कोविड रुग्णांना रेफर टू भंडारा थांबवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2021 04:36 IST2021-04-22T04:36:31+5:302021-04-22T04:36:31+5:30
लाखांदूर : तालुका राष्ट्रवादी काँग्रेसची मागणी लाखांदूर : देशात सर्वत्र कोरोना आजाराचे संक्रमण टाळण्यासाठी विविध उपाययोजना आखल्या जात ...

कोविड रुग्णांना रेफर टू भंडारा थांबवा
लाखांदूर : तालुका राष्ट्रवादी काँग्रेसची मागणी
लाखांदूर :
देशात सर्वत्र कोरोना आजाराचे संक्रमण टाळण्यासाठी विविध उपाययोजना आखल्या जात असतानाच लाखांदूर येथील कोविड केअर सेंटरमध्ये असलेल्या अपुऱ्या सुविधेने रुग्णांना रेफर टू भंडारा केले जात असतानाची बाब चिंतनीय असून, तालुक्यातील कोविड केअर सेंटरमध्ये सर्व सुविधा तात्काळ उपलब्ध करा व रुग्णांना रेफर टू भंडारा थांबवा, अशी मागणी लाखांदूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनेकरण्यात आली आहे.
या मागणीचे निवेदन लाखांदूर तहसीलदारांमार्फत जिल्हाधिकाऱ्यांना २० एप्रिल रोजी पाठविण्यात आले.
सध्या जिल्ह्यात सर्वत्रच कोरोनाबाधित रुग्ण आढळून येत आहेत. लाखांदूर तालुक्यातही या कोरोनाबाधित रुग्णांची संख्या अधिक असून त्यांना गृ़हविलगीकरणात ठेवण्यात येत असल्याची माहिती होती. त्यानुसार तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने ४ एप्रिल रोजी केलेल्या मागणीने ९ एप्रिल रोजी तालुक्यात शासकीय मुलींच्या वसतिगृहात कोविड केअर सेंटर सुरू करण्यात आले.
सध्याच्या घडीला तालुक्यातील सर्वच गावांत कोरोनाबाधित रुग्ण आढळून येत असून येथील ७ गावे प्रतिबंधित केली आहेत.
सध्या कोरोनाबाधित रुग्णांना लाखांदूर येथील कोविड केअर सेंटरमध्ये ठेवले जात आहे; मात्र सदरच्या कोविड केअर सेंटरमध्ये अपुऱ्या सुविधा असल्याने रुग्णांना रेफर टू भंडारा केले जात आहे.
लाखांदूर ते भंडारा हे अंतर जवळपास दोन तासांचे असून यात रुग्णाला भंडारा येथे घेऊन जात असताना अनेक जण दगावल्याचीही माहिती आहे. लाखांदूर येथील कोविड केअर सेंटरमध्ये व्हेंटिलेटर, ऑक्सिजन, रेमडेसिविर, एक्स-रे मशीन, सिटी स्कॅन मशीन व कोविड उपयुक्त सर्व सुविधा उपलब्ध करण्याची मागणी निवेदनातून केली आहे.
सदर मागणीचे निवेदन लाखांदूरचे नायब तहसीलदार अखिलभारत मेश्राम यांच्यामार्फत जिल्हाधिकाऱ्यांना देतेवेळी तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष बालु चुन्ने, राकाँ शहर अध्यक्ष ॲड. मोहन राऊत, सुभाष दिवटे, मंगेश ब्राह्मणकर, सचिन बरये, संजय नहाले, सचिन मेंढे, सुनील मेंढे यांसह अन्य पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.