्क महिला दिनी म्हणजे ८ मार्च राेजी आत्महत्येचे टोकाचे पाऊल उचलले. बुधवारी सकाळी ८ वाजताच्या सुमारास आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली. गायत्री गजेंद्र रामटेके (२०, रा. कऱ्हांडला, ता. लाखांदूर, जि. भंडारा) असे असे मृत युवतीचे नाव आहे.
तिने आत्महत्येपूर्वी व्हायरल केलेल्या फोटोत तिच्या कपाळावर आणि केसाच्या भांगेत कुंकू लावलेले असल्याचे दिसून येते. आत्महत्येमागील कारणांचा अद्याप उलगडा झालेला नसून चंद्रपूर शहर पोलिस शाेध घेत आहेत. गायत्रीचे आई-वडील आधीच मरण पावले आहेत. ती आणि तिचा भाऊ असे दोघेच कुटुंबात उरले होते. गायत्री स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी चंद्रपूर येथील घुटकाळा परिसरात भाड्याने घर घेऊन राहात होती. तिने समाज माध्यमावर फोटो शेअर केल्यानंतर तिच्या मैत्रिणींनी ‘लग्न झाले का’, अशा कमेंट टाकताच गायत्रीने हा माझा शेवटचा फोटो आहे, असा रिप्लाय दिला. त्यानंतर गुडबाय म्हणत तिने गळफास घेऊन आपली आयुष्य संपविले. जागतिक महिला दिनानिमित्त सर्वत्र महिलांच्या हक्काची लढाई लढण्याचा संकल्प केला जात असताना एका सुशिक्षित मुलीवर आत्महत्या करण्याची वेळ आली. या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.