ग्राहकांना कच्चे बिल देऊन कराची चोरी
By Admin | Updated: April 18, 2016 00:38 IST2016-04-18T00:38:37+5:302016-04-18T00:38:37+5:30
विक्री कर वाचवण्यिासाठी बहुतांश ठोक व्यावसायिक ग्राहकांना वस्तू खरेदीचे पक्के बिल देत नाही.

ग्राहकांना कच्चे बिल देऊन कराची चोरी
महसूल बुडतो : ग्राहकांचीही होते फसवणूक, अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष
तुमसर : विक्री कर वाचवण्यिासाठी बहुतांश ठोक व्यावसायिक ग्राहकांना वस्तू खरेदीचे पक्के बिल देत नाही. त्यांना कच्चे कागदावर लिहीलेले बिल देऊन त्याची बोळवण केली जाते. यातून शासनाचा महसूल बुडत आहे. तसेच ग्राहकांचीही फसवणूक होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
तालुक्याच्या अनेक ठिकाणी ठोक विक्रेत्यांची अनेक दुकाने आहेत. या दुकानामधून मोठ्या प्रमाणात वस्तूंची विक्री केली जाते. कुठलीही वस्तू विकल्यानंतर त्याची पक्की पावती बिल देण्यात यावी, असे विक्री कर विभागाचे आदेश आहेत. मात्र लाखो रूपयांचा व्यवहार असला तरी कोऱ्या कागदावर चिटोऱ्यावर लिहून दिले जाते. थोक व्यावसायिकांनी वापरलेल्या या फंड्यामुळे ग्राहकांची फसवणूक होत आहे. कारण एखादी वस्तू सदोष आढळल्यास न्याय पंचायतीमधून न्याय मिळवून घेण्यासाठी ग्राहकाजवळ कुठलाही पर्याय उरत नाही.
औषधीचे दुकाने, जनरल स्टोर्स, कापड दुकान, इलेक्ट्रानिक सामुग्री, फर्निचर जनरल स्टोर्स, हार्डवेअर आदी व्यावसायिकांनी ग्राहकांना खरेदी केलेल्या वस्तूंची पक्की पावती देणे नियमाने बंधनकारक आहे. या व्यवसायातून प्रत्येक दिवशी लाखो रूपयाची उलाढाल होते. मात्र ग्राहकाला छापील पावती दिली जात नाही. ग्राहक नियम अटीची जाणीव नसल्यामुळे पक्के बिल मागण्याचा आग्रही धरत नाही काही ग्राहकांनी पक्के बिलाची मागणी केलीच तर त्यांना एखाद्या कोऱ्या कागदावर वस्तू खरेदीची किंमत लिहून दिले जाते. हा प्रकार विक्री कर चुकविण्यासाठीच केल्याचे स्पष्ट होते.
काही ग्राहक आग्रही करून पक्की बिल मागतात. तेव्हा संबंधित थोक विक्रेता बिल देण्यास टोलवाटोलवी करतो. ग्राहक जास्तचाच आग्रह करीत असेल तर त्याचा कोऱ्या कागदावर आपल्या दुकानाचा रबरी स्टॅम्प मारुन पावती दिली जाते. यावरून खरेदी केलेली वस्तु बद्दल संशय निर्माण होत असतो. (तालुका प्रतिनिधी)
कच्च्या बिलाने महसूल बुडतोय
ग्राहकांना पक्के बिल दिले तर त्याबाबतचा हिशेब शासन दरबारी सादर करावा लागतो. करीता कोऱ्या कागदावर लाखोंची उलाढाल करून शासनाचा महसूल बुडत आहे. हा प्रकार वाढला आहे. कच्चे बिल ग्राहकांच्या माथी मारून शासनाचा महसूल तर बुडतच असतो. मात्र एखादी वस्तू सदोष आढळल्यास त्याबाबत कुठेही जावून न्याय मागता येत नाही.
जनजागृतीची गरज
ग्राहक हा राजा आहे, मात्र हा राजा वस्तू खरेदी करताना आपले राजतेज दाखवितच नाही. यात विशेष म्हणजे ग्राहकांमध्ये पक्के बिलाबाबत जागृतीच नाही. ग्राहक संघटनाकडूनही जनजागृती केली जात नाही. म्हणून कच्चे बिल देण्याची प्रथा सर्रास उघडपणे होत आहे. या प्रकारावर लक्ष देऊन पध्दतीमध्ये सुधार घडवून आणावे, अशी मागणी होत आहे.