लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : जिल्ह्याला निसर्गाने मुक्तहस्ते देणगी दिली आहे. वैनगंगेचे अथांग पात्र, हिरवीगार भात शेती, घनदाट जंगल, पितळ कारागिरी, किल्ले, तलाव व मंदिरे हे सर्व मिळून पर्यटनासाठी मोठा वाव असलेला हा जिल्हा आहे. तरीही, योग्य नियोजन व इच्छाशक्तीच्या अभावाने हे वैभव शापित ठरले आहे. जिल्ह्याला आजवर स्वतंत्र पर्यटन आराखडा मिळाला नाही, परिणामतः क्षमता असूनही दुर्दशेमुळे उपेक्षाच सुरू आहे. त्यातल्या त्यात जलपर्यटन हा एक आशेचा किरण सध्या दिसत आहे.
भंडाऱ्याच्या सातही तालुक्यांमध्ये वैशिष्ट्यपूर्ण पर्यटनस्थळे आहेत. गोसेखुर्द प्रकल्पाचे अथांग बॅकवॉटर जलक्रीडा आणि वॉटर स्पोर्टससाठी तितकेच योग्य आहे. नागझिरा व कोका अभयारण्यांत समृद्ध वनसंपदा व जैवविविधता आहे. समृद्ध पवनी, तुमसर व साकोली येथील किल्ले ऐतिहासिक वारसा जपणारे आहेत. चांदपूर, रावणवाडी, पांगडी जलाशय, गिरोला पहाडी असे डोंगर व जलाशय पर्यटनासाठी आदर्श आहेत. शिवाय भृशुंड गणेश मंदिर, नृसिंह टेकडी, आंभोरा आदी स्थळे वैभवात भर घालणारी आहेत.
वैविध्यपूर्ण पर्यटन
धार्मिक पर्यटन : कोरंभी गड, मोहाडी तालुक्यातील चौंडेश्वरी, गायमुख आणि चांदपूर देवस्थान, भंडाऱ्यातील भ्रपुंड गणेश मंदिरसांस्कृतिक पर्यटन : विदर्भाची काशी पवनीतील ६४ मंदिरे, महास्तूप, किल्ला, रूयाळ येथील महासमाधी भूमीऐतिहासिक पर्यटन : अंबर किल्ला, चिंचगड, बावन दरवाजाची कचेरी, भंडाऱ्यातील पांडे महाल, भंडाऱ्यातील गोसावी समाधी मठवन पर्यटन: कोका, उमरेड कन्हांडलाजलपर्यटन : गोसेखुर्द प्रकल्प,रावणवाडी व चांदपूर जलाशय, आंभोरा
पर्यटनातून रोजगार
जिल्ह्यातील पर्यटन व्यवस्थित राबवले गेले तर स्थानिकांसाठी मोठ्या प्रमाणात रोजगारनिर्मिती होऊ शकते. होम-स्टे, गाइड सेवा, हॉटेल व्यवसाय, वाहन सेवा यांना नवा आयाम मिळेल. ग्रामीण भागातील दळणवळणाला वेग येईल.
..या आहेत अडचणी
- वारसा सांगणारे किल्ले, मंदिरे व पांडे महालसारखी प्राचीन वस्तू संवर्धनाअभावी नष्ट होण्याच्या मार्गावर
- निधीची उपलब्धता, रेल्वेसेवा आणि उत्तम मार्गाचा अभाव
- जनप्रतिनिधींचे दुर्लक्ष आणि असंवेदनशील मानसिकता
- स्वच्छता, विश्रामगृहे, मार्गदर्शक, पर्यटक केंद्रे यांसारख्या मूलभूत सुविधांचा अभाव
- मंजूर प्रकल्पांची अंमलबजावणी न झाल्याने पर्यटनस्थळे ओस
पर्यटन विकासासाठी काय करावे?
- स्वतंत्र पर्यटन आराखडा जिल्ह्यासाठी तातडीने तयार करावा. गोसेखुर्द बॅकवॉटर व वैनगंगेवर जलक्रीडा, नौकानयन स्पर्धांचे राज्यस्तरीय आयोजन व्हावे.
- जलपर्यटन प्रकल्पाला तातडीने गती मिळावी आणि योग्य नियोजन व्हावे.
- इको-पर्यटन व साहसी उपक्रमांसाठी जंगल परिसर विकसित करणे; होम-स्टे, पर्यटन माहिती केंद्र, विश्रामगृहे उभारणे, वारसा स्थळांचे जतन, संवर्धन व सांस्कृतिक महोत्सवांचा प्रारंभ, बीओटी तत्त्वावर खासगी गुंतवणूक प्रोत्साहित करणे आदी उपाययोजना राबवाव्या.
"येथील वनक्षेत्र मोठे आहे. वन्यजीवही आहेत. त्यामुळे इको-टुरिझमवर अधिक भर असेल. वन धोरणाच्या अधिन राहून रिसॉर्ट, फार्म हाउस विकासाला गती दिली जाईल. अंभोरा परिसरातील मंदिराचे सुशोभीकरण, होम स्टे विकसित करण्यावर भर असेल. तलावांचा पर्यटनात योग्य उपयोग करून ते देखणे आणि विकसित करणे, स्थानिक उद्योगांना (उदा. पितळी उद्योग, रेशीम उद्योग, हातमाग) वाव देऊन पर्यटनाच्या दृष्टीने इंडस्ट्रियल शॉपिंग विकसित करणे, नदीकाठांचे सौंदर्याकरण करणे या योजना डोळ्यापुढे आहेत. बाहेरून येणाऱ्या पर्यटकाला सहजपणे तीन ते चार दिवस जिल्ह्यात आनंदात घालवता यावे, या दृष्टीने नियोजनाची संकल्पना आहे."- सावनकुमार, जिल्हाधिकारी, भंडारा
"भंडाऱ्याकडे अनमोल निसर्ग संपत्ती आहे; पण दुर्लक्ष व निधीअभावी अनेक स्थळे आज उपेक्षित आहेत. इच्छाशक्ती असेल तर जिल्ह्याचे पर्यटन विकास देशातील यशस्वी मॉडेल ठरू शकते."- मो. सईद शेख, अध्यक्ष, ग्रीन हेरिटेज संस्था
Web Summary : Bhandara, blessed with natural beauty like lakes, forests, and historical sites, lags in tourism due to poor planning and lack of facilities. A dedicated tourism plan and investment are needed to unlock its potential and generate local employment.
Web Summary : भंडारा झील, जंगल और ऐतिहासिक स्थलों जैसी प्राकृतिक सुंदरता से समृद्ध है, लेकिन खराब योजना और सुविधाओं की कमी के कारण पर्यटन में पिछड़ा है। इसकी क्षमता को अनलॉक करने और स्थानीय रोजगार पैदा करने के लिए एक समर्पित पर्यटन योजना और निवेश की आवश्यकता है।