पऱ्हे टाकणीला प्रारंभ
By Admin | Updated: June 19, 2014 23:40 IST2014-06-19T23:40:19+5:302014-06-19T23:40:19+5:30
धानाचा जिल्हा असलेल्या भंडारा जिल्ह्यातील शेतकरी पावसाची आतुरतेने वाट पाहत होता. आज दमदार पावसाने हजेरी लावल्यानंतर शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे भाव दिसून आले. पावसाने हजेरी लावल्यानंतर

पऱ्हे टाकणीला प्रारंभ
शेतकरी आनंदीत : जिल्ह्यात पावसाची दमदार हजेरी
भंडारा : धानाचा जिल्हा असलेल्या भंडारा जिल्ह्यातील शेतकरी पावसाची आतुरतेने वाट पाहत होता. आज दमदार पावसाने हजेरी लावल्यानंतर शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे भाव दिसून आले. पावसाने हजेरी लावल्यानंतर शेतकऱ्यांनी पऱ्हे टाकण्याला प्रारंभ केला आहे. भंडारा जिल्ह्यात सर्वाधिक धानाचे उत्पादन घेतले जाते. बहुतांश शेती निसर्गाच्या पाण्यावर अवलंबून असल्यामुळे शेतकरी चातकाप्रमाणे पावसाची वाट बघत होते.
दोन दिवसाच्या पावसाने शेतकऱ्याची प्रतिक्षा संपुष्टात आली. शेतकरी पऱ्हे घालण्यासाठी सज्ज झालेला आहे. पावसाळा सुरु होण्याच्या काही दिवसापूर्वीपासूनच शेतकरी तयारीला लागला होता. धुऱ्यावरील कचरा पेटविणे, शेतामध्ये शेणखत घालणे यासारखी कामे करण्यात आली. बँक, सोसायटीमधून कृषी कर्जाची उचलसुद्धा केली. बियाणे खरेदीला जोर आला आहे.
मजुरांना सुगीचे दिवस
शेतीचा हंगाम सुरु होताच मजुरांची सुद्धा मागणी वाढत असते. रोजगार योजनेची हमीचे कामे बंद पडली असून मजूर शेतीच्या कामाकडे वळलेला आहे. शेतीच्या कामावर मजुरांची मजुरी वाढलेली असल्यामुळे मजुरांना सुगीचे दिवस येणार आहेत.
पालांदुरात पेरणी प्रभावित
पावसाळ्याचे नक्षत्र कोरडे जात असल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये भिती बळावली आहे. बियाणे खरेदी करायचे की नाही या विवंचनेत शेतकरी कृषी केंद्रावर गर्दी करीत आहे. हलक्या धानाला मागणी वाढत असून बारीक वाणाची चौकशी शेतकरी करीत आहे. मान्सून दरवर्षीपेक्षा माघारल्याने जलसाठे कोरडे पडल्याने पिण्याच्या पाण्याची समस्या वाढली आहे. माकडांचे कळप गावात पानवठ्याजवळ, विहिर ओढ्यावर, बोअरवेल्सजवळ, घराच्या अंगधुणीत पाण्याकरिता येत आहेत. यात बच्चे कंपनीचे चांगलेच मनोरंजन होत असून माकडांमुळे कवेलू घरांचे मोठे नुकसान होत आहे. (लोकमत चमू)