लोकमत न्यूज नेटवर्कजवाहरनगर (भंडारा) : भंडारा तालुक्यातील परसोडी परिसरात आकाशातून दगडाचे दोन तुकडे पडल्याची घटना समोर आली. अचानक घडलेल्या या घटनेने नागरिक भयभीत झाले. वैज्ञानिक कुतूहलही निर्माण झाले आहे. ९ जानेवारीला सायंकाळच्या सुमारास घडलेला हा प्रकार उल्का पडण्याचा असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. मात्र, हे दगड हलक्या वजनाचे असल्याने खगोलीय अभ्यासकांना याचा अभ्यास करावा लागणार आहे.
दोन्ही दगड पोलिस प्रशासनाच्या स्वाधीन करण्यात आले. परसोडी येथील सुगत बुद्ध विहाराजवळ राहणाऱ्या किशोर वाहने यांनी या घटनेची माहिती जवाहरनगर पोलिस ठाण्यात दिली. ही घटना १० जानेवारी रोजी सायंकाळी ७ते ७:१५ वाजेच्या सुमारास घडली. परसोडी गावाजवळील एका मोकळ्या ले-आउटच्या जागेत काही लहान मुले शेकोटी पेटवून विस्तव शेकत होती. त्याच वेळी, अचानक आकाशातून काही तरी जळत खाली येत असल्याचे दिसले. बघता बघता, सिमेंटच्या रंगाचे दोन तुकडे वेगाने जमिनीवर पडले. हे तुकडे पडताना जळत होते. मात्र, जमिनीवर आदळल्यानंतर त्यांचा आवाज फारसा झाला नाही. सुदैवाने, हे तुकडे मुलांच्या अंगावर पडले नाही. मुलांनी शनिवार सकाळी याची माहिती किशोर वाहने यांना दिली. वाहने यांनी दगडांची पाहणी केली व पोलिसांना माहिती दिली. वाहने यांनी ११ जानेवारीला सकाळी ९ वाजता हे दोन्ही तुकडे पोलिस ठाण्यात जमा केले. दगडांचे नमुने सखोल तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. अभिषेक नामदास यांनी दिलेल्या माहितीनुसार कलकत्ता येथील वरिष्ठ चमू तपासणीसाठी येणार आहे.
"सिमेंटच्या रंगाचे; परंतु वजनाला अत्यंत हलके आहे. आकाशातून पडलेली कोणतीही वस्तू सामान्यतः धातूची किंवा दगडाची (उल्का) असते. मात्र, या वस्तूंचे 'हलके वजन' हा चर्चेचा आणि संशोधनाचा विषय आहे. सौरमंडळातील अवास्तव पदार्थ पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणामुळे ओढले जातात. ते तप्त असतात. त्यांना लहान शुभ्र ग्रह असेही संबोधतात."- डॉ. वंदना मोटघरे, भूगोल विभागप्रमुख, ओम सत्यसाई महाविद्यालय, परसोडी.
Web Summary : Stone pieces fell from the sky in Bhandara's Parsoodi. Locals are frightened, suspecting a meteorite. The light stones are under investigation. Authorities are examining the objects.
Web Summary : भंडारा के परसोडी में आकाश से पत्थर के टुकड़े गिरे। स्थानीय लोग उल्कापिंड होने के संदेह से भयभीत हैं। हल्के पत्थरों की जांच चल रही है। अधिकारी वस्तुओं की जांच कर रहे हैं।