अभ्यास करा... अन् मिळवा विमान प्रवासाची संधी
By Admin | Updated: December 15, 2015 00:41 IST2015-12-15T00:41:55+5:302015-12-15T00:41:55+5:30
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी शिक्षणात खूप पुढे जावे, मोठे अधिकारी बनावे.

अभ्यास करा... अन् मिळवा विमान प्रवासाची संधी
विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी उपक्रम : मोहाडीतील सामाजिक कार्यकर्त्याचा पुढाकार
राजू बांते मोहाडी
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी शिक्षणात खूप पुढे जावे, मोठे अधिकारी बनावे. याशिवाय अभ्यासात अधिक लक्ष देऊन शैक्षणिक वातावरण निर्मिती व्हावी या हेतूने प्रेरित झालेले मोहाडीतील सामाजिक कार्यकर्ते बाबू दिपटे यांनी ‘करा अभ्यास अन् जिंका विमान प्रवास’ अशी प्रेरणादायी योजना सुरु केली आहे.
ग्रामीण भागात शिक्षणाबाबत अजूनही सकारात्मक विचार दिसून येत नाही. प्रवाहासोबत जाताना ग्रामीण भागातील विद्यार्थी अन् त्यांचे पालक शिक्षणाला प्राधान्य देत नाही. शिक्षण घेऊन नोकरी लागते कां?, कलेक्टर बनायचे आहे का?, शिकून करायचं काय? आदी नकारात्म्क प्रश्नांनी ग्रामीण भागातील पालकांमध्ये घर केले आहे. ही नकारात्मक मानसिकता दूर व्हावी, अभ्यासात गोडी निर्माण व्हावी, विद्यार्थ्यांनी स्वत:मध्ये स्पर्धा निर्माण करावी हा दृष्टिकोन बाळगून बाबू दिपटे यांनी ‘करा अभ्यास अन् जिंका विमान प्रवास’ अशा प्रकारचा तालुका गौरव पुरस्कार यावर्षीपासून कार्यान्वित केला आहे.
या गौरव पुरस्कारात मोहाडी, तुमसर, तिरोडा या तालुक्यातील खाजगी, जिल्हा परिषद शाळांमधील इयत्ता १० व १२ वीच्या विद्यार्थ्यांचा समावेश करण्यात आला आहे. तालुक्यातून १० व १२ वीमधून पहिला व दुसरा येणाऱ्या विद्यार्थ्यास नागपूर- मुंबई असा मोफत प्रवास मुंबई दर्शन आणि वातानुकूलीत रेल्वेच्या डब्यातून परतीचा प्रवास करण्याची योजना आखली आहे. हे गुणवंत विद्यार्थी परतून आल्यावर त्यांच्यासाठी मोहाडी येथे प्रेरणा कार्यशाळा आयोजित केली जाणार आहे. या प्रेरणा कार्यशाळेत तालुक्यातून १० वी, १२ वीत प्रथम, द्वितीय विद्यार्थीखेरीज तालुक्यातील पहिले पाच गुणवत्तेत आलेल्या विद्यार्थी व त्यांच्या पालकांचा समावेश करण्यात येणार आहे. या कार्यशाळेला उद्बोधन करण्यासाठी आयएएस, आयपीएस तसेच ज्यांनी प्रतिकूल परिस्थितीतून शिक्षण पूर्ण केले व उच्च पदावर गेले, अशा अधिकाऱ्यांना मार्गदर्शनासाठी बोलावण्यात येणार आहे.
विद्यार्थ्यांनी अभ्यास करा... या योजनेत झोकून द्यावे, विद्यार्थ्यांनी या योजनेतून प्रेरणा घ्यावी, यासाठी बाबू दिपटे यांनी मोहाडी, तुमसर, तिरोडा येथील दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांशी प्रत्यक्ष संवाद साधला आहे. जे उपक्रम शिक्षण विभागाने किंवा मुख्याध्यापकांनी राबवावे अशी अपेक्षा असताना एका सामाजिक कार्यकर्त्यांने शैक्षणिक वातावरण निर्माण करुन विद्यार्थ्यांना अभ्यास करण्याची आवड आणि जिद्द निर्माण व्हावी, विद्यार्थ्यांचे जीवन शिक्षणातून समृध्द व्हावे यासाठी स्वत:ला झोकून दिले आहे. विद्यार्थ्यांच्या यशामध्ये जेवढा वाटा शिक्षक, पालकांचा असतो याशिवाय समाजाचा सक्रीय सहभाग असेल तर शिक्षण क्षेत्रात क्रांती घडू शकते, यावर माझा ठाम विश्वास असल्याचे बाबू दिपटे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.