आग प्रकरणात घातपाताचा संशय
By Admin | Updated: April 15, 2016 01:01 IST2016-04-15T01:01:10+5:302016-04-15T01:01:10+5:30
लोकमान्य टिळक राष्ट्रीय विद्यालयाला लागलेल्या आगीसंदर्भात घातपाताचा संशय संस्थेच्या तीन पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला असून

आग प्रकरणात घातपाताचा संशय
तुमसर येथील राष्ट्रीय शाळा जळीत प्रकरण : पत्रपरिषदेत पदाधिकाऱ्यांचा आरोप
तुमसर : लोकमान्य टिळक राष्ट्रीय विद्यालयाला लागलेल्या आगीसंदर्भात घातपाताचा संशय संस्थेच्या तीन पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला असून विद्यमान अध्यक्षावर गुन्हा दाखल करण्यासंदर्भात जिल्हा पोलीस अधीक्षक व स्थानिक पोलिसात तक्रार करण्यात आली, अशी माहिती संस्थेच्या तीन पदाधिकाऱ्यांनी पत्रपरिषदेत दिली.
दि. ७ एप्रिल रोजी दुपारी १२.३० च्या सुमारास लोकमान्य टिळक विद्यालयाच्या कार्यालयाला भीषण आग लागली. या अग्नीतांडवात शाळेचे महत्वाचे दस्ताऐवज जळून खाक झाले.
या संस्थेचे ७ पदाधिकारी व सदस्यांपैकी विद्यमान अध्यक्ष मोरेश्वर निखाडे हे एकटेच एका बाजूने व इतर ६ दुसऱ्या बाजूने आहेत. निखाडे यांनी यापूर्वी केलेले गैरप्रकार, शिक्षक नियुक्त्यांद्वारे आर्थिक गैरव्यवहार व अनियमितता उघड होऊ नये, या भीतीपोटी त्यांनी हे कृत्य केल्याचा आरोप केला.
जळीत प्रकरण घडण्याच्या ४ ते ५ दिवसापूर्वी सायंकाळी ४ ते ५ वाजता मोरेश्वर निखाडे स्वत:चे ट्रॅक्टर चालवित जाऊन ट्रॅक्टर क्रमांक एम.एच. ३६ - ६४१३ शाळेतील फर्निचर संस्थेचे पदाधिकारी अमरबहादूर सिंग, कुशवाह व रामू ढोके यांचे घरासमोरून घेऊन गेले. हे त्यांनी स्वत: पाहिले.
याच ट्रॅक्टरमध्ये फर्नीचर सोबतच दस्ताऐवज नेऊन ते गहाळ केल्याचा आरोप लागेल व संशय निर्माण होईल म्हणून ७ एप्रिल रोजी शाळेतील दस्ताऐवज असलेल्या खोल्यांना जाळण्यात आल्याचा आरोप पदाधिकाऱ्यांनी केला. प्रथम शाळेचे फर्निचर इतरत्र हलविल्यामुळे चोरीचा गुन्हा नोंदविण्याची मागणी करण्यात आली आहे.
शाळेचे फर्निचर इतरत्र हलविण्याचा ठराव संस्थेने घेतला नव्हता. मग फर्निचर कसे हलविण्यात आले असा प्रश्न या पदाधिकाऱ्यांनी उपस्थित केला.
स्वत:च्या बचावाकरिता नियमित विद्यार्थी, माजी विद्यार्थी, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांशी संबंधित महत्वपूर्ण दस्ताऐवज जळून खाक झाल्याप्रकरणी विद्यमान अध्यक्ष मोरेश्वर निखाडे यांच्यावर गुन्हा दाखल करून अटक करण्याची मागणी संस्थेचे उपाध्यक्ष रामू ढोके, कोषाध्यक्ष माणिकराव भुरे, सहसचिव ललीतकुमार थानथराटे, सदस्य अमरबहादूर कुशवाह यांनी केली आहे. या प्रकरणात माजी विद्यार्थी, स्वयंसेवी संघटनेचे सदस्य तुमसर बंद करून आंदोलन करणार असल्याचा इशारा दिला आहे. पत्रपरिषदेला संस्थेचे तीन पदाधिकारी व सुभाष पडोळे उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)