धानाचे चुकारे मिळालेच नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 29, 2018 21:59 IST2018-10-29T21:58:50+5:302018-10-29T21:59:06+5:30
जगाचा पोशिंदा म्हणून ओळख असणाऱ्या शेतकऱ्यांची दिवाळी यावर्षीही अंधारात जाणार का, असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे. धान विकल्यानंतरही शेतकऱ्यांना अजूनपर्यंत धानाचे चुकारे मिळाले नाही.

धानाचे चुकारे मिळालेच नाही
लोकमत न्यूज नेटवर्क
साकोली : जगाचा पोशिंदा म्हणून ओळख असणाऱ्या शेतकऱ्यांची दिवाळी यावर्षीही अंधारात जाणार का, असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे. धान विकल्यानंतरही शेतकऱ्यांना अजूनपर्यंत धानाचे चुकारे मिळाले नाही. आतापर्यंत साकोली व विर्शी या आधारभूत धान खरेदी केंद्रावर चार हजार ८४ क्विंटल धानाची खरेदी करण्यात आली. मात्र आठ दिवसांचा कालावधी लोटला तरी एकही रुपया शेतकऱ्यांना मिळाला नाही.
यावर्षी धानाचा हंगाम सुरु झाला तेव्हा अन्न व औषधी प्रशासन मंत्री गिरीश बापट यांनी भंडारा जिल्ह्याला भेट दिली. त्यावेळी जिल्हाधिकारी, मिलर्स असोसिएशन, आधारभूतच्या धान खरेदी केंद्राचे अधिकारी यांची संयुक्तरित्या बैठक घेऊन नवनवीन योजना विषयी माहिती देऊन आधारभूत धान खरेदी केंद्राचे उद्घाटन केले. एवढेच नाही तर धान विकल्यानंतर तीन चार दिवसातच धानाचे पैसे संबंधित शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होतील असेही सांगितले. मात्र तब्बल आठ दिवसाचा कालावधी लोटला तरी एकाही शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा झाले नाही. समोर दिवाळी असल्याने शेतकऱ्यांनी लवकर लवकर धानाचे चुरणे करुन धान विक्रीकरिता आणले. दिवाळीआधी पैसे मिळतील तर तुरळक देणेघेणे आटोपून उर्वरीत पैशाने घरी चांगली दिवाळी साजरी करू. मात्र तसे झालेच नाही. दिवाळी पाचसहा दिवसांवर येऊन ठेपली तरी शेतकऱ्यांजवळ एकही पैसा नाही. त्यामुळे दिवाळी साजरी कशी करायची, असा प्रश्न आहे. आधारभूत केंद्रावरही चुकारे लवकर मिळत नसल्यानेच शेतकरी दलालाकडे कमी किमतीत धान विकत आहे.
इलेक्ट्रॉनिक्स वजनमाप वापरा
आधारभूत धान खरेदी केंद्रावर साध्या काट्याने धान मोजले जाते. त्यामुळे धान जास्त जातात. म्हणून धान मोजणीवेळी इलेक्ट्रॉनिक्स वजन काट्याचा उपयोग करा, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.