समुपदेशन चाचणीला विद्यार्थ्यांची दांडी
By Admin | Updated: June 15, 2016 00:43 IST2016-06-15T00:43:37+5:302016-06-15T00:43:37+5:30
राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार माध्यमिक स्तरावर व्यवसाय, मार्गदर्शन व समुपदेशन अंतर्गत शालेय शिक्षण....

समुपदेशन चाचणीला विद्यार्थ्यांची दांडी
कलचाचणीचा उपयोग काय? : लक्ष्यांक उद्दिष्टाची जबाबदारी कुणावर?
भंडारा : राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार माध्यमिक स्तरावर व्यवसाय, मार्गदर्शन व समुपदेशन अंतर्गत शालेय शिक्षण विभागातर्फे फेब्रुवारी महिन्यात विद्यार्थ्यांची कलचाचणी घेण्यात आली होती. निकालानंतर ६ ते १६ जून यादरम्यान या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक समुपदेशन होत असून यात आतापर्यंत फक्त चार विद्यार्थ्यांचेच समुपदेशन झाले आहे.
हजारोंच्या संख्येने परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांपैकी फक्त चार विद्यार्थ्यांचे समुपदेशन झाल्याने फेब्रुवारी महिन्यात झालेल्या कलचाचणीचा कल निकालानंतर समुपदेशनाअभावी अपूर्ण राहिला आहे.
याची सर्वस्वी जबाबदारी कुणाची, पालकांची की शिक्षण विभागाची, असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित झाला आहे. ज्याप्रमाणे शासन निर्णय अंतर्गत कलचाचणी प्रत्येक विद्यार्थ्यासाठी आवश्यक करण्यात आली होती. त्याच धर्तीवर समुपदेशन चाचणी अनिवार्य नसल्याने या चाचणीकडे विद्यार्थ्यांनी पाठ केली आहे.
यावर्षीच्या १० वीच्या निकालात नागपूर विभागातून भंडारा जिल्हा चवथ्या स्थानावर आहे. जिल्ह्यात दहावीच्या २८६ शाळा आहेत. यावर्षी जिल्ह्यातून २०,३७४ विद्यार्थ्यांनी परिक्षेसाठी नोंदणी केली होती. यात १०,२२६ मुले तर १००९५ मुलींनी परिक्षा दिली. यापैकी ८,३१६ मुले व ८,७५८ मुली उर्तीर्ण झाल्या. मात्र जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेत विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध असलेल्या समुपदेशनांतर्गत विद्यार्थ्यांनी याकडे कानाडोळा केला आहे.
या समुपदेशनात विद्यार्थ्यांचा कल विचारात घेऊन त्यांना त्यांच्या आवडीनुसार व क्षमतेनुसार वेळीच शैक्षणिक क्षेत्र निवडीसाठी मदत केल्यास त्यांच्या उपजत कलागुणांना पुरेसा वाव मिळतो.
राज्याच्या शैक्षणिक आकृतिबंध विचारात घेता प्रत्येक टप्प्यावर विद्यार्थ्यांना उपलब्ध असलेल्या विविध शैक्षणिक क्षेत्रांची व व्यवसायांची माहिती या समुपदेशनातून दिली जात असते. विद्यार्थ्यांना स्वत:चा कुटुंबाबरोबरच भारतीय समाज रचनेचा एक जबाबदार व सुसंस्कृत नागरिक घडविण्याची जबाबदारी पालक आणि शाळेची आहे. त्याकरीता विद्यार्थ्यांना अनुरूप मार्गदर्शन व सहाय्य देण्याची गरज आहे. विद्यार्थ्यांचे मानसशास्त्रीय कसोट्यांच्या आधारे विविध शैक्षणिक क्षेत्रासंबंधात मार्गदर्शन व समुपदेशन करण्याची शासनाची रूपरेषा होती. परंतु कलचाचणी नंतर समुपदेशनाचा कार्यक्रम सपशेल फेल ठरला आहे.
समुपदेशनासाठी जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण महाविद्यालय (डी.एड.) येथे तीन समुपदेशकांची नियुक्ती करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांच्या उच्च शिक्षणाकडे वाढणारा कल लक्षात घेता त्यांना यासंदर्भात शास्त्रीयदृष्ट्या योग्य मार्गदर्शन मिळणे गरजेचे असताना समुपदेशनाचे कार्य अधांतरी राहिले आहे.
विशेष म्हणजे १० वीचा निकाल लागून नऊ दिवसांचा कालावधी लोटूनही समुपदेशनासाठी विद्यार्थी गोळा होवू शकले नाही. याबाबत शिक्षण विभागावर आत्मचिंतन करण्याची वेळ आली आहे. विद्यार्थ्यांचा कल चाचणीचा निकाल व प्रवेश प्रक्रिया यांचा कोणताही संबंध नसला तरी विद्यार्थ्यांच्या सर्वांगिण विकासाअंतर्गत समुपदेशन हा उपक्रम यशस्वी होवू शकलेला नाही. (प्रतिनिधी)