तापमान ४५ अंशावर; १० टक्के साखर उत्पादनात घट
By युवराज गोमास | Updated: May 4, 2024 16:00 IST2024-05-04T15:58:47+5:302024-05-04T16:00:35+5:30
मानस ॲग्रो साखर कारखाना : शेतकरी व कारखानदाराचे नुकसान

Increasing temperature causes decrease in production of sugarcane
भंडारा : सध्या भंडारा जिल्ह्याचे तापमान ४५ अंशावर पोहचले आहे. प्रखर उन्हाचा ऊस पिकाच्या वजनावर व साखर उत्पादनावर चांगला परिणाम जाणवत आहे. डिसेंबर-जानेवारी महिन्यात एक मेट्रीक टन ऊसापासून १०० किलोपर्यंत मिळणारी साखर मे महिन्यात ८० ते ९० किलोपर्यत घटली आहे. सरासरी १० टक्केे उत्पादनात घट झाली आहे. कडक उन्हाच्या तडाख्याने शेतकरी व साखर कारखानदार संकटात सापडले आहे.
जिल्ह्यात मोहाडी तालुक्यातील देव्हाडा येथे वैनगंगा नदी काठावर पूर्ती उद्योग समूहाद्वारे संचालीत मानस ॲग्रो साखर कारखाना मे महिन्यातही सुरू आहे. या कारखान्याचा गाळप हंगाम नोव्हेंबर महिन्यात सुरू करण्यात आला होता. कारखान्याने यंदा २ लाख मेट्रीक टन उस गाळपाचे उदिष्ट निर्धारत केले होते. परंतु, ३ मेपर्यंत १ लाख ८० हजार मेट्रीक टन ऊसाचे गाळप पूर्ण झाले आहे. साखरेचा उतारा १०.५० इतका राहीला आहे. गाळप झालेल्या ऊसापासून १ लाख ६० हजार क्विंटल साखर उत्पादन झाले असल्याची माहिती कारखाना प्रशासनाने 'लोकमत'ला दिली आहे.
जानेवारी ते मार्च महिना फायदेशिर
उस उत्पादक शेतकरी व साखर कारखानदारांसाठी जानेवारी ते मार्च पर्यंतचे वातावरण लाभदायक असते. या काळात ऊसाचे वजन व साखर उताराही चांगला असतो. या काळात उन्हाचा परिणाम जाणवत नाही. ऊसाचा वजनही चांगला असतो. ऊसाची एक काडी ८ ते १० किलोपर्यंत भरते. परंतु, तापमान वाढीमुळे ऊसाच्या काडीचे वजन १ ते २ किलोने कमी झाले आहे.
ऊस तोडणीसाठी मजूर मिळेनात
प्रखर उन्हामुळे ऊस तोडणी मजुरांची उणीव भासत आहे. अनेक स्थानिक ऊसतोड मजुरांच्या टोळ्या बंद झाल्या आहेत. ॲडव्हॉन्स बुडविणे आदी प्रकारामुळे कंत्राटदारांचे नुकसान होत आहे. त्यातच मुदत संपूनही अनेक दिवस तोडणी होत नसल्याने शेतकऱ्यांना पीक जगविण्यासाठी अधिक मेहनत घ्यावी लागत आहे.
जाळून केली जाते हे ऊसाची तोडणी
उन्हाळ्यात ऊसाचे शेतात शिरून तोडणी करण्यास मजूर धजावताना दिसत नाही. त्यामुळे सायंकाळी ऊसाच्या उभ्या पिकाला आग लावली जात आहे. पालापाचोळा जळाल्यानंतर ऊसाची कापणी सुरू केली जात आहे. परिणामी ऊसाचे वजन झपाट्याने कमी होवून शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे.
ऊसाचे पीक १४ ते १५ महिन्यांचे आहे. परिपक्व ऊसाचे वजन व साखर उतारा चांगला असतो. त्यामुळे शेतकरी व कारखाना दोन्हींचा फायदा होतो. परंतु, प्रखर उन्हामुळे ऊस व साखरेच्या उत्पादनावर १० टक्क्यांनी घट येत असते.
- विजय राऊत, महाव्यवस्थापक, मानस ॲग्रो साखर कारखाना, देव्हाडा.