जलतरण तलाव बंदच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2019 22:23 IST2019-05-09T22:23:03+5:302019-05-09T22:23:32+5:30
शहरातील छत्रपती शिवाजी महाराज जिल्हा क्रीडा संकुलात असलेला जलतरण तलाव गत वर्षभरापासून बंद आहे. विशेष म्हणजे जिल्ह्यातील हा एकमेव प्रशिक्षण असणारे केंद्र बंद असल्याने जलतरणाचा सराव करण्यासाठी येणारे शेकडो बच्चे कंपनी आल्यापावली परत जात आहेत.

जलतरण तलाव बंदच
इंद्रपाल कटकवार।
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : शहरातील छत्रपती शिवाजी महाराज जिल्हा क्रीडा संकुलात असलेला जलतरण तलाव गत वर्षभरापासून बंद आहे. विशेष म्हणजे जिल्ह्यातील हा एकमेव प्रशिक्षण असणारे केंद्र बंद असल्याने जलतरणाचा सराव करण्यासाठी येणारे शेकडो बच्चे कंपनी आल्यापावली परत जात आहेत.
जिल्हा मुख्यालयातील क्रीडा संकुलात असलेल्या जलतरण तलावाच्या समस्येबाबत साडेसाती संपलेली नाही. क्रीडा विभागात अनेक समस्यांचा अंबार असताना जलतरण तलावही त्यापासून सुटलेला नाही. मागील एक वर्षापूर्वी या तलावात एका बालकाचा बुडून मृत्यू झाला होता. त्या दिवसापासून हा तलाव बंदच आहे. उन्हाळ्याच्या सुट्या लागल्यामुळे अनेक पालक पाल्यांना घेऊन जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय गाठतात. मात्र जलतरण तलावच बंद असल्याने त्यांची घोर निराशा होत आहे.
या तलावाच्या देखभाल दुरूस्तीकडे कुणाचेही लक्ष नाही. त्यामुळे तलावात मोठ्या प्रमाणात शेवाळ साचले असून पाण्याला दुर्गंधी सुटली आहे. तसचे तलावाच्या टाईल्स निखळल्या आहेत.
तलावाची दुरवस्था
ऐसपैस जागेत असलेल्या या तलावाची चांगलीच दुरवस्था झाली आहे. मागील वर्षी हा तलाव प्रशिक्षणासाठी सुरु तरी होता. मात्र घटनेनंतर सदर प्रशिक्षण केंद्र बंद अवस्थेत आहे. तलावातील टाईल्स तुटलेल्या असून केरकचरा व धुळ साचलेली आहे. चेंजींग रुम व शॉवरचीही तशीच अवस्था आहे. सभोवताली झाडीझुडपी व केरकचरा दिसून येतो. निधीअभावी सदर जलतरण तलावाला गतवैभव प्राप्त होत नसल्याची माहिती समोर आली. दरम्यान जिल्हा क्रीडा विभाग व जिल्हाधिकारी कार्यालय यांनी याबाबत पुढाकार घेऊन जिल्ह्यातील एकमेव जलतरण तलाव पुन्हा सुरु करावा अशी मागणी आहे.
जलतरण तलावची नेमकी काय स्थिती आहे याबाबत जिल्हा क्रीडा अधिकाऱ्यांशी चर्चा करू. योग्य तो निर्णय घेतला जाईल.
-शांतनू गोयल,
जिल्हाधिकारी, भंडारा.