खेळाडूंच्या प्रशिक्षणासाठी उत्तम प्रशिक्षक नेमा
By Admin | Updated: July 23, 2015 00:36 IST2015-07-23T00:36:01+5:302015-07-23T00:36:01+5:30
जिल्ह्यातील खेळाडुंना उत्तम दर्जाच्या सुविधा आणि चांगले प्रशिक्षण मिळण्यासाठी उत्तम प्रशिक्षकांची सेवा घ्यावी , असे निर्देश जिल्हाधिकारी धीरजकुमार यांनी दिले.

खेळाडूंच्या प्रशिक्षणासाठी उत्तम प्रशिक्षक नेमा
क्रीडा संकुल कार्यकारी समितीची सभा : जिल्हाधिकाऱ्यांचे प्रतिपादन
भंडारा : जिल्ह्यातील खेळाडुंना उत्तम दर्जाच्या सुविधा आणि चांगले प्रशिक्षण मिळण्यासाठी उत्तम प्रशिक्षकांची सेवा घ्यावी , असे निर्देश जिल्हाधिकारी धीरजकुमार यांनी दिले.
जिल्हा क्रीडा संकुल कार्यकारी समितीची बैठक जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली शिवाजी क्रिडा संकुल येथे घेण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते. या बैठकीला पोलीस उपअधीक्षक पी.पी. धरमशी, उप कार्यकारी अभियंता पराग ढमके, शिक्षणाधिकारी के.झेड शेंडे, मुख्याधिकारी रवीन्द्र देवतळे, वास्तु विशारद सुधीर श्रीवास्तव, वैनगंगा स्पोर्टिंगचे अध्यक्ष डॉ. मधुकांत बांडेबुचे, जिल्हा हॅण्डबॉल असोसिएशनचे सचिव अशोकसिंह राजपूत, जिल्हा क्रीडा अधिकारी सुभाष गांगरेड्डीवार उपस्थित होते. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी सर्व तालुक्यातील तालुका क्रिडा संकुलासाठी येत असलेल्या अडचणींचा आढावा घेतला. मोहाडी आणि भंडारा वगळता पाचही तालुक्यांमध्ये जागेची उपलब्धता आहे. भंडारा आणि मोहाडी येथील नगरपरिषदेने जागा उपलब्ध करुन द्यावी, अशा सूचना जिल्हाधिकारी यांनी दिल्या. जिल्हा क्रिडा संकूलाच्या देखभाल दुरुस्तीसाठी निधी उपलब्ध व्हावा म्हणून जिल्हा क्रिडा संकुलांतर्गत वाणिज्य स्वरुपात गाळे निर्माण करण्याविषयी वास्तु विशारद सुधीर श्रीवास्तव यांना अंदाजपत्रक व आराखडे पुढील बैठकीत सादर करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी यांनी दिले. जिल्हा क्रिडा संकुलातील आवश्यक उर्वरित क्रिडांगणाचे जसे फुटबॉल, हॉकी मैदान, लॉन-टेनिस मैदान, ४०० मिटर धावनपथ, हॅण्डबॉल व बॉस्केटबॉल मैदान इत्यादिंचे नुतनीकरण करण्याचा निर्णय समितीने घेतला.
जिल्हा क्रीडा संकुलामध्ये पिण्याच्या पाण्याची सुविधा निर्माण करणे, कचराकुंडीची व्यवस्था करणे, भंगारातील साहित्याचा लिलाव करणे, संकुलामध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसविणे तसेच जिल्ह्यातील उद्योजकांकडून प्रायोजकांच्या माध्यमातून संकुलामध्ये आवश्यक क्रीडा सुविधा निर्माण करणे हे निर्णय घेण्यात आले. (नगर प्रतिनिधी)