विद्यार्थ्यांनो, ध्येय निश्चित करून पाठलाग करा
By Admin | Updated: May 24, 2014 23:23 IST2014-05-24T23:23:53+5:302014-05-24T23:23:53+5:30
विद्यार्थी हा संस्कारक्षम असल्याने त्यावर चांगल्या वाईट संस्कारामुळे तो घडतो तसेच बिघडतो मात्र जीवनात काय व्हायचे आहे, त्याचे मार्ग कोणते व त्यापर्यंत जाण्यासाठीचे उपाय कोणते,

विद्यार्थ्यांनो, ध्येय निश्चित करून पाठलाग करा
लाखनी : विद्यार्थी हा संस्कारक्षम असल्याने त्यावर चांगल्या वाईट संस्कारामुळे तो घडतो तसेच बिघडतो मात्र जीवनात काय व्हायचे आहे, त्याचे मार्ग कोणते व त्यापर्यंत जाण्यासाठीचे उपाय कोणते, याचा मार्ग विद्यार्थ्यांंना गवसल्यास ते निश्चित अशा ध्येयापर्यंत सहज पोहोचू शकतात त्यासाठी विद्यार्थ्यांंनी प्रामाणिकपणे अभ्यासावर लक्ष केंद्रीत करून योग्य ध्येयाची निवड करून त्या ध्येयाचा ध्येय प्राप्तीपर्यंंत सतत पाठपुरावा करावा, असे प्रतिपादन एमपीएससी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या व उपमुख्य कार्यकारी या पदावर पोहोचलेल्या उमेश मधूसूदन नंदागवळी यांनी केले. ध्यास अन्यायाचा या कार्यक्रमातून जिल्हा परीषद कनिष्ठ महाविद्यालय पालांदूर चौ. येथे झालेल्या सत्कार सोहळ्याप्रसंगी विद्यार्थ्यांंना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. या कार्यक्रमात त्यांनी विद्यार्थ्यांंना विद्यार्थी म्हणून कोणकोणत्या जबाबदार्या स्विकारावयाच्या आहेत त्याची ओळख करून दिली. सध्याच्या युगात विद्यार्थ्यांंनी टिकण्यासाठी अतिशय मेहनत, अपार कष्ट, योग्य मार्गदर्शन व निश्चित ध्येय यांची सांगड घालून प्रवास केल्यास निश्चितच यश प्राप्त होईल यात शंका नाही. त्याकरिताच ५ वी पासून स्पर्धा परीक्षांच्या तयारीला लागून पदवी प्राप्त करेपर्यंंत मोठमोठय़ा पदाच्या परीक्षेची तयारी करावी, असे त्यांनी सांगितले व मी तुमच्यातीलच एक सर्वसामान्य विद्यार्थी असून आज या पदावर पोहोचलो असून मला माझ्या गावाचा आदर्श आहे, असे त्यांनी सांगितले. भरत खंडाईत यांनी उमेश नंदागवळी यांचे स्वागत केले. याप्रसंगी प्रमुख अतिथी डॉ.जसवंत जनबंधू, प्रा.गोपाल तलमले यांची भाषणे झालीत. कार्यक्रमासाठी विलास लांजेवार, रेखा निखाडे, युवराज खोब्रागडे हरिश्चंद्र बडोले, सुधाकर ढोणे, विद्या भोयर, सुमेध कांबळे, अंबीर वंजारी, रमेश पालांदूरकर, हेमराज चेटूले यांनी अथक परिश्रम घेतले. संचालन संदीप धकाते यांनी केले तर आभार प्रदर्शन चंदू शिवणकर यांनी केले. यावेळी महाविद्यालयाचे प्राध्यापक, विद्यार्थी उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)