राज्यस्तरीय बाह्य मूल्यांकनास जिल्ह्यातील दोन शाळांची निवड
By Admin | Updated: March 23, 2016 00:45 IST2016-03-23T00:45:28+5:302016-03-23T00:45:28+5:30
राज्यस्तरीय शाळा मुल्यांकनासाठी जिल्हा परिषदच्या दोन शाळांची निवड करण्यात आली आहे.

राज्यस्तरीय बाह्य मूल्यांकनास जिल्ह्यातील दोन शाळांची निवड
हिंगणा, खराशी शाळेचा समावेश : २८ मार्चला निर्धारक पथक येणार
मोहन भोयर भंडारा
राज्यस्तरीय शाळा मुल्यांकनासाठी जिल्हा परिषदच्या दोन शाळांची निवड करण्यात आली आहे. यात तुमसर तालुक्यातील हिंगणा व लाखनी तालुक्यातील खराशी शाळांचा समावेश आहे.
या दोन्ही शाळांच्या तपासणीसाठी २८ मार्च रोजी बाह्य निर्धारक शाळेतील भौतिक सुविधा, शैक्षणिक अभिलेखे आदींची तपासणी करण्यासाठी एक समिती दाखल होत आहे.
जिल्हा परिषदेच्या शाळा हायटेक करणे व आधुनिक काळात इंग्रजी शाळात स्पर्धा निर्माण झाली आहे. इंग्रजी माध्यमांच्या शाळेपेक्षा आपणही कमी नाही. हा उद्देश समोर ठेवून या शाळांनी नव्याने वाटचाल सुरु केली आहे. लोकसहभागातून वर्गणी गोळा करून संगणक खरेदी करण्यात आले. एका वर्षात हिंगणा येथील शाळेचा चेहरामोहरा बदलून गेला. विद्यार्थी बचत गटात आठ महिन्यात २० हजार रुपये जमा करण्यात आले.
हिंगणा या गावाची लोकसंख्या १,३०३ इतकी असून गावाच्या मध्यभागी पाच हजार चौरास फुटात देखणी इमारत उभी आहे. हिरवळ व लहान उद्यान सर्वांचे लक्ष वेधून घेतो. गावात १९५४ मध्ये शाळा सुरु झाली होती. १ ते ८ वर्ग असून ६७ विद्यार्थिनी व ७१ विद्यार्थ्यांची पटसंख्या आहे. कॉन्व्हेंटसारख्या गणवेश येथील विद्यार्थ्यांचा आहे. ज्ञानरचनावाद उपक्रम येथे राबविण्यात येत असून मुख्याध्यापक एस.टी. पारधी व इतर पाच शिक्षक येथे कार्यरत आहे. लाखनी तालुक्यातील खराशी शाळेचा आदर्श घेऊन या शाळेने आठ महिन्यापूर्वी वाटचाल सुरु केली. आठ महिन्यानंतर राज्यातील ६२ शाळेत या शाळेने स्थान पटकाविले हे विशेष. खराशी शाळेचे मुख्याध्यापक मुबारक सैय्यद यांनी या शाळेला भेट देऊन मार्गदर्शन केले होते.
हिंगणा येथील जिल्हा परिषद शाळेत भौतिक सुविधा शैक्षणिक अभिलेखे व इतर सर्व सुविधा उपलब्ध असून विद्यार्थी सुद्धा अपडेट आहेत. राज्यस्तरीय बाह्य मुल्यांकनाकरिता निवड होणे ही आमच्याकरिता अभिमानाची बाब आहे.
-विजय आदमने
वरिष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी पंचायत समिती, तुमसर
जिल्ह्यातील दोन शाळांची राज्यस्तरीय शाळा मुल्यांकनासाठी निवड झाली आहे. खराशी व हिंगणा या शाळांनी अन्य शाळांसमोर आदर्श घातला आहे. दोन्ही शाळांची शैक्षणिक प्रगतीचा राज्यस्तरीय शाळा मुल्यांकन समिती योग्य अहवाल राज्य शासनाकडे सादर करेल.
-किसन शेंडे
शिक्षणाधिकारी, भंडारा.