..तर पुन्हा जलसमाधी, गोसेखुर्द प्रकल्पग्रस्त भूमिकेवर ठाम
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 13, 2025 16:09 IST2025-12-13T16:08:24+5:302025-12-13T16:09:17+5:30
निर्वाणीचा इशारा : नागपुरातील आजच्या बैठकीनंतर निर्णय घेणार

..so again Jalsamadhi, Gosekhurd project victims stand firm on their position
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : प्रशासनाने तोडगा काढून शनिवारी (दि. १३) महसूलमंत्री आणि जलसंपदामंत्र्यांशी बैठक घडवून देण्याचा शब्द दिला. त्यामुळे जलसमाधी आंदोलन तूर्तास एक दिवसासाठी पुढे ढकलण्याचा निर्णय गोसे खुर्द प्रकल्पग्रस्त आंदोलकांनी जाहीर केला. मंत्र्यांसोबतच्या बैठकीत योग्य तोडगा निघाला नाही तर, शनिवारी पुन्हा हे आंदोलन केले जाईल, असा निर्वाणीचा इशारा आंदोलकांनी दिला आहे.
गोसेखुर्द प्रकल्पग्रस्तांनी २८ मागण्यांसाठी शुक्रवारी, १२ डिसेंबरला वैनगंगा नदीच्या काठावरील कारधा गावाजवळ दुपारी १२ वाजल्यापासून जलसमाधी आंदोलन सुरू केले होते. यात कारधा, करजखेडा, खमारी, सुरेवाडा, सुरबोडी यांसह अन्य गावांमधील सुमारे ५०० प्रकल्पग्रस्त सहभागी झाले होते.
हे आंदोलन टाळण्यासाठी प्रशासनाने मध्यस्थी करून शुक्रवारी सकाळी १० वाजता महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या कोराडी येथील निवासस्थानी प्रकल्पग्रस्तांच्या शिष्टमंडळासोबत बैठक घडवून आणली. यात मंत्र्यांनी शुक्रवारी बैठक लावण्याचे आश्वासन दिले. मात्र पत्रात केवळ कोकण आणि अमरावती प्रकल्पग्रस्तांच्या चर्चेचाच उल्लेख होता. त्यामुळे हे शिष्टमंडळ नागपूरहून परतल्यावर आंदोलकांचा संताप वाढला.
आज विधानभवनात दोन मंत्र्यांसोबत होणार बैठक
दरम्यान, दुपारी ३:३० वाजता जिल्हा पुनर्वसन आधिकारी लीना फलके यांनी आंदोलनकर्त्यांची भेट घेऊन चर्चा केली. मंत्र्यांशीही भ्रमणध्वनीवरून संपर्क साधला. त्यानंतर, शुक्रवारी दुपारी ३:०० वाजता विधानभवनात दालन क्रमांक १०३ मध्ये प्रकल्पग्रस्तांच्या कोअर कमिटीसोबत चर्चा करण्याचे लेखी आश्वासन मिळाले.
यात महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि जलसंपदामंत्री गिरीश महाजन उपस्थित राहतील, असेही कळविण्यात आले. त्यामुळे शुक्रवारचे आंदोलन तात्पुरते स्थगित करीत असल्याचे आंदोलकांच्या नेत्यांनी जाहीर केले. शनिवारच्या बैठकीत योग्य निर्णय झाला नाही तर, दुपारनंतर जलसमाधी घेऊ, असा इशाराही देण्यात आला.
पोलिस आणि प्रशासनावर ताण
शुक्रवारी दिवसभर पोलिस आणि जिल्हा प्रशासनावर ताण कायम होता. मोठ्या संख्येने पोलिसांचा बंदोबस्त लावण्यात आला होता.
'सीआरपीएफ'चे जवानही दिवसभर तैनात होते. नदीकाठावर दोरखंड बांधून अडथळा घालण्यात आला होता. बचावासाठी बोटी आणि पट्टीच्या पोहणाऱ्यांनाही प्रशासनाने सज्ज ठेवले होते. आपत्ती निवारण कक्षाचे पथकही दिवसभर परिस्थितीवर लक्ष ठेवून होते.
आज दिवसभर प्रकल्पग्रस्त देणार ठिय्या
दरम्यान, शनिवारी सकाळी ११ वाजल्यापासून कारधा नदीच्या काठावर आंदोलक दिवसभर ठिय्या देणार आहेत. नागपुरातील बैठकीत योग्य तोडगा निघाला नाही तर जलसमाधी घेऊ, असा निर्वाणीचा इशारा आंदोलकांनी दिला आहे.
...अन् पोलिसांची तारांबळ
आंदोलनादरम्यान महिलांनी तीन वेळा नदीपात्राकडे धाव घेतली. यामुळे पोलिसांची आणि यंत्रणेची मोठी धावाधाव उडाली. त्यांची समजूत घालून परिस्थिती शांत केली.
मात्र पुन्हा कारधा गावातील एक महिला कपडे धुण्यासाठी आली. तिने पोलिसांना न जुमानता पात्रात उतरून कपडे धुतलेच. ती परत जाईपर्यंत पोलिसांचा जीव टांगणीला लागला होता.