जिल्ह्यात काळे, पाखर धान खरेदी करण्याची योजनाच नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 23, 2022 20:53 IST2022-10-23T20:52:56+5:302022-10-23T20:53:32+5:30
संकटाचा सामना करणाऱ्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी प्रत्येक गावात धान खरेदी केंद्र उघडून पाखर धानाला बोनससह खरेदी करणे आवश्यक आहे. मात्र सध्या तरी हा धान खरेदी करण्याचे कोणतेही नियोजन पणन विभागाकडे नाही. सरकारने त्वरित निर्णय घेऊन १९९७-९८च्या धर्तीवर काळा धान खरेदीसाठी मार्गदर्शक तत्त्वे जारी करावीत, अशी मागणी आमदार राजू कारेमोरे यांनी केली आहे.

जिल्ह्यात काळे, पाखर धान खरेदी करण्याची योजनाच नाही
लाेकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : खरीप हंगाम २०२२-२३ मध्ये आधारभूत किमतीवर धान खरेदी करण्याच्या योजनेंतर्गत राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार पणन विभागामार्फत सुरू करण्यात आलेल्या शेतकऱ्यांच्या नोंदणीची प्रक्रिया अद्यापही सुरू आहे, मात्र धानाची थेट खरेदी झालेली नाही. नोंदणीची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर दि. १० नोव्हेंबरनंतरच धान खरेदी केंद्रे सुरू होणार असल्याची माहिती आहे, मात्र, कापणीनंतर पावसाने काळवंडलेल्या धानाची खरेदी केली जाणार नाही. शेतात भिजून काळे झालेले व पाखर धान खरेदीसाठी पणन विभागाचे कोणतेही नियोजन नाही.
यापूर्वी १९९७-९८ मध्ये अतिवृष्टीमुळे शेतात ठेवलेले भात काळे पडले होते. शेतकऱ्यांची मागणी आणि राजकीय दबावामुळे शासनाने अधिसूचना काढून काळा पाखर धान खरेदी करण्याचा निर्णय घेतला होता. त्यावेळी सर्व शेतकऱ्यांकडून आधारभूत किमतीवर काळा पाखर धान खरेदी करण्यात आल्याचे सांगण्यात येते. यावेळीही सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे जिल्हाभरातील शेतात ठेवलेले धान भिजून काळवंडले असून, हा काळवंडलेला धान खरेदी होणार की नाही, अशी चिंता शेतकऱ्यांना सतावत आहे.
प्रत्येक गावात धान खरेदी केंद्र उघडा
- संकटाचा सामना करणाऱ्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी प्रत्येक गावात धान खरेदी केंद्र उघडून पाखर धानाला बोनससह खरेदी करणे आवश्यक आहे. मात्र सध्या तरी हा धान खरेदी करण्याचे कोणतेही नियोजन पणन विभागाकडे नाही. सरकारने त्वरित निर्णय घेऊन १९९७-९८च्या धर्तीवर काळा धान खरेदीसाठी मार्गदर्शक तत्त्वे जारी करावीत, अशी मागणी आमदार राजू कारेमोरे यांनी केली आहे.