कोरोना संकटात उसाच्या रसाला सुगीचे दिवस!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2021 04:36 IST2021-04-24T04:36:08+5:302021-04-24T04:36:08+5:30
पालांदूर : कोरोनाचे संकट दिवसेंदिवस गडद होत आहे. रुग्णालयात न मावणारी गर्दी रस्त्यावर येत आहे. रुग्णांचे हाल होत आहेत. ...

कोरोना संकटात उसाच्या रसाला सुगीचे दिवस!
पालांदूर : कोरोनाचे संकट दिवसेंदिवस गडद होत आहे. रुग्णालयात न मावणारी गर्दी रस्त्यावर येत आहे. रुग्णांचे हाल होत आहेत. कोरोनाच्या आजारात रुग्णाला अन्न खाण्याची इच्छा नसते. अशा प्रसंगी रुग्णाला व त्याच्या नातेवाईकाला रसवंतीचा मोठा आधार मिळालेला आहे. उसाच्या रसाची मागणी वाढतीवर आहे.
एप्रिल महिन्याचे आरंभापासून कोरोनाने मोठे संकट सर्वांसमोर उभे केलेले आहे. कोरोनाच्या संकटात प्रत्येक व्यक्ती एकमेकांच्या आधाराने उभा राहण्याचा प्रयत्न करीत आहे. संसर्गजन्य आजार असला तरी माणुसकी तेवढी जपत सहयोगाची भूमिका आहे. कोरोनाच्या सावटात रुग्णाला ताप, सर्दी, खोकला हटकून असतो. ताप असल्याने चव नाहीशी होते. दररोजच्या पौष्टिक अन्नाला चवच वाटत नसते. कित्येक रुग्णांनी अन्नच घेणे बंद केलेले असते. अशावेळी जूस अर्थात रस रुग्णाला महत्त्वाचा ठरत आहे. वैद्यकीय सल्ल्यानुसारसुद्धा ज्यूस अर्थात रस रुग्णाला देण्याचा सल्ला देत आहे. ग्रामीण भागात फळांचे ज्यूस दुरापास्त आहेत. अशावेळी ग्रामीण भागात उसाच्या मळ्यातील उसाची कांडी कोरोना रुग्णाला फायदेशीर ठरत आहे. अत्यंत माफक दरात ग्रामीण अर्थव्यवस्थेला पेलणारी रसवंती कोरोना रुग्णांची मदत करीत आहे. दिवसभर रुग्णालयासमोर उभ्या असलेल्या रसवंतीला ग्राहकांची मोठी पसंती मिळत आहे.
बर्फ विरहित उसाचे रस व त्यात लिंबाचे दोन-चार थेंब रुग्णाला अन्नाच्या गरजेत मदत करीत आहे. ग्रामीण भागात लिंबूसुद्धा मोठ्या प्रमाणात असल्याने उसाच्या रसासोबत लिंबाचे रस निश्चितच गुणकारी ठरले आहे. दहा रुपयांचा एक प्याला सर्वांनाच माफक वाटत असल्याने रसवंतीकडे गर्दी खेचत आहे. रुग्णांकरिता रात्रीलासुद्धा बाटलीच्या मार्फत पार्सलसुद्धा ग्राहक मागत आहे. कोरोनाच्या संकटात अन्नाच्या गरजेत रसवंती गुणकारी ठरत आहे.
चौकट /डब्बा
रसवंतीची छोटेखानी असलेली मशीन दररोज स्वच्छ करणे नितांत गरजेचे आहे. उसाच्या कांडीपासून निघालेला रस स्वच्छ गाळून स्वच्छतेला महत्त्व देण्यात यावे. शासनाने पुरविलेल्या कोरोना निर्देशांचे पालन तंतोतंत होणे गरजेचे आहे. मास्क, सोसल डिस्टन्स, स्वच्छता, सॅनिटायझर, आदी घटकांचा तंतोतंत उपयोग करण्यात यावा.