मागणीच्या तुलनेत औषधांचा पुरवठा कमीच; रुग्णांची वाढली पायपीट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2021 04:34 IST2021-04-25T04:34:52+5:302021-04-25T04:34:52+5:30
जिल्ह्यात कोरोनाग्रस्तांची संख्या ४३ हजारांच्या पार गेली आहे. क्रियाशील रुग्णही अकरा हजारांच्यावर आहेत. मृत्यूसंख्याही झपाट्याने वाढत असून, टेन्शन ...

मागणीच्या तुलनेत औषधांचा पुरवठा कमीच; रुग्णांची वाढली पायपीट
जिल्ह्यात कोरोनाग्रस्तांची संख्या ४३ हजारांच्या पार गेली आहे. क्रियाशील रुग्णही अकरा हजारांच्यावर आहेत. मृत्यूसंख्याही झपाट्याने वाढत असून, टेन्शन बळावले आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढत असले तरी त्याच संख्येने पॉझिटिव्ह व्यक्तींची संख्याही वाढत आहे; मात्र त्या रुग्णांच्या तुलनेत औषधांचा पुरवठा मुबलक होत नसल्याची बाब आता समोर येत आहे. फेव्हीपिरॅविर, रेमडेसिविर व्हायल व टॉसीलीझूमॅप व्हायल यासारखे इंजेक्शन कमी प्रमाणात मिळत असल्याची रुग्णांमध्ये ओरड आहे. ऑक्सिजनबाबत तर फार रस्सीखेच सुरू असल्याचे दिसून येते. दुपारच्या सत्रात ऑक्सिजन मिळवण्यासाठी कोरोना ब्लॉकमध्ये रुग्ण नातेवाइकांची रांग पाहायला मिळत असते. यावेळी काही काळ गोंधळही उडाल्याचे दिसून येते.
तोबॉक्स
जिल्हा आरोग्य प्रशासनाने केलेल्या मागणीनुसार, औषधांचा पुरवठा नियमित होत आहे. प्रत्येक रुग्णाला त्यांच्या हक्काचे औषध मिळावे, यासाठी आमचा प्रामाणिक प्रयत्न सुरू आहे. कुठेही औषधांचा तुटवडा जाणवू नये, याची काळजी घेतली जात आहे. ऑक्सिजनबाबतही व्यवस्था करण्यात येत आहे. कोणत्याही रुग्णाने किंवा नातेवाइकांनी घाबरून जाण्याचे काम नाही. त्यांचे सहकार्य अपेक्षित आहे.
डॉ. प्रशांत उईके, जिल्हा आरोग्य अधिकारी, भंडारा.
नातेवाइकांची घालमेल वाढली
जिल्हा रुग्णालयातील कोरोना ब्लॉकमध्ये नातेवाईक दाखल आहेत. त्यांना वेळेवर ऑक्सिजन व औषधे मिळावीत, यासाठी आमचा प्रयत्न सुरू आहे. ऑक्सिजन व बेडसाठी फार आटापिटा करावा लागला. रुग्ण लवकर बरे व्हावे, अशीच आमची इच्छा आहे - प्रेमलाल रंगारी, रुग्ण नातेवाईक.
ग्रामीण भागातून आम्ही आपल्या पेशंटला घेऊन जिल्हा रुग्णालयात आलो आहोत. येथे चांगली सुविधा मिळते, असे आम्हाला सांगण्यात आले होते; मात्र दोन दिवस झाले धावपळ करावी लागत आहे. इंजेक्शनबाबत कर्मचाऱ्यांना माहिती असून, आम्हाला नाही. -प्रवीण कारेमोरे, रुग्ण नातेवाईक.
रुग्णालयात माझ्या दादाला आणल्यानंतर लगेच ऑक्सिजन हवे होते; मात्र तब्बल चार तासांनंतर ऑक्सिजन सिलिंडरची व्यवस्था होऊ शकली, त्यातही मोठी रांग पहावयास मिळाली. सिलिंडर मिळेल किंवा नाही, असेच वाटत होते. सध्या माझे दादाला दोन इंजेक्शन लावण्यात आले आहेत. - विनोद पुसाम, रुग्ण नातेवाईक.
आठवडा लोटला असून, सात दिवसात ऑक्सिजनचे दोन सिलिंडर मिळाले. आता रुग्णाची अवस्था चांगली असली तरी केव्हा काय होईल, याचा नेम नाही. अनेक रुग्ण आमच्या डोळ्यादेखत मृत्यू पावले. औषध नियमाप्रमाणे दिली जावी, अशी आमची मागणी आहे. ्प्रमिला घोडेस्वार, रुग्ण नातेवाईक.