साखरेपासून गाठ्या निर्मितीला आला वेग
By Admin | Updated: March 1, 2015 00:37 IST2015-03-01T00:37:40+5:302015-03-01T00:37:40+5:30
होळी व रंगपंचमीचा सण जवळ येताच साखरेपासून निर्मिती करण्यात येणाऱ्या गोड गाठ्या निर्मिती व्यवसायाने जोर पकडला आहे.

साखरेपासून गाठ्या निर्मितीला आला वेग
पवनी : होळी व रंगपंचमीचा सण जवळ येताच साखरेपासून निर्मिती करण्यात येणाऱ्या गोड गाठ्या निर्मिती व्यवसायाने जोर पकडला आहे. यावर्षी साखर काही प्रमाणात स्वस्त झाल्याने गाठ्याही स्वस्त राहणार आहेत.
राज्यामध्ये होळी व धूलिवंदन सणानिमित्त आपल्या नात्यातील व्यक्तींना विशेषत: लहान मुलांना साखरेपासून निर्मिती केलेल्या गोड गाठ्या देण्याची परंपरा शेकडो वर्षापासून सुरू आहे. ती आजही सुरू आहे. शहरातील घोडेघाट वॉर्डातील रविंद्र शिवरकर हे मागील १३ वर्षापासून गाठ्या निर्मितीचे काम करतात. या व्यवसायात त्यांची पत्नी कविता व घरचे मुलेही मदत करतात.
गाठ्या निर्मिती करीता मोठ्या पिंपात साखरेचा पाक तयार करण्यात येतो. या पाकामध्ये साखर, पाणी, दुध आदी घातले जाते. हा पाक मोठ्या भट्टीवर गरम केल्यानंतर हा पाक विविध प्रकारच्या साच्यात घत्तलून विविध प्रकारच्या गाठ्यांची निर्मिती केली जाते. या गाठ्या निर्मिती करण्याकरीता कानपूर, अलाहाबाद आदी ठिकाणच्या कुशल कारागिरांना आणले जाते.
या कारागिरांची एक महिन्यापर्यंत राहण्याची, जेवणाची व्यवस्था केली जाते. यांना एक क्विंटलमागे ४०० रूपये मजुरी दिल्या जाते. एका दिवसात दोन क्विंटल गाठ्यांची निर्मिती केली जाते. याचे त्यांना ८०० रूपये मिळतात. एक क्विंटल साखरेचा ९५ किलो गाठ्यांची निर्मिती होते. या गाठ्या २५, ५०, १००, २००, ५०० व १००० ग्रॅम वजनाच्या तयार केल्या जातात.
यावर्षी काही प्रमाणात साखर स्वस्त झाल्यामुळे गाठ्या सध्या स्वस्त राहणार आहेत. पण रंगपंचमीपर्यंत भाव चढणार आहे. रवींद्र शिवरकर यांनी ६ फेब्रुवारीपासून सुरू केलेल्या गाठ्यांचे उत्पादन आतापर्यंत ५० क्विंटल पर्यंत गेलेले आहे. यावर्षी ७० क्विंटलपर्यंत गाठ्या निर्मिती होणे अपेक्षित आहे. (शहर प्रतिनिधी)