समविचारी पक्षाशी आघाडी करु
By Admin | Updated: July 11, 2015 01:38 IST2015-07-11T01:38:59+5:302015-07-11T01:38:59+5:30
केंद्र आणि राज्य सरकारच्या धोरणांना कंटाळलेल्या जनतेने भंडारा व गोंदिया जिल्हा परिषदेत काँग्रेसला कौल दिला आहे.

समविचारी पक्षाशी आघाडी करु
ठाकरे यांचे प्रतिपादन : जिल्हा परिषद निवडणुकीवर मंथन
भंडारा : केंद्र आणि राज्य सरकारच्या धोरणांना कंटाळलेल्या जनतेने भंडारा व गोंदिया जिल्हा परिषदेत काँग्रेसला कौल दिला आहे. सरकारविरुद्ध जनतेमध्ये असलेला हा रोष भविष्यात राज्यातही दिसून येईल. राज्यात आम्ही पुन्हा सत्ता स्थापन करू, असा विश्वास काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी व्यक्त केला. निरीक्षक म्हणून शुक्रवारला आले असता ते पत्रपरिषदेत बोलत होते.
यावेळी ते म्हणाले, भंडारा जिल्हा परिषदेत गटनेता निवडीची प्रक्रिया पार पडली. गटनेता म्हणून ज्ञानेश्वर रहांगडाले यांची नियुक्ती करण्यात आली आहे. काँग्रेसच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या एकजुटीचा हा विजय आहे. राज्यात नैराश्येचे वातावरण आहे. सरकारने शेतकऱ्यांची अनास्था केल्याचे या निवडणुकीतून दिसून आले. भंडारा जिल्हा परिषदेत सर्वाधिक १९ जागा जिंकून काँग्रेस अव्वलस्थानी आली. आता वर्षभरातच भाजपला उतरती कळा लागली आहे. युती कुणाशी करणार, या प्रश्नावर ते म्हणाले, आम्ही समविचारी पक्षांशी आघाडी करू. निरिक्षक म्हणून पदाधिकारी, नवनियुक्त सदस्यांची मते जाणून घेत आहे. त्यानंतर हा अहवाल प्रदेश काँग्रेस कमिटीला देणार आहे. त्यावर प्रदेश पातळीवर निर्णय होईल, असे स्पष्ट केले. पत्रपरिषदेला जिल्हाध्यक्ष जीया पटेल, माजी राज्यमंत्री बंडूभाऊ सावरबांधे, माजी आमदार सेवक वाघाये, प्रदेश सचिव तानाजी वनवे, सुनील दुधलवार, प्रमोद तितीरमारे, प्रमिला कुटे, सीमा भुरे उपस्थित होते.