लोकसहभागाअभावी तंटामुक्त चळवळीला मरगळ

By Admin | Updated: December 3, 2014 22:45 IST2014-12-03T22:45:05+5:302014-12-03T22:45:05+5:30

शांततेतून समृद्धीकडे नेणाऱ्या महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहिमेला भंडारा जिल्ह्यात मरगळ आल्याचे दिसत आहे. सुरूवातीलच्या काही वर्षात तालुक्यात या मोहिमेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

The struggle for non-participation of the people is inconclusive | लोकसहभागाअभावी तंटामुक्त चळवळीला मरगळ

लोकसहभागाअभावी तंटामुक्त चळवळीला मरगळ

भंडारा : शांततेतून समृद्धीकडे नेणाऱ्या महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहिमेला भंडारा जिल्ह्यात मरगळ आल्याचे दिसत आहे. सुरूवातीलच्या काही वर्षात तालुक्यात या मोहिमेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. परंतु आता ही मरगळ आली आहे. मरगळ झटकण्यासाठी जनजागृतीची गरज असून तंटामुक्त गाव समितीच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकी घेण्याची गरज आहे.
गावात शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी गावकऱ्यांनी मनापासून सहकार्य केले तरच पोलीस, महसूल व न्यायालयीन यंत्रणेवरील ताण कमी होईल. आपसातील प्रकरणे तडजोडीने निकाली काढण्यासाठी लोकन्यायालयाची संकल्पना देखील प्रभावी माध्यम ठरत आहे. विकास ही एक प्रक्रिया असून त्यासाठी राजकारण विरहित प्रयत्नांची गरज आहे. परंतु सर्वसामान्य ग्रामीण लोकांच्या समस्यांचे भांडवल करीत प्रस्थापितवर्ग त्यांचे सामाजिक, राजकीय आणि आर्थिक शोषण करीत असल्याने या शोषित ग्रामीण घटकांच्या वर्गामध्ये जोपर्यंत व्यक्तीगत क्षमता आणि वैचारिक परिवर्तन होत नाही. यासाठी व्यापक जनजागृतीच्या चळवळीची गरज आहे.
महात्मा गांधी तंटामुक्त अभियानास प्रोत्साहन देण्याच्या दृष्टीने हा खर्च ठिक आहे पण दिलेली जबाबदारी पार पाडण्यासाठी तंटामुक्त समितीच्या पदाधिकाऱ्यांना प्रशिक्षणाची आवश्यकता आहे. सामाजिक, शैक्षणिक व सांस्कृतिक जबाबदारी व समाजातील कार्याबद्दलची उजळणी तंटामुक्त समितीच्या सदस्यांमध्ये असली पाहिजे.
तंटामुक्त समितीचे थाटात गठण केले जाते. मात्र जबाबदारीने कामे करताना दिसत नाही. परंतु याचे श्रेय पोलीस प्रशासन घेतानाचेही चित्र आहे. पोलीस प्रशासनावर कामाचा व्याप खूप असल्यामुळे तंटामुक्ती समितीकडे हव्या त्या प्रमाणात लक्ष पुरविले जात नाही. समिती सदस्य अल्पशिक्षित असल्यामुळे त्यांना शासनाकडून आलेले परिपत्रकसुद्धा नीट समजत नाही. पोलीस पाटलांची जवळपास तीच गत, त्यातच समितीचे पदाधिकारी राजकीय पक्षांशी संबंधित असतात.
गावातील गटातटाच्या राजकारणामुळे अधिक तंटे निर्माण झाल्याची अनेक उदाहरणे आहेत. पोलीस प्रशासनाकडून तंटामुक्त समितीच्या पदाधिकाऱ्यांच्या वारंवार बैठकांचे आयोजन होणे गरजेचे आहे. पदाधिकाऱ्यांना समाजाभिमूख प्रशिक्षण देवून तंटामुक्तीच्या कार्यात पारदर्शकता निर्माण करावी. तंटामुक्तीचे कार्य एन दोन दिवसांचे नसून सर्वांच्या पुढाकारानेच गावातील तंटे हद्दपार होऊ शकतील. या मोहिमेचे व्यापक यश केवळ लोकसहभागावरच अवलंबून असून त्यासाठी जनजागृतीची आवश्यकता असल्याचे मत अनेक जाणकारांकडून व्यक्त होत आहे हे मात्र खरे. (शहर प्रतिनिधी)

Web Title: The struggle for non-participation of the people is inconclusive

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.