दादा, ताई सायकल घे. पण शाळेत ये!
By Admin | Updated: May 22, 2014 00:52 IST2014-05-22T00:52:01+5:302014-05-22T00:52:01+5:30
सध्या सर्वत्र शाळांमध्ये विद्यार्थी भरती प्रक्रिया सुरू आहे. याबाबद रोजच चर्चा होतात.

दादा, ताई सायकल घे. पण शाळेत ये!
सध्या सर्वत्र शाळांमध्ये विद्यार्थी भरती प्रक्रिया सुरू आहे. याबाबद रोजच चर्चा होतात. गुरुजींची विद्यार्थ्यांसाठी पायपीट, भटकंतीे असे शब्द रोजच कानी पडतात. मात्र यात विशेष म्हणजे आपल्या शाळेची विद्यार्थ्यांअभावी तुकडी तुटू नये आणि शाळेचे नाव बदनाम होऊ नये, यासाठी गुरुजी तन-मन-धनाने कामाला लागले आहेत. जिल्हय़ातील बहुतेक भागात विद्यार्थी व त्यांच्या पालकांनी शाळेत येण्यासाठी विविध अटी घातल्या आणि या अटी गुरुजी मागचा पुढचा विचार न करता पूर्ण करीत आहेत. यासाठी गुरुजींनी अर्थात शाळा प्रशासनाने विद्यार्थ्यांना येण्याजाण्यासाठी सायकल देण्याचे ठरविले आणि गुरुजी विद्यार्थ्यांच्या घरी भेट देऊन म्हणताहेत, दादा, ताई सायकल घे, पण आमच्याच शाळेत ये. विविध शाळांमध्ये विद्यार्थी भरतीसाठी स्पर्धा सुरू आहे. एका शाळेनी सायकल दिली तर दुसर्याही शाळेला सायकल देण्याचा उपक्रम करावा लागत आहे. यासाठी शाळेतील शिक्षक आपल्या पगाराचा काही भाग खर्च करत असल्याची माहिती आहे. खाजगी किंवा जिल्हा परिषदच्या शाळा असोत हा प्रकार आता काही नवीन नाही. एका सायकल व्यावसायीकाची भेट घेऊन विचारणा केली असता मे-जून च्या महिन्यात सायकलची विक्रमी मागणी होते आणि ती विविध शाळांच्या माध्यमातून करण्यात येते असे त्यांनी सांगितले. एका सायकलचा विचार करता अडीच ते तीन हजार चा खर्च शिक्षक एका विद्यार्थ्यांमागे करीत आहेत. यासाठी महिन्याच्या पगाराचा काही हिस्सा विद्यार्थी भरतीप्रक्रियेसाठी खर्च करण्यात येत आहे. शाळा प्रशासन गावागावात विद्यार्थ्यांच्या भेटी घेताना विद्यार्थ्यांंना आम्ही तुला कपडे देऊ, पुस्तक देऊ, जाण्यायेण्यासाठी सायकल देऊ आणि एवढंच नाही तर १0 वी, १२ व्या वर्गात पास करण्याची हमी देतानाचे चित्र आहे. यावरुन शैक्षणिक विकास ग्रामीण व शहरी भागात कितपत साधता येईल हा प्रश्न आहे. स्पर्धेच्या युगात आकर्षक शाळा, उपक्रमशील शैक्षणिक वातावरण इत्यादी बाबी शोधून पालक आपल्या पाल्याना शाळेत पाठवताना दिसतात आणि या स्पर्धेत बोटावर मोजण्याइतपत शाळा आहेत. ग्रामीण भागातील परिस्थिती फार गंभीर आहे. सायकल, पैसा, कपडे यापेक्षा शिक्षण महत्वाचे आहे हे अजून कित्येक विद्यार्थी आणि पालकांना कळलेच नाही. ज्या शाळेनी विविध स्कीम दिल्या तुमच्याकडे विद्यार्थी पाठवतो तुम्ही कोणती स्कीम देता असा स्कीमचा खेळ शिक्षणाचा खेळखंडोबा करीतअ आहे. अनेक शाळांचे शिक्षक वैतागले असून नोकरी वाचविण्यासाठी आता सर्वकाही असा नारा देताना दिसत आहेत. एवढेच नाही तर विद्यार्थ्यांच्या घरी जाऊन ताई-दादा म्हणत मनधरणी तर सुरूच आहे. पण वेळ आली तर विद्यार्थ्यांंचे पाय धरण्याची वेळ आली तर तेही करावच लागेल अशी परिस्थिती आहे.