धान खरेदी केंद्रावर बारदाना पोहचला नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 22, 2018 22:22 IST2018-10-22T22:22:09+5:302018-10-22T22:22:22+5:30
आधारभूत धान खरेदी केंद्राला जिल्ह्यात मंजुरी देण्यात आली. केंद्राचे विधिवत उद्घाटन मंत्र्याचे हस्ते करण्यात आले. मात्र तुमसर तालुक्यातील धान खरेदी केंद्रावर अद्यापही बारदाना पोहचला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांचा धान केंद्रावर पडून असून याचा फायदा व्यापाऱ्यांना होण्याची शक्यता आहे.

धान खरेदी केंद्रावर बारदाना पोहचला नाही
लोकमत न्यूज नेटवर्क
तुमसर : आधारभूत धान खरेदी केंद्राला जिल्ह्यात मंजुरी देण्यात आली. केंद्राचे विधिवत उद्घाटन मंत्र्याचे हस्ते करण्यात आले. मात्र तुमसर तालुक्यातील धान खरेदी केंद्रावर अद्यापही बारदाना पोहचला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांचा धान केंद्रावर पडून असून याचा फायदा व्यापाऱ्यांना होण्याची शक्यता आहे.
शासनाने धानाच्या आधारभूत किंमती निश्चित केल्या आहेत. अतिरिक्त बोनसची घोषणासुद्धा केली आहे. धान उत्पादक तुमसर तालुक्यात आधारभूत धान खरेदी केंद्राचे उद्घाटन करण्यात आले. शेतकऱ्यांनी आपला धान विक्रीसाठी केंद्रावर नेला. परंतु अद्यापर्यंत यंत्रणा सक्रीय झाली नाही. वाहनी केंद्रावर शेकडो पोते धान विक्रीसाठी आला आहे. परंतु प्रत्येक्षात बारदाना पोहचलाच नसल्याची माहिती आहे. त्यामुळे अनेक शेतकºयांनी या केंद्राकडे पाठ फिरविली आहे.
प्रशासनाने धान खरेदी करण्याची जय्यत तयारीची घोषणा हवेतच विरल्याचे सुरूवातीलाच दिसत आहे. केंद्र सरकारने धान पिकासाठी आॅनलाईन नोंदणी करण्याची सक्ती केली आहे. त्यामुळेही शेतकऱ्यांची डोकेदुखी वाढली आहे. दुसरीकडे शेतकरी प्रत्यक्ष धान खरेदी सुरू होण्याची प्रतिक्षा करीत आहे.
वाहनी केंद्राबाबत पंचायत समिती सदस्य हिरालाल नागपुरे, अरविंद राऊत, राजेंद्र ढबाले यांनी जिल्हा मार्केटिंग अधिकाऱ्यांनी मोबाईलवर संपर्क साधला. बारदान्याबाबत उत्तर विचारले मात्र त्यांनी उडवाउडवीचे आणि बेजबाबदार उत्तर दिल्याचा आरोप आहे. याविरोधात आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.