एस.टी. ४.३६ कोटी रूपयांनी तोट्यात

By Admin | Updated: May 1, 2017 00:21 IST2017-05-01T00:21:56+5:302017-05-01T00:21:56+5:30

भंडारा विभागात येणाऱ्या सहा आगारातून १ एप्रिल २०१६ ते ३१ मार्च २०१७ या वर्षात ११३ कोटी ३८ लाख ४८ हजार रूपयांचे उत्पन्न मिळाले.

S.T. 4.36 crore rupees in losses | एस.टी. ४.३६ कोटी रूपयांनी तोट्यात

एस.टी. ४.३६ कोटी रूपयांनी तोट्यात

भंडारा रापमं विभाग : टोलनाक्यावर ३.६७ कोटींचा खर्च, वार्षिक सवलत कॉर्डला ‘बाय-बाय’
देवानंद नंदेश्वर : भंडारा
भंडारा विभागात येणाऱ्या सहा आगारातून १ एप्रिल २०१६ ते ३१ मार्च २०१७ या वर्षात ११३ कोटी ३८ लाख ४८ हजार रूपयांचे उत्पन्न मिळाले. यात कर्मचाऱ्यांचे वेतन, बसेसची देखभाल, अवैध वाहतूक, डिझेल, टोलटॅक्स आदीवरील खर्च वगळता विभागाला ४ कोटी ३६ लाख ६२ हजार रूपयांचा तोटा झाला आहे. मागीलवर्षीच्या तुलनेत उत्पन्नामध्ये १ कोटी ९ लाख ९१ हजार रूपयांमध्ये घट झाली आहे.
राज्यातील प्रवाशांचा भार वाहणाऱ्या एसटीची संपूर्ण राज्यात आर्थिक परिस्थिती बिकट झाली आहे. यापासून भंडारा विभागदेखील सुटले नाही. भंडारा विभागात भंडारा व गोंदिया या दोन जिल्ह्याचा समावेश आहे. यात भंडारा, गोंदिया, साकोली, तुमसर, पवनी, तिरोडा असे मिळून भंडारा विभागात एकूण सहा आगार आहेत. या आगारांअंतर्गत ९ सेमी लक्झरी, ३० मिडी असे एकूण ४३७ बसेस आहेत.
भंडारा-साकोली, साकोली-लाखांदूर, साकोली-मोरगाव (अर्जूनी), तिरोडा-गोंदिया, गोंदिया-आमगाव, पवनी-लाखांदूर, भंडारा-तुमसर या मार्गावर अवैध प्रवासी वाहनामुळे महामंडाळाच्या उत्पन्नावर परिणाम होत आहे. दुसरीकडे दहा टक्के वार्षिक सवलत कॉर्ड योजनेलाही रापमंने ‘ बाय-बाय’ केला आहे.
भंडारा विभागाला एप्रिल २०१६ ते मार्च २०१७ या कालावधीत ११३ कोटी ३८ लाख रूपयांचे उत्पन्न प्राप्त झाले. यात भंडारा आगाराला २४ कोटी ८९ लाख, गोंदिया २४ कोटी ३९ लाख, साकोली २३ कोटी ९८ लाख, तिरोडा ११ कोटी ५२ लाख, तुमसर २० कोटी ०८ लाख, पवनी आगारात ८ कोटी ५१ लाख रूपयांचा समावेश आहे. मागीलवर्षी भंडारा विभागाला ११४ कोटी ४८ लाखांचे उत्पन्न झाले होते. मागीलवर्षीच्या तुलनेत यावर्षी भंडारा विभागाला १ कोटी ९ लाख ९१ हजार रुपयांचे उत्पन्न कमी मिळाले आहे. उत्पन्नात घट झाली असली तरी टोलटॅक्सवर ३ कोटी ६७ लाख, यासह डिझेल वेतन,टायर व इतर खर्च वगळता भंडारा विभागाला ४ कोटी ३६ लाखाचा फटका बसला.
जिल्ह्यातील गाड्यांमध्ये ९ सेमी लक्झरी, ३० मिडी, मानवविकास मिशनच्या ९१ बसेससह ४३७ बसेसद्वारे वाहतूक नियमित सुरू आहे. भंडारा विभागाने अलिकडे लांब पल्ल्याच्या अनेक बसगाड्या सुरू केल्या आहेत. अनेक मार्गावर शटलसेवा तसेच उन्हाळ्यात प्रवाशांची वर्दळ लक्षात घेता ज्यादा बसेस सोडण्यात येत आहेत. भंडारा विभागाला अनेक वर्षापासून तोटा सहन करावा लागत आहे. एस टी नफ्यात येण्यासाठी योग्य उपाययोजनेची गरज आहे.

बसस्थानकाच्या २०० मीटर परिसरात पार्किंग न करण्याचा नियम आहे. मात्र अवैध वाहतूकदार या नियमांचे उल्लंघन करीत आहेत. पोलीस व आरटीओ विभागाकडून कारवाई होणे अपेक्षित आहे. त्यांच्याकडून प्रयत्न होत नसल्यामुळे महामंडळाला तोटा सहन करावा लागत आहे.
- गजानन नागुलवार,
विभागीय नियंत्रक (प्रभार) तथा यंत्र अभियंता, भंडारा

Web Title: S.T. 4.36 crore rupees in losses

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.