एसटीचा संप, खासगीचे तिकीट दुप्पट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 11, 2021 05:00 IST2021-11-11T05:00:00+5:302021-11-11T05:00:48+5:30
राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या संपाने बस वाहतूक पूर्णत: ठप्प झाली आहे. भंडारा विभागातील कर्मचारी ३० ऑक्टाेबरपासून संपावर गेले; परंतु सुरुवातीच्या पाच दिवसांत फारसा परिणाम दिसत नव्हता. तुरळक बससेवा सुरू हाेती; परंतु ऐन लक्ष्मीपूजनाच्या दिवसापासून एस.टी.च्या भंडारा विभागातील सहाही आगारांचे जवळपास दीड हजार कर्मचारी संपावर गेले आहेत. त्यात चालक, वाहक आणि प्रशासकीय कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. त्यामुळे गत पाच दिवसांपासून आगारातून एकही बस बाहेर पडली नाही.

एसटीचा संप, खासगीचे तिकीट दुप्पट
लाेकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : दिवाळीच्या पर्वात राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी संपाचे हत्यार उचलले आणि खासगी वाहतूकदारांची चांदी झाली. एस.टी.पेक्षा दुप्पट भाडे आकारून प्रवासी वाहतूक सुरू आहे. बसस्थानकाबाहेर ठिय्या मांडून प्रवाशांना अक्षरश: जनावरांप्रमाणे खासगी वाहनांत काेंबले जात आहे. नाइलाज असल्याने प्रवासीही गप्प आहेत.
राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या संपाने बस वाहतूक पूर्णत: ठप्प झाली आहे. भंडारा विभागातील कर्मचारी ३० ऑक्टाेबरपासून संपावर गेले; परंतु सुरुवातीच्या पाच दिवसांत फारसा परिणाम दिसत नव्हता. तुरळक बससेवा सुरू हाेती; परंतु ऐन लक्ष्मीपूजनाच्या दिवसापासून एस.टी.च्या भंडारा विभागातील सहाही आगारांचे जवळपास दीड हजार कर्मचारी संपावर गेले आहेत. त्यात चालक, वाहक आणि प्रशासकीय कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. त्यामुळे गत पाच दिवसांपासून आगारातून एकही बस बाहेर पडली नाही. एकीकडे दिवाळीनिमित्त हाेणारे एस.टी. महामंडळाचे राेजचे ४५ लाखांचे उत्पन्न बुडत आहे; तर दुसरीकडे प्रवाशांना बाहेरगावी जाताना विविध अडचणींचा सामना करावा लागत आहे.
भंडारा येथून नागपूर येथे जाणाऱ्या प्रवाशांची संख्या माेठी असते. रात्री ९.३० पर्यंत दर १५ मिनिटांनी एस.टी. बस असते. प्रत्येक बस प्रवाशांनी खच्चून भरून जाते. मात्र आता संप असल्याने प्रवाशांना खासगी वाहनाचा आधार घ्यावा लागत आहे. संपाचा गैरफायदा घेत खासगी वाहतूकदारांनी भंडारा-नागपूर तिकीट २०० ते २५० रुपये केले आहे. त्यातही जनावरांप्रमाणे प्रवाशांना काेंबले जात आहे. नाइलाज असल्याने प्रवासी बाेलायला तयार नाहीत.
भंडारासाेबतच साकाेली, तुमसर, गाेंदिया, पवनी या मार्गावरही एसटीची प्रवासी वाहतूक असते. त्रिमूर्ती चाैकात तर खासगी वाहतूकदार जाेरजाेराने ओरडून गावाचे नाव घेत आहेत. हा प्रकार खुलेआम सुरू असून संपामुळे परिवहन विभाग व पाेलीसही कारवाई करण्यास मागेपुढे पाहत आहेत.
बसस्थानकांत शुकशुकाट
- जिल्ह्यातील तुमसर, पवनी, साकाेली आणि भंडारा बसस्थानकांत सध्या शुकशुकाट आहे. काही प्रवासी बसची एखादी फेरी निघेल या आशेने बसस्थानकात येतात; परंतु तेथे काेणतीही बस येत नाही. त्यामुळे प्रवासी बसस्थानकांवर असलेल्या खासगी वाहतूकदारांकडे धाव घेत आहेत. या संपाने एसटी महामंडळाचे प्रचंड नुकसान हाेत असून, प्रवाशांचीही लूट हाेत आहे.