ग्रामपंचायत स्तरावर अपना सीएससी सेवेला प्रारंभ
By Admin | Updated: June 18, 2014 00:04 IST2014-06-18T00:04:00+5:302014-06-18T00:04:00+5:30
गावस्तरावर विविध संगणीकृत सुविधा उपलब्ध राहत नसल्यामुळे नागरिकांना तालुका, जिल्हा स्तरावर जावून सुविधेचा लाभ घ्यावा लागत असल्यामुळे वेळ व पैसा खर्च होत आहे. पण स्थानिक स्तरावर

ग्रामपंचायत स्तरावर अपना सीएससी सेवेला प्रारंभ
भंडारा : गावस्तरावर विविध संगणीकृत सुविधा उपलब्ध राहत नसल्यामुळे नागरिकांना तालुका, जिल्हा स्तरावर जावून सुविधेचा लाभ घ्यावा लागत असल्यामुळे वेळ व पैसा खर्च होत आहे. पण स्थानिक स्तरावर ही सुविधा उपलब्ध व्हावी याकरीता संग्राम कक्ष, जिल्हा परिषद भंडारा यांचे वतीने दिनांक १२ जूनला ग्रामपंचायत अड्याळ, पंचायत समिती पवनी येथे अपना सीएससी या सेवेचा शुभारंभ डॉ. माधवी खोडे यांचे हस्ते करण्यात आला. या सेवेमुळे नागरिकांना २७ प्रकारच्या सेवांचा लाभ घेता येणार आहे.
अपना सीएससी सेवेच्या शुभारंभ कार्यक्रमाप्रसंगी मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल द्विवेदी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत) मंजुषा ठवकर, संग्रामचे जिल्हा प्रकल्प व्यवस्थापक निषुम खरबीकर, सरपंच, उपसरपंच, सदस्य, सचिव उपस्थित होते. भंडारा जिल्ह्यात अपना सीएससी सेवेचा प्रारंभ ११० ग्रामपंचायतमध्ये संग्राम केंद्रात करण्यात आला. या सेवेच्या माध्यमातून सी.एस.सी. बाजार, मोबाईल बिल पेमेंट, मोबाईल रिचार्ज, मायक्रोसॉफ्ट ई लर्निंग दक्षता, बस तिकीट बुकींग, अपोलो टेलिमेडीसीन, निवडणूक आयोग सुविधा, प्रौढ शिक्षण, संगणक साक्षरता, आॅनलाईन निकाल, शिक्षणासंबंधी सुविधा, मार्केटमधील मालाची किंमत, हवामान माहिती, पॅनकार्ड, आधारकार्ड पिंटींगसह २७ सेवांना ग्रामपंचायत स्तरावर प्रारंभ करण्यात आला आहे. ह्या सुविधांचा नागरिकांना लाभ घेता येणार आहे.याप्रसंगी जिल्हाधिकारी डॉ.माधवी खोडे म्हणाल्या, गावस्तरावर संगणीकृत संबंधी सुविधा उपलब्ध राहत नसल्यामुळे तालुका, जिल्ह्याच्या ठिकाणी जावून मुले, मुली, नागरिक ह्यासेवेचा लाभ घेतात. पण जाण्या-येण्यात वेळ पैसा खर्ची होतो. ग्रामपंचायतवरील संग्राम केंद्रात अपना सीएससी सेवेचा शुभारंभ झाल्यामुळे नागरिकांना सोईचे होणार आहे. वेळ पैसाची बचत होण्यासोबतच नवीन नवीन माहिती त्वरितच उपलब्ध होणार असल्याचे मत व्यक्त करुन नागरिकांनी या सेवेचा अवश्य लाभ घ्यावा असे आवाहन केले. मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल द्विवेदी म्हणाले, ही सेवा मोलाची ठरेल.
जिल्ह्यात ११० गावांमध्ये सुरू करण्यात आलेली ही सेवा महिनाभरात उर्वरित ग्रामपंचायत मधील संग्राम केंद्रात सुरू करण्यात येणार असून विदर्भात भंडारा जिल्ह्यातील तुमसर तालुक्यात ग्रामपंचायत नवरगाव येथे एलआयसीची किस्त लाभार्थ्याने प्रथमच या सेवेच्या माध्यमातून भरल्याचे जिल्हा समन्वयक मोहीत चौबे यांनी सांगितले. अड्याळ ग्रामपंचायतमध्ये या सेवेचा शुभारंभ करण्यात आल्याने नागरिकांना ह्या सेवेचा अवश्य लाभ होईल, असे ग्रामपंचायत पदाधिकारी यांनी समाधान व्यक्त केले. (जिल्हा प्रतिनिधी)