गोसीखुर्द धरणावर ताट-वाटी, घागर मोर्चा
By Admin | Updated: November 25, 2014 22:49 IST2014-11-25T22:49:37+5:302014-11-25T22:49:37+5:30
विदर्भातील महत्त्वाकांक्षी गोसीखुर्द धरणामध्ये प्रकल्पग्रस्तांची शेती आणि घरे गेली. त्यात त्यांचे उपजिविकेची साधने बुडाल्यामुळे त्यांच्याजवळ आता काहीच उरले नाही. त्यामुळे प्रकल्पग्रस्तांनी

गोसीखुर्द धरणावर ताट-वाटी, घागर मोर्चा
मोबदला देण्याची मागणी : आणखी किती दिवस करायचा संघर्ष- प्रकल्प
गोसेबुज : विदर्भातील महत्त्वाकांक्षी गोसीखुर्द धरणामध्ये प्रकल्पग्रस्तांची शेती आणि घरे गेली. त्यात त्यांचे उपजिविकेची साधने बुडाल्यामुळे त्यांच्याजवळ आता काहीच उरले नाही. त्यामुळे प्रकल्पग्रस्तांनी त्यांच्या विविध मागण्यांसाठी ताट, वाटी, चमचे वाजवित गुंड घागरी, मासे पकडण्याचे धुटी घेऊन गोसीखुर्द धरणावर मोर्चा काढला. संतप्त आंदोलनकर्ते सुरक्षेचे कडे तोडून मुख्य धरणापर्यंत पोहोचले.
या मोर्चात पिण्याच्या पाण्याच्या समस्येकरिता घागरी, अन्न सुरक्षेकरिता ताट, वाटी, चमचे, शिक्षण व प्रशिक्षण, नोकरी, रोजगार या समस्येकरिता पाट्या व नदीवरील उदरनिर्वाहाकरिता मासेमारांचे साहित्य असलेले धुट्या, पेलण्या, जाळे घेऊन प्रकल्पग्रस्त मोर्चात सहभागी झाले. सकाळी ११ वाजतापासून बुडीत क्षेत्रातील भंडारा व नागपूर जिल्ह्यातील प्रकल्पग्रस्तांचे पाथरी पुनर्वसन ठिकाणी येणे सुरु झाले. हजारो प्रकल्पग्रस्त जमा झाल्यानंतर दुपारी १ वाजता मोर्चाला सुरुवात झाली. या मोर्चामध्ये पाथरी, पेंढरी, मेंढा, जामगाव, गिरोला, चिचखेडा, नवेगाव, गोसेबुज, गाडेघाट, घाटउमरी, सौंदड, मालची, गोसीखुर्द, नेरला आदी गावातील प्रकल्पग्रस्त सहभागी झाले.
संघर्ष हमारा नारा है, प्रकल्पग्रस्त युवकांना नोकरी द्या, प्रकल्पग्रस्तांना पैसा द्या आदी घोषणांसह ताट, वाटी, चमचे वाजवून प्रकल्पग्रस्तांनी परीसर दनाणून सोडला होता. मोर्चा मार्गक्रमण करीत २ वाजता धरणावर जलविद्युत निर्मीती प्रकल्पाजवळ पोहोचताच तेथील सुरक्षा रक्षकांच्या विरोधाला न जुमानता प्रकल्पग्रस्तांनी मुख्य धरणापर्यंत धडक दिली.
मोर्चाचे रुपांतर सभेत झाले. सभेमध्ये गावागावातून आलेल्या प्रकल्पग्रस्तांनी आपल्या व्यथा मांडल्या. प्रकल्पग्रस्तांना सरकारी, निमसरकारी, खासगी कंपन्यात नोकरी मिळावी, व्यवसायाकरिता १२ लाख रुपयांचे पॅकेज प्रत्येक कुटुंबाला मिळावे, प्रकल्पग्रस्तांना पेंशन मिळावी, जलाशयात मासेमारीचा हक्क मिळावा, १२०० कोटी रुपयाच्या पुनर्वसन पॅकेज वाटपाचा हिशोब जाहीर करावा आदी मागण्या ठेवल्या. जेव्हापर्यंत शासकीय अधिकारी आंदोलनस्थळी येऊन प्रकल्पग्रस्तांचे समाधान करणार नाही, तोपर्यंत हटणार नाही, असा ईशारा दिला. सायंकाळपर्यंत आंदोलन सुरुच होते.
या मोर्चाचे आयोजन गोसीखुर्द प्रकल्पग्रस्त संघर्ष समितीने केले होते. यावेळी संघर्ष समितीचे संयोजक विलास भोंगाडे, विठोबा समरीत, मच्छीमार संघटनेचे पदाधिकारी दादा आगरे, लक्ष्मीकांत तागडे यांच्या नेतृत्वात पाथरीच्या सरपंचा रिना भुरे, सोमेश्वर भुरे, विनोद शेंडे, गुलाब मेश्राम, सुनंदा समरीत, वामन सेलोकर, समीक्षा गणवीर, किशोर समरीत, स्मृती मेश्राम, केशव हटवार, प्रकाश मेश्राम, गणेश आगरे करीत आहेत. अड्याळचे पोलीस उपनिरीक्षक नेवारे हे स्थितीवर लक्ष ठेवून आहेत. (वार्ताहर)