पालांदूर : पावसाने दडी मारल्याने श्रावण सरी ऐवजी घामाच्या धारा वाहत असून असह्य उकाड्याने जनजीवन प्रभावित आहे. दिवसाला घामाच्या व रात्रीला पावसाच्या धारा असे निसर्गाचं चक्र दोन दिवसांपासून अनुभवायला येत आहे. यंदा पाऊस रूसल्यासारखा दिसत असून शेतकऱ्यांनाच नव्हे तर सर्वांना जोरदार पावसाची अपेक्षा आहे.
ऑगस्ट महिन्यात पावसाचा समजला जातो. याच महिन्याच्या भरवशावर वर्षभराच्या पाण्याचे नियोजन केले जातो. पिण्यासाठी, शेतीसाठी, उद्योगधंद्यासाठी भूजल पातळी अत्यंत महत्त्वाचा आहे. गतवर्षीच्या तुलनेत या वर्षी ऑगस्ट महिन्यात अपेक्षित पाऊस झाला नाही. गत वर्षी ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यात संपूर्ण भंडारा जिल्ह्याला महापुराने बेजार केले होते. धरणे, तलाव, बोडी, ओव्हरफ्लो होत धान पिकाचे मोठे नुकसान झाले होते. कित्येकांचे घरसुद्धा पाण्याखाली आले होते. परिस्थिती पूर्वपदावर येण्याकरता किमान हप्ता बराच कालावधी लोटला होता. परंतु या वर्षात मात्र पाऊस रुसल्यासारखा येत आहे. कुठे पडतो तर कुठे अजिबातच पडत नाही. जिल्ह्याच्या काही भागातील रोवणी नुकतीच आटोपलेली आहेत. तर पालांदूर शेजारील एक-दोन गावात रोवणी काही शेतकऱ्यांनी पाण्याअभावी केलेली नाही.
बॉक्स
रोगराईला आमंत्रण
वातावरणातील बदलामुळे डासांची उत्पत्ती मोठ्या प्रमाणात झालेली आहे. त्यांचे नियंत्रण करण्याकरिता प्रशासन अपुरे पडत आहे. पालांदूर व परिसरात डेंग्यूसदृश आजाराचे रुग्ण वाढतच आहेत. सर्दी, ताप, खोकला आदीचेसुद्धा रुग्ण दिसत आहेत. उष्ण-दमट हवामानामुळे जनजीवन प्रभावित झाल्याने आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
रात्रीला येतो पाऊस
पालांदूर परिसरात दोन दिवसापासून रात्रीच्या सुमारास सामान्य स्वरूपाचा पाऊस पडतो आहे. हा पाऊस समान न पडता तीन किलोमीटर परिसरातच पडताना दिसतो. त्यामुळे ‘कही खुशी कही गम’ अशी अवस्था अनुभवास येते.
मोठ्या पावसाची अपेक्षा
जिल्ह्यातील शेती महत्त्वाचा आधार आहे. शेतीला पाण्याची नितांत गरज आहे. पावसाळ्याचे दिवस असल्याने दररोज किंवा एक-दोन दिवसांआड मोठ्या पावसाची गरज आहे. परंतु अजूनही दोन महिन्याचा कालावधी लोटून मोठा पाऊस झालाच नाही. नदी-नाले पोटातच प्रवाहित आहेत. त्यामुळे भूजल क्षमता अपेक्षित वाढलेली नसल्याने उद्याची शेती चिंतेचा विषय ठरत आहे.
धान पिकावर रोगराईचे सावट!
वातावरणातील बदलामुळे धान पीक रोगराईच्या सावटात आहे. खोडकिडी, गादमासी, करपा, कडा करपा आधी रोगांची लागण धान पिकावर झालेली आहे.