घनकचरा व्यवस्थापनेचे धिंडवडे

By Admin | Updated: July 20, 2016 00:23 IST2016-07-20T00:23:05+5:302016-07-20T00:23:05+5:30

‘‘पाऊस आणि पुरूष केव्हा येईल, याचा नेम नाही’’, असे नेहमी बोलल्या जाते. अशीच स्थिती शहरातील घनकचरा व्यवस्थापन संदर्भात झाली आहे

Solid waste management | घनकचरा व्यवस्थापनेचे धिंडवडे

घनकचरा व्यवस्थापनेचे धिंडवडे

नागरिक बोलेना- पालिका ऐकेना : ऐन पावसाळ्यात आजाराला आमंत्रण
इंद्रपाल कटकवार भंडारा
‘‘पाऊस आणि पुरूष केव्हा येईल, याचा नेम नाही’’, असे नेहमी बोलल्या जाते. अशीच स्थिती शहरातील घनकचरा व्यवस्थापन संदर्भात झाली आहे. स्वच्छ व सुंदर प्रशासनांतर्गत शहराचे सौंदर्य अबाधित कसे राखता येईल, हे न सांगण्यासारखे आहे. अस्वच्छतेबाबत नागरिकांनी गप्प राहणे अन् पाहुनही न दिसल्याची पालिका प्रशासनाची भूमिका घनकचरा व्यवस्थापनेचे धिंडवडे काढायला पुरेशी आहे.
दीड लाख लोकसंख्या असलेल्या भंडारा शहरात पालिका प्रशासनाच्या स्वच्छता विभागाचे नियोजन कोलमडल्याचे दिसते. पाठ करून गेल्यावर नागरिक पटकन कंटेनरच्या बाहेर कचरा फेकतात. स्वच्छता राखण्याची जबाबदारी तथा मानसिकता कुणाची नाही, हे दिसत असले तरी त्याच क्षमतेने पालिका प्रशासानाला दोष दिला जातो. पालिकेच्या नियोजनाला उदासिन भंडारेकरांचा प्रतिसाद अल्प असतो, असे पालिका प्रशासनाचे म्हणने आहे. होय, पण हे सत्य असले तरी नागरिकांचे सहकार्य नसले तर कुठलिही योजना यशस्वी होत नाही. परंतु पालिका पदाधिकाऱ्यांची जबाबदारी संपली असे होत नाही. दमदार नियोजन तथा नागरिकांची मानसिकता बदलण्याची तयारी घेऊनच जनतेसमोर येण्याचे धाडस केले पाहिजे.
झाडूपासून ते घंटागाडीपर्यंत वेगवेगळे नियोजन आखून अस्वच्छतेवर मात करण्याचा प्रयत्न करण्यात आला. अर्थात, यासाठी हमखासपणे नागरिकांचे सहकार्य सर्वतोपरी ठरते. घंटागाडीवाला दहा रूपयांऐवजी १५ ते २० रूपये लोकांना मागतो, असे बोलून रस्त्याच्या कडेला कचरा फेकून नागरिक मोकळे होतात. परंतु उघड्यावरील या समस्येमुळे संभाव्य आजाराचा धोका तुमच्याच कुंटुबासाठी धोकादायक ठरू शकतो, ही बाब समजण्यापलिकडे आहे.
शहरातील जुन्या प्रभाग रचनेनुसार आठ प्रभागांतर्गत घनकचरा व्यवस्थापनेची काय स्थिती आहे, ही बाब भंडारेकरांसाठी नवीन नाही. परंतु आरोग्याचा विषयावर पेटून उठण्याची जबाबदारी कोण स्वीकारणार, हा प्रश्न नागरिकांना घरीच बसवून ठेवतो. पालिका काही तरी उपाययोजना करेल, याच आशेवर नागरिक बोलत नाही.
दुसरीकडे पालिका प्रशासनातील पदाधिकारी व अधिकाऱ्यांना अस्वच्छतेची स्थिती दिसुनही ब्र काढत नाही, हे भंडाराचे दुर्देव म्हणावे लागेल. लक्षावधी रूपयांचा खर्च होऊनही तोंडावर रूमाल घेऊन रहदारी करण्याची वेळ भंडारेकरांवर आली असेल तर सुयोग्य प्रशासनाचे हे सर्वोत्तम उदाहरण ठरेल. ‘नागरिक हो...जागृत व्हा’ असे बोलण्याची वेळ ओढवून घेऊ नका, असेच शेवटी म्हणावे लागेल.

नगर परिषद अधिनियम कलम १९६५ तथा अधिनियम २००४ नुसार संपूर्ण स्वच्छता व पर्यावरण संरक्षणाची जबाबदारी पालिका प्रशासनाची आहे. नागरिकांना सुविधा उपलब्ध करून देणे हे पालिका प्रशासनाचे कर्तव्य आहे. वेळोवेळी यावर विशेष सभा बोलाविण्याची मागणी केली, परंतु सभा घेण्यात आली नाही. आरोग्याशी निगडीत असलेल्या मुद्यावर पालिका प्रशासन गंभीर नाही. दूषित पाणी पुरवठ्यातही नागरिकांचे हाल होत आहे. लक्षावधी खर्चुनही शहरात घनकचरा व्यवस्थापनेचे धिंडवडे निघाले आहे.
-हिवराज उके, नगरसेवक, भंडारा

Web Title: Solid waste management

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.