सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान सुरूच
By Admin | Updated: July 21, 2014 00:02 IST2014-07-21T00:02:22+5:302014-07-21T00:02:22+5:30
सार्वजनिक ठिकाणी थुंकण्यावर आणि धूम्रपानावर प्रतिबंध आहे. तरी सार्वजनिक ठिकाणी थुंकण्याचे आणि धूम्रपान करण्याचे प्रमाण कमी झाले नाही. तथापि प्राणघातक आजाराची लागण होवू नये,

सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान सुरूच
राजू बांते - मोहाडी
सार्वजनिक ठिकाणी थुंकण्यावर आणि धूम्रपानावर प्रतिबंध आहे. तरी सार्वजनिक ठिकाणी थुंकण्याचे आणि धूम्रपान करण्याचे प्रमाण कमी झाले नाही. तथापि प्राणघातक आजाराची लागण होवू नये, यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागाच्या अधिनस्थ सर्व संस्थांमध्ये थुंकण्यास मनाई करण्यात यावी तसेच कलम ११६ ची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यात यावी, असे शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने १६ जुलै रोजी परिपत्रक जारी केला आहे.
केंद्र शासनाच्या सिगारेट आणि अन्य तंबाखूजन्य उत्पादने कायदा २०३ च्या कलम ४ मधील तरतूदीनुसार सार्वजनिक ठिकाणी धूम्रपानावर प्रतिबंध करण्यात आला आहे. १८ जुलै २०१३ अनुसार लोकांच्या आरोग्य हितासाठी स्वादिष्ट सुगंधित तंबाखू, स्वादिष्ट सुगंधित सुपारी यांची निर्मिती, साठवण, वितरण किंवा विक्री करण्यास प्रतिबंध करण्याची अधिसूचना काढण्यात आली. तसेच मुंबई पोलीस अधिनियम १९५१ च्या कलम ११६ मधील तरतुदीनुसार सार्वजनिक ठिकाणी थुंकण्यावर व धूम्रपानावर प्रतिबंध करण्यात आला आहे.
अधिनियमान्वये प्रतिबंध असला तरी व दंडात्मक कारवाई होत असली तरी राजरोसपणे अधिनियम तुडविला जात आहे. थुंकण्यामुळे सार्वजनिक मालमत्ता विद्रूप होते. शिवाय क्षयरोग, स्वाईन फ्लू, न्युमोनिया यासारख्या आजाराचा फैलावही थुंकीमार्फत होतो. राष्ट्रीय क्षयरोग नियंत्रण कार्यक्रम २०१२ च्या वार्षिक अहवालानुसार देशातील ३ दशलक्ष लोक क्षयरोगाने पीडित आहेत. त्यातील महाराष्ट्रात ७५ हजार ३१९ लोकांना क्षयरोगाचा आजार झाला आहे. या आजारामुळे महाराष्ट्रात ६ हजार ६९२ लोकांचे मृत्यू झाले. भारतात क्षयरोगामुळे मृत्युमुखी पडणाऱ्यांची संख्या ३ लक्ष आहे. हा सगळा प्रकार सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्यांमध्ये तंबाखू अथवा तंबाखूजन्य पदार्थ चघळल्यामुळे थुंकणाऱ्यांचे प्रमाण अधिक आहे.
मुंबई पोलीस अधिनियमनातील थुंकण्यावर प्रतिबंध कलमाची प्रभावी अंमलबजावणी झाल्यास तंबाखू आणि तंबाखूजन्य पदार्थाचे सेवन करणाऱ्यांचे प्रमाण निश्चितपणे कमी होणार आहे.