भंडारात अतिवृष्टी होताच सखल भागात साचते पाणी, उपाय योजनांकडे कानाडोळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2021 05:00 IST2021-07-29T05:00:00+5:302021-07-29T05:00:17+5:30
पूर परिस्थितीवर मात करण्यासाठी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अंतर्गत उपाययोजना करण्यात येतात. यावर्षी जिल्हा प्रशासनाने पूर परिस्थितीवर नियंत्रण मिळविण्यासाठी सुक्ष्म नियाेजन केले आहे. यासाठी जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठित करून सर्व घटक सदस्यांना त्यांच्या कार्याची माहितीही आधिच देण्यात आली आहे. यापुर्वीच्या बाबतीत मात्र कधीही असे सुक्ष्म नियोजन झाले नाही. तेव्हाही निधीचा वाणवा कायम होता.

भंडारात अतिवृष्टी होताच सखल भागात साचते पाणी, उपाय योजनांकडे कानाडोळा
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : शहरात अतिवृष्टी केवळ वैनगंगा नदीला पूर आल्यास सखल भागात पाणी शिरते. वेळप्रसंगी अनेक कुटुंबांना सुरक्षितस्थळी हलविले जाते. यात विशेषत: ग्रामसेवक कॉलनी, काजीनगर, न्यु गौतमबुद्ध वॉर्ड, प्रगती कॉलनी परिसर, भोजापूर आदी भागांचा समावेश असतो. ऑगस्ट २०२० आलेल्या महापुराने अनेक कुटुंबांना झळ बसविली होती. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने यावर्षी अतिवृष्टी किंंवा पुराने कुणी बाधित झाल्यास याबाबत पूर्ण तयारी केली असल्याचे दिसून येते.
शहरातील पाणी साचणारी ठिकाणे
- शहरात अनेक ठिकाणी पाणी साचत असते. शहरात कोणत्याही प्रमाणात नागरी वस्तीचे नियोजन नसल्याने ही समस्या उद्भवत आहे. जिल्ह्यातून राष्ट्रीय महामार्ग गेल्याने हा भाग उंच स्वरूपात आहे. तर शहराच्या सभोवतालचा परिसर खोलगट असल्याने विशेषत: ग्रामसेवक कॉलनी, भोजापूर, बेला, नागपूर नाका, टाकळी भागात मोठ्या प्रमाणात पाणी साचत असते.
निधीचा वाणवा कायम
- पूर परिस्थितीवर मात करण्यासाठी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अंतर्गत उपाययोजना करण्यात येतात. यावर्षी जिल्हा प्रशासनाने पूर परिस्थितीवर नियंत्रण मिळविण्यासाठी सुक्ष्म नियाेजन केले आहे. यासाठी जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठित करून सर्व घटक सदस्यांना त्यांच्या कार्याची माहितीही आधिच देण्यात आली आहे. यापुर्वीच्या बाबतीत मात्र कधीही असे सुक्ष्म नियोजन झाले नाही. तेव्हाही निधीचा वाणवा कायम होता. यावेळी जिल्हा प्रशासनाने आपत्ती व्यवस्थापन अंतर्गत निधीची तरतूद केल्याचे समजते. मात्र अजुनपर्यंत पूर परिस्थिती उदभवलेली नाही.
जिल्हा प्रशासनाचे सुक्ष्म नियोजन
अन्य जिल्ह्यातून किंवा राज्यातून धरणाचे पाणी सोडण्यासंदर्भात त्या पातळीवर नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आले आहे. परिणामी वेळोवेळी तंतोतंत माहिती उपलब्ध होत असल्याने जिल्हा प्रशासन नदीकाठावरील गावांना वेळीच सतर्क करीत असते. याशिवाय जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाच्यावतीने पथकही सज्ज ठेवण्यात आले आहे.
पाऊस नको नको सा.....
गतवर्षीच्या महापुरात होत्याचे नव्हते झाले. अनेक साहित्य वाहून गेले. मात्र हव्या त्याप्रमाणात मदत दिली गेली नाही. आजही भोजापूर व आनंदनगरातील कुटुंब महापुराच्या तडाख्यापासून पूर्णत: सावरले नाहीत. प्रशासनाने लक्ष देण्याची गरज आहे.
- अशोक उके
महापुरात अनेक कुटुंबांना तडाखा बसला. यावेळेही योग्य नियोजन झाले नाही तर सखल भागात पाणी शिरून नुकसान होवू शकते. वेळप्रसंगीत कुटुंबांना सुरक्षितस्थळी हलविणे व साहित्यांची राखण झाल्यास त्यांना तेवढी मदत होईल.
- शाहिद शेख
पाणी साचण्याची कारणे
वैनगंगा नदीत संजय सरोवर, कालीसराड, पुजारीटोला धरणाचे पाणी सोडल्याने नदीला पूर येतो. या पुराचे पाणी शहरात बॅक वॉटर पद्धतीने शहरात शिरते. यातील बहुतांश भाग सखल स्वरूपात आहे.
शहराला पुराच्या बॅकवॉटर पासून सुरक्षित ठेवण्यासाठी सुरक्षा भिंतीचे बांधकाम अद्यापही अर्धवट स्थितीत आहे. त्यामुळेही सखल भागात पाणी मोठ्या प्रमाणात साचत असते.