Soybean: Guaranteed price of Rs. 3880 | सोयाबीन : हमीभाव रु ३८८०

सोयाबीन : हमीभाव रु ३८८०

ठळक मुद्देऑनलाईन नोंदणीला झाली सुरुवात : १५ ऑक्टोबरपासून खरेदी

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : चालू हंगामातील किमान आधारभूत किंमत योजनेंतर्गत हमीभावाने सोयाबीन खरेदीसाठीची ऑनलाईन नोंदणी १ ऑक्टोबरपासून सुरू झाली आहे. सोयाबीन खरेदीची सुरुवात १५ ऑक्टोबरपासून होणार आहे. त्यादृष्टीने जिल्ह्यातील अधिकाधिक सोयाबीन उत्पादकांची नोंदणी होण्यासाठी सर्वंकष प्रयत्न करावे आणि खरेदी प्रक्रियेच्या दृष्टीने केंद्रावर परिपूर्ण नियोजन व व्यवस्था करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
केंद्र शासनाने सोयाबीनसाठी हमीभाव प्रतिक्विंटल ३ हजार ८८० रुपये असा जाहीर केला आहे. चालू हंगामात सोयाबीनची आवक बाजारात सुरू झाली आहे. बाजारभाव हमीभावापेक्षा कमी असल्याने शेतकऱ्यांचे नुकसान होऊ नये, यासाठी खरेदी केंद्रे लवकरच सुरू करण्यात येणार आहेत. कोरोनाकाळ लक्षात घेऊन दक्षतेच्या दृष्टीने खरेदी केंद्रांवर होणारी गर्दी टाळण्यासाठी गुरुवारपासून ऑनलाईन नोंदणी प्रक्रिया सुरू करण्यात आली असल्याचे पणन अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

मूग व उडीद खरेदीसाठी नोंदणी प्रक्रिया सुरू झाली आहे. प्रत्यक्ष खरेदीलाही सुरुवात करण्यात येत आहे. जिल्ह्यात राज्य पणन महासंघाची धारणी, चांदूर रेल्वे, तिवसा व दर्यापूर येथे आणि विदर्भ मार्केटिंग सोसायटीची वरूड, अमरावती, चांदूर बाजार, मोर्शी, अंजनगाव, धामणगाव रेल्वे येथे केंद्र्रे आहेत.
- कल्पना धोपे, पणन अधिकारी

ऑनलाईन नोंदणीसाठी हे आवश्यक
ऑनलाईन नोंदणीसाठी आधार कार्ड, सातबारा उतारा, पीकपेरा, बँक पासबूक आदी आवश्यक आहे. नोंदणी झालेल्या शेतकऱ्यांना नोंदणीच्या क्रमवारीनुसार सोयाबीन खरेदी केंद्रावर आणण्यासाठी एसएमएसद्वारे कळविण्यात येईल. ज्या केंद्रावर नोंदणी केली आहे त्याच केंद्रावर एसएमएस आल्यानंतरच शेतकऱ्यांनी शेतमाल घेऊन यावा. सर्व खरेदी ऑनलाईन पद्धतीने होणार आहे. शेतकऱ्यांनी आपआपल्या तालुक्यातील किंवा जवळच्या खरेदी केंद्रावर नोंदणी करावी. नोंदणीकरिता आधार कार्डची छायांकित प्रत आणि पिकाची नोंद असलेला सातबारा उतारा सादर करावा. शेतकरी बांधवांनी आपला मोबाईल क्रमांक खरेदी केंद्रावर नोंदवावा.

Web Title: Soybean: Guaranteed price of Rs. 3880

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.