महिलेच्या मृत्यूप्रकरणी तुमसरात तणाव
By Admin | Updated: August 23, 2014 01:28 IST2014-08-23T01:28:42+5:302014-08-23T01:28:42+5:30
सर्पदंश झालेल्या एका महिलेला तुमसर उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी भरती करण्यात आले होते. उपचारादरम्यान शुक्रवारी, दुपारच्या सुमारास तिचा मृत्यू झाला.

महिलेच्या मृत्यूप्रकरणी तुमसरात तणाव
तुमसर : सर्पदंश झालेल्या एका महिलेला तुमसर उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी भरती करण्यात आले होते. उपचारादरम्यान शुक्रवारी, दुपारच्या सुमारास तिचा मृत्यू झाला. रुग्णालय प्रशासनाच्या हयगयीमुळे मृत्यू झाल्याचा आरोप मृत महिलेच्या कुटुंबियांनी केला. त्यानंतर शेकडो नागरिकांनी डॉक्टरांना घेराव केला होता. त्यामुळे काही काळ तणाव निर्माण झाला होता. याप्रकरणी रुग्णालय अधिक्षकाविरुद्ध तुमसर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविण्यात आली.
शारदा सेवानंद कटरे (२२) रा. बिनाखी असे मृत महिलेचे नाव आहे. जन्माष्टमीनिमित्त शारदा या नागपुरहून बिनाखी येथे सासरी आली होती. मुळची मोहाडी तालुक्यातील उसर्रा येथील रहिवाशी शारदाचे लग्न चार महिन्यापुर्वी बिनाखी येथील सेवानंद कटरे यांच्याशी झाले होते. सेवानंद नागपूर येथे खाजगी कंपनीत कार्यरत आहे. गुरूवारी रात्री शारदाला कुटूंबियाचा भ्रमणध्वनी आला. मोबाईलवर आवाज येत नाही म्हणून ती अंगणात आली.
अंगणात असलेल्या विषारी सापान्ने तिच्या उजव्या पायाला दंश केला. प्रारंभी उंदीर चावल्याचा तिला भास झाला. रक्तस्त्राव सतत सुरू असल्याचे लक्षात येताच कुटूंबियांनी तिला सिंदपुरी येथे गावठी उपचाराकरीता नेले. उपचार करुन शारदाला घरी आणले. दुसऱ्या दिवशी सकाळी ८.३० वाजता तिला घाबरल्यासारखे वाटू लागले. पुन्हा सिहोरा ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. प्राथमिक उपचारानंतर डॉक्टरांनी तुमसर उपजिल्हा रुग्णालयात हलविण्याचा सल्ला दिला.
सकाळी नऊ वाजता तुमसर उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्रकृती खालावत असल्याचे कुटूंबियांनी रुग्णालय प्रशासनाला सांगितले. परंतु त्याकडे दुर्लक्ष करण्यात आल्याचा आरोप कटरे कुटुंबियांनी केला आहे. दरम्यान दुपारी १२.३० वाजता शारदाची प्राणज्योत मालवली. मृत्यूच्या १५ मिनिटापुर्वी भंडारा येथे हलवा, असे सांगितले होते. परंतु मृत्यूनंतर प्रकरण अंगलट येऊ नये, यासाठी उपचार सुरूच ठेवण्यात आल्याचा कुटूंबियांनी आरोप केला आहे. मृतक शारदाचा भाऊ रहांगडाले यांनी रुग्णालय अधिक्षिकाविरुद्ध तुमसर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली आहे.
कारवाईनंतर मृतदेह उचलू
दुपारी १२.३० पासून शारदाचा मृतदेह रुग्णालयातच आहे. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.देवेंद्र पातुरकर यांनी दुपारी ४ वाजता भेट दिली. दिलेल्या औषधांची माहिती संबंधित डॉक्टर्सकडून घेतली. आंदोलन कर्त्यांनी अधीक्षक डॉ. संध्या डांगे व परिचारिका वालदे यांना निलंबित करण्याची मागणी केली. त्यानंतर डॉ.पातुरकर यांनी या दोघांनाही दीर्घ रजेवर जाण्याचे आदेश दिले.
उसर्रा व बिनाखी या गावात शारदाची मृत्युची वार्ता पोहोचताच ग्रामस्थांनी तुमसर येथील रुग्णालयात धाव घेतली. कुटूंबिय ओक्साबोक्सी रडत असताना अनेकांना गहिवरून आले. गुरूवारला दोन्ही गावात चुली पेटल्या नाहीत. (तालुका प्रतिनिधी)