उमेदवारीचा ‘सस्पेन्स’ कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 4, 2021 05:00 AM2021-12-04T05:00:00+5:302021-12-04T05:00:31+5:30

आता नामांकनासाठी शनिवार आणि सोमवार असे दोनच दिवस शिल्लक असल्याने या दोन दिवसांत सर्व राजकीय पक्षांना उमेदवाराची घोषणा करावी लागणार आहे. भंडारा जिल्हा परिषदेच्या ५२ आणि पंचायत समितीच्या १०४ जागांसाठी निवडणूक होत आहे. बुधवार, १ डिसेंबरपासून नामांकनाला सुरुवात झाली आहे. पहिल्या दिवशी जिल्ह्यात एकही नामांकन दाखल झाले नव्हते.  दुसऱ्या दिवशी जिल्हा परिषदेसाठी चार, तर पंचायत समितीसाठी तीन नामांकने दाखल झाली.

The suspense of the candidature remains | उमेदवारीचा ‘सस्पेन्स’ कायम

उमेदवारीचा ‘सस्पेन्स’ कायम

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : नामांकन दाखल करण्याच्या तिसऱ्या दिवशीही कोणत्याच राजकीय पक्षाने आपल्या अधिकृत उमेदवारांच्या नावाची घोषणा केली नाही. त्यामुळे उमेदवारीचा सस्पेन्स कायम असून कुणाला तिकीट मिळणार याची सर्वांनाच उत्सुकता लागली आहे. सर्वच राजकीय पक्षांना बंडखोरांची भीती असल्याने उमेदवारांची यादी घोषित होण्यास विलंब होत आहे. 
आता नामांकनासाठी शनिवार आणि सोमवार असे दोनच दिवस शिल्लक असल्याने या दोन दिवसांत सर्व राजकीय पक्षांना उमेदवाराची घोषणा करावी लागणार आहे. भंडारा जिल्हा परिषदेच्या ५२ आणि पंचायत समितीच्या १०४ जागांसाठी निवडणूक होत आहे. 
बुधवार, १ डिसेंबरपासून नामांकनाला सुरुवात झाली आहे. पहिल्या दिवशी जिल्ह्यात एकही नामांकन दाखल झाले नव्हते.  दुसऱ्या दिवशी जिल्हा परिषदेसाठी चार, तर पंचायत समितीसाठी तीन नामांकने दाखल झाली. तीन दिवस झाले तरी अद्याप कोणत्याही राजकीय पक्षाने आपल्या उमेदवारांच्या नावाची घोषणा केली नाही. 
जवळपास सर्वच पक्षांनी आपल्या अधिकृत उमेदवारांची यादी तयार केली आहे. मात्र बंडखोरी होण्याची भीती असल्याने सर्वांनीच सस्पेन्स कायम ठेवला आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना, भाजपने अद्यापही आपल्या अधिकृत उमेदवारांच्या नावांची घोषणा केली नाही. आता केवळ दोन दिवस उमेदवारी दाखल करण्यासाठी आहेत. शनिवार आणि सोमवार असे ते दोन दिवस असून, रविवारी सुट्टी असल्याने नामांकन दाखल करता येणार नाही. त्यामुळे शेवटच्या दोन दिवसांत नामांकन दाखल करण्यासाठी उमेदवारांची गर्दी होण्याची शक्यता आहे. 
जिल्ह्यातील लाखनी, लाखांदूर आणि मोहाडी नगरपंचायतीची निवडणूक होत असून, या निवडणुकीसाठीही अद्याप कोणत्याच पक्षाने उमेदवाराच्या नावाची घोषणा केली नाही. मात्र ग्रामीण भागात राजकीय वातावरण तापायला सुरुवात झाली आहे.

महिला उमेदवारासाठी खरी दमछाक

- जिल्हा परिषद आणि पंचायत समिती महिलांसाठी राखीव असलेल्या गण आणि गटांत उमेदवार मिळविताना मोठी दमछाक होत असल्याचे दिसत आहे. अनेक ठिकाणी त्या परिसरातील राजकीय पदाधिकारी असलेल्या व्यक्तींच्या पत्नींना तिकीट देण्याचा प्रयत्न चालविला आहे. राजकारणाचा कोणताही अनुभव नसलेल्या या महिलांना तिकीट दिली जाणार आहे. त्यामुळे पुढील सर्व कारभार त्यांचे पतिराजच चालविणार आहेत. जिल्ह्यात सक्षम महिला नेतृत्व असले तरी त्यांना या निवडणुकीत तिकीट देण्याऐवजी पदाधिकाऱ्यांच्या घरच्या मंडळींनाच तिकीट देण्यावर भर आहे. जिल्हा परिषदेसाठी एकवेळ महिला उमेदवार मिळतीलही मात्र पंचायत समितीसाठी महिला उमेदवार मिळविण्याची मोठी कसरत राजकीय पक्षांना करावी लागत आहे. काहीही झाले तर सर्वच पक्षांना सर्व ठिकाणी उमेदवार द्यावे लागणार आहे. त्यासाठी जुळवाजुळव सुरू आहे.

तिसऱ्या दिवशी ४७ उमेदवारांचे नामांकन
- जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि नगरपंचायतीसाठी तिसऱ्या दिवशी ४७ नामांकन दाखल करण्यात आले. जिल्हा परिषदेसाठी २१ तर पंचायत समितीसाठी २४ आणि नगरपंचायतीसाठी दोन नामांकन दाखल करण्यात आले. तुमसर येथे गटासाठी नऊ तर गणासाठी १२, भंडारा गटासाठी नऊ तर गणासाठी ११ आणि लाखांदूर येथे गटासाठी तीन नामांकन दाखल झाले आहे. तर लाखनी आणि मोहाडी नगरपंचायतीसाठी प्रत्येकी एक अर्ज दाखल झाला आहे.

 

Web Title: The suspense of the candidature remains

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.