सुकळी रेल्वेस्थानक बनले रेतीचे डम्पिंग यार्ड!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2021 04:53 IST2021-02-23T04:53:43+5:302021-02-23T04:53:43+5:30

मोहन भोयर तुमसर : बावनथडी नदीपात्रातील रेती सध्या रेल्वेने नेली जात आहे. याकरिता सुपर रेल्वेस्थानक सध्या रेतीचे डम्पिंग यार्ड ...

Sukli railway station becomes a sand dumping yard! | सुकळी रेल्वेस्थानक बनले रेतीचे डम्पिंग यार्ड!

सुकळी रेल्वेस्थानक बनले रेतीचे डम्पिंग यार्ड!

मोहन भोयर

तुमसर : बावनथडी नदीपात्रातील रेती सध्या रेल्वेने नेली जात आहे. याकरिता सुपर रेल्वेस्थानक सध्या रेतीचे डम्पिंग यार्ड बनले आहे. रेल्वेस्थानकाची येथे तोडफोडही गेल्याचे दिसते. रेल्वेस्थानकातील कार्यालयात कंत्राटदाराचे नोकर वास्तव्याला आहेत. संपूर्ण रेल्वेस्थानक सध्या कंत्राटदाराच्या ताब्यात गेल्याचे येथील चित्र आहे.

मध्यप्रदेश शासनाने बावनथडी नदीपात्रातील घाट लिलावात काढले. परप्रांतातील कंत्राटदारांनी घाट लिलावात घेतले. थेट रेल्वेने रेतीची वाहतूक सुरू आहे. ट्रक व टिप्परने रेती वाहतूक खर्चाची व तेवढीच डोकेदुखीचे काम होते. महसूल व पोलिसांचा ससेमिरा पाठीमागे लागू नये, याकरिता रेल्वेने रेती वाहतूक करण्याचा निर्णय परप्रांतीय कंत्राटदारांनी घेतला. मध्य प्रदेशातील सुकळी येथे प्रवासी गाडीचा थांबा आहे. एरवी येथे रेल्वे कर्मचारी नियुक्ती करण्यात आले नाही.

फलाटावर रेती डम्पिंग : सुकळी रेल्वेस्थानकात कंत्राटदाराने फलाटावर संपूर्ण रेती डम्पिंग केली आहे. फलाटावर जिकडे-तिकडे येथे रेती दिसून येते. जेसीबीने मालवाहतूक गाडीत रेतीचा भरणा करण्यात येतो. सुकळी येथील रेल्वे स्थानक तोडफोड झाली आहे त्यामुळे रेल्वेस्थानकाच्या नुकसान झाले आहे. या संदर्भात रेल्वे प्रशासनाचे दुर्लक्ष दिसत आहे. फलाटावरील जुने वृक्ष तोडली : फलाटावर रेती डम्पिंग करण्याकरिता वृक्षामुळे अडचण निर्माण होत होती. त्यामुळे कंत्राटदाराने येथील फलाटावरील दहा ते बारा मोठे जुने वृक्ष कापले. रेल्वे प्रवासी या वृक्षाखाली प्रवासी गाडीची प्रतीक्षा करीत होते. येथे फलाटावर शेड नाही.

रेती भरण्याकरिता वेळेची मर्यादा

सुकळी येथे रेती माल गाडीत भरण्याकरिता रेल्वे प्रशासनाने वेळेची मर्यादा दिली आहे. यात यंत्राने रेती भरल्यास पाच तास व मजुरांकडून रेती भरल्यास नऊ तास अशी मर्यादा आहे. परंतु येथे रेती यंत्राने भरण्यात येते. यासंदर्भात तुमसर रोड येथील उपविभागीय अभियंता अर्पित खुंटे यांना विचारणा केली असता सदर बाब माझ्या अखत्यारीत येत नाही. सदर प्रकरण वरिष्ठ मुख्य अभियंता सेंट्रल रेल्वे नागपूर यांच्याकडे येते असे सांगितले.

स्थानिक स्तरावर रेल्वे प्रशासनाने विविध अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या केल्या आहेत. नागपूर येथील मुख्यालयातून दूरवर असलेल्या रेल्वेस्थानकाकडे लक्ष देणे शक्य नाही परंतु स्थानिक अधिकारी मात्र मुख्यालयातील अधिकाऱ्याचे नाव सांगून हात वर करीत आहेत. रेल्वेस्थानकाचे नुकसान होत असल्यास स्थानिक अधिकाऱ्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना तसे कळवणे अनिवार्य आहे.

बॉक्स

दुरुस्तीवर लाखोंचा खर्च

सुकळी येथील रेल्वेस्थानकाची दुरवस्था झाली आहे. मुख्य प्लॅटफॉर्मची तोडफोड झाली आहे. त्याची दुरुस्ती करण्याकरिता रेल्वे प्रशासनाला लाखो रुपये खर्च करावे लागणार आहेत. प्रवासी रेल्वे गाडी सुरू झाल्यास प्रवाशांना येथे त्रास होणार आहे याकडे प्रशासनाने लक्ष देण्याची गरज आहे.

Web Title: Sukli railway station becomes a sand dumping yard!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.