विद्यार्थ्यांची होणार गुणवत्ता चाचणी
By Admin | Updated: July 17, 2015 00:37 IST2015-07-17T00:37:52+5:302015-07-17T00:37:52+5:30
वाचन, लेखन आणि गणन या मूलभूत अध्ययन क्षमता विद्यार्थ्यांच्या प्राथमिक शिक्षणातील एक महत्त्वाचा टप्पा आहे.

विद्यार्थ्यांची होणार गुणवत्ता चाचणी
भाषा आणि गणिताचे होणार मूल्यमापन
इंद्रपाल कटकवार भंडारा
वाचन, लेखन आणि गणन या मूलभूत अध्ययन क्षमता विद्यार्थ्यांच्या प्राथमिक शिक्षणातील एक महत्त्वाचा टप्पा आहे. त्या अनुषंगाने विद्यार्थ्यांना मोफत व सक्तीचे तसेच दर्जेदार शिक्षण देण्यात येत आहे. परंतु, असे असतानाही अध्ययन संपादनामध्ये राज्यातील शैक्षणिक दर्जा खालावत असल्याचे समोर आले आहे. राज्यातील विद्यार्थ्यांची अध्ययन संपादन पातळी तपासण्यासाठी राज्य स्तरावर अध्ययन संपादणूक सर्वेक्षण करण्यात येणार आहे.
राष्ट्रीय स्तरावर शिक्षणाचे आरोग्य तपासण्यासाठी राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद (एनसीईआरटी) नवी दिल्लीमार्फत २00१ पासून इयत्ता तिसरी, पाचवी आणि आठवी आदी वर्गांचे टप्प्याटप्प्याने अध्ययन करून सर्वेक्षण करण्यात येत आहे. या सर्वेक्षणाच्या आधारे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेचा अहवाल प्रसिद्ध करण्यात येत आहे. याच धर्तीवर राज्यातील शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेमार्फत राज्यातील सर्व जिल्ह्यांच्या अध्ययन संपादन पातळीचा स्तर तपासण्यात येणार असून, भाषा व गणित या विषयावर भर देण्यात येणार आहे. या सर्वेक्षणामध्ये इयत्ता दुसरी ते आठवीमधील विद्यार्थ्यांचे संपादणूक सर्वेक्षण महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद करणार आहे, तर इयत्ता नववी ते दहावीचे अध्ययन संपादणूक सर्वेक्षण महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षा मंडळ करणार आहे. सर्वेक्षणाची व्याप्ती व मर्यादा विचारात घेऊन कृती कार्यक्रमाचे वेळापत्रक तयार करण्यात येणार आहे. त्यासाठी संबंधित संस्थांना सर्वेक्षण समितीची मान्यता घ्यावी लागणार आहे.
काय आहे सर्वेक्षणाचा हेतू?
वेगवेगळ्या वगार्तील गणित, भाषा विषयांच्या अध्ययन संपादणूक पातळीचे मूल्यमापन करणे, अध्ययनातील कठीण क्षेत्रांचा शोध घेणे, विविध सामाजिक गटातील अध्ययन संपादणुकीची तुलना करणे. तसेच ग्रामीण आणि शहरी क्षेत्रनिहाय, लिंगनिहाय, जिल्हानिहाय विद्यार्थ्यांच्या अध्ययन संपादणुकीची तुलना करण्यात येणार आहे. त्यामुळे अध्ययन संपादणुकीची पातळी उंचावण्यासाठी पुनर्नियोजन कृती कार्यक्रमांची आखणी करणे शक्य होणार आहे.
असे होईल सर्वेक्षण
मराठी, इंग्रजी आणि उर्दू माध्यमांच्या मान्यताप्राप्त सर्व व्यवस्थापनाच्या अनुदानित आणि विनाअनुदानित शाळांमध्ये इयत्ता दुसरी ते दहावीच्या वगार्तील प्रथम भाषा आणि गणित या विषयांचे मूलभूत अध्ययन संपादणूक पातळी तपासण्यात येणार आहे. यानंतर सर्वेक्षणाचे निष्कर्ष जिल्हा स्तरापर्यंत काढण्यात येणार असून, प्रत्येक जिल्ह्यातील शाळांची व विद्यार्थ्यांची निवड करण्यात येणार आहे. ज्या इयत्तांसाठी मागील इयत्तांपर्यंतच्या मूलभूत क्षमता व या वषीर्चा प्रथम सत्रापर्यंतचा अभ्यासक्रम राहणार आहे. या अभ्यासक्रमावर घेण्यात येणारी चाचणी परीक्षा वस्तुनिष्ठ आणि बहुपयार्यी प्रश्नांची राहणार आहे. संकलित करण्यात आलेल्या माहितीवरून निष्कर्ष काढण्यात येणार आहेत. या आधारावर अहवाल प्रसिद्ध करण्यात येणार आहे.