बिबट्याने मांडले घरात ठाण

By Admin | Updated: November 8, 2015 00:37 IST2015-11-08T00:37:13+5:302015-11-08T00:37:13+5:30

वेळ रात्री ११ वाजताची... बोचरी थंडी... विद्युत विभागाचा वीज पुरवठा खंडीत... किर्रर्र अंधारात अचानक घरात कुणीतरी नकळत प्रवेश करुन एका कोपऱ्यात ठाण मांडला...

Than Tha Mandalay Thana Thana | बिबट्याने मांडले घरात ठाण

बिबट्याने मांडले घरात ठाण

कामकाझरी येथील घटना : गावात दहशतीचे वातावरण, वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी अथक प्रयत्नांनी केले जेरबंद
ंविशाल रणदिवे अड्याळ
वेळ रात्री ११ वाजताची... बोचरी थंडी... विद्युत विभागाचा वीज पुरवठा खंडीत... किर्रर्र अंधारात अचानक घरात कुणीतरी नकळत प्रवेश करुन एका कोपऱ्यात ठाण मांडला... ऐव्हान तो नरभक्षी बिबट असल्याची कल्पना घरच्यांना आल्याने कुटुंबियांमध्ये भितीचे वातावरण पसरले. तब्बल पाच तासाच्या अथक प्रयत्नानंतर या बिबट्याला वनविभागाने पिंजऱ्यात अडकविल्यानंतर सर्वांनीच सुटकेचा नि:श्वास सोडला.
एखाद्या सिनेमातील थरार दृष्याला शोभेसा असा हा प्रसंग असला तरी तो मात्र प्रत्यक्षात पवनी तालुक्यातील कामकाझरी येथील टिफेश्वर शिवचरण चेटुले यांच्या कुटुंबियांनी अनुभवला. शुक्रवारी रात्रीच्या सुमारास बोचरी थंडी असल्याने कामकाझरी येथील नागरिकांनी रात्रीचे जेवण आटोपून झोपण्याची तयारी चालली होती. दरम्यान वीज वितरण कंपनीचा विद्युत पुरवठा खंडीत झाल्याने नागरिकांची झोपमोड झाली. टिपेश्वर चेटुले यांच्या घराचे दार उघडे असल्याने अंधाराचा फायदा घेत सुमारे दीड वर्षाची बिबट मादी अचानकपणे त्यांच्या घरात शिरली. कुणाचा तरी घरात प्रवेशाची चाहुल कुटुबियांना लागल्याने त्यांनी आवाज देवून शेजारच्यांना सदर बाबीची माहिती दिली. वीज खंडीत असल्याने घरात कोण शिरला याचा कानोशा घेताना कुटुंबियांमध्ये कमालीची भीती शिरली होती.
दरम्यान बिबट्याने घरातील आंगणात बांधलेल्या म्हशीचे वासरु भक्ष्य करण्यासाठी उचलले होते. वेगळ्या प्रकारच्या वासामुळे ऐव्हाना कुटुंबिय व शेजारच्यांना घरात बिबट किंवा वाघ असल्याची खात्री झाली. त्यामुळे त्यांनी घराचा दरवाजा बाहेरुन बंद केला. सदर घटनेची माहिती गावकऱ्यांनी वनविभाग व वीज वितरण विभागाच्या अधिकाऱ्यांना दिली. सर्वत्र अंधार असल्याने गावात या घटनेने हल्लकल्लोळ माजला होता. दरम्यान घटनेचे गांभीर्य ओळखून वीज वितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी खंडीत वीज पुरवठा सुरु करण्यासाठी आटोकाट प्रयत्न केला. रात्रीचे दोन वाजताच्या सुमारास गावातील विद्युत पुरवठा सुरळीत सुरु केला. यावेळी घरातील विद्युत प्रकाशात एका कोपऱ्यात बिबट दडी मारुन बसल्याचे दिसून आल्याने सर्वांचीच भंबेरी उडाली. दरम्यान वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी दारात पिंजरा लावून त्यात त्याला अडकविले.
तब्बल पाच तासाच्या प्रयत्नानंतर बिबट पिंजऱ्यात बंद झाल्यानंतर चेटुले कुटुंबियांसह उपस्थित गावकरी व कर्मचाऱ्यांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. पहाटे ४.३० वाजताच्या सुमारास पिंजरा बंद बिबट अड्याळ वनपरिक्षेत्र कार्यालयात आणला. यावेळी उपवनसंरक्षक भंडारा व सहायक वनसंरक्षक यांच्या निर्देशानुसार बिबट पिंजरा बंद करण्यात आला. बिबट घरात शिरल्याने गावकऱ्यांमध्ये कमालीची भीती निर्माण झाली आहे.

Web Title: Than Tha Mandalay Thana Thana

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.