मध्य प्रदेशातील सात्या तुमसरात
By Admin | Updated: July 29, 2015 00:39 IST2015-07-29T00:39:49+5:302015-07-29T00:39:49+5:30
रान मेवा म्हणून ओळख असलेल सात्या तुमसरच्या बाजारात विक्रीला आल्या आहेत.

मध्य प्रदेशातील सात्या तुमसरात
४०० रुपये किलो भाव : सर्वसामान्यांची खरेदीकडे पाठ
तुमसर : रान मेवा म्हणून ओळख असलेल सात्या तुमसरच्या बाजारात विक्रीला आल्या आहेत. याचा भाव तेजीत असल्याने सर्वसामान्यांनी त्याच्या खरेदीकडे पाठ फिरविली आहे. मध्य प्रदेशातील जंगलातून या सात्या शहरात येत आहेत.
शहरातील मंडळी मध्य प्रदेशात जाऊन सात्या ठोक भावाने आणतात. नंतर शहरात चिल्लर विक्री करतात. सध्या या सात्यांचा भाव ३०० ते ४०० रुपये प्रती किलोग्रॅम इतका आहे.
जंगलात टेकडी भागात सात्या उगवतात. आभाळ गर्जना होणे व पाऊस पडल्यावरच सात्या टेकडीतून बाहेर येतात. मध्य प्रदेशातील जंगलात मोठ्या प्रमाणात सात्या आढळतात. तेथून खरेदी करून विक्रेते तुमसरात सात्या घेऊन येतात. जागेवर त्यांचा भाव कमी असतो. शहरात आणल्यावर तिप्पट ते चारपट जास्त भावाने त्या विक्री केल्या जातात.
वर्षातून केवळ एकदा या नैसर्गिक सात्या बाजारात येत असल्याने खवय्ये त्यावर तुटून पडतात. खायला रुचकर, पौष्टिक व जीवनसत्व भरपूर प्रमाणात असल्याने सात्या खरेदीदारांची संख्या जास्त आहे. शहरात श्रीरामनगरातील दुर्गा मंदिर परिसरात सात्या विक्रीचे प्रमुख स्थळ आहे.
तुमसरातील सात्या नागपूर, गोंदिया, वर्धा, रायपूर, राजनांदगाव पर्यंत खवय्ये घेऊन जातात. शहरात मशरूम नावाने विकल्या जाणाऱ्या सात्यांची विशेष शेती केली जाते. त्यापेक्षा नैसर्गिक जंगलातील सात्या खायला अत्यंत रुचकर असल्याने ग्राहक या सात्यांना प्रथम पसंती देतात.
मात्र, भाव कडाडले असल्याने खरेदीदार कमी आहेत. (तालुका प्रतिनिधी)
सात्या काढणे धोकादायक
सात्या जरी महाग विक्री केल्या जात असल्या तरी जंगलातील डुंभरातून सात्या बाहेर काढणे अत्यंत जोखमीचे काम आहे. या डुंभरात सापांचे वास्तव्य राहते. पहाटे तथा मध्यरात्री सात्या खोदून बाहेर काढल्या जाते. मेणबत्ती किंवा टॉर्चच्या प्रकाशात रात्री जंगलात पायवाट तुडवत सात्या काढायला ग्रामस्थ जातात हे विशेष. मांसापेक्षा सात्याला प्रथम प्रसंगी दिली जाते.