धूम्रपान बंदी कायदा धाब्यावर
By Admin | Updated: March 7, 2016 00:26 IST2016-03-07T00:26:39+5:302016-03-07T00:26:39+5:30
तंबाखूच्या किंवा तंबाखूजन्य पदार्थाच्या सेवनाने होणाऱ्या दुष्परिणामाची दखल घेऊन शासनाने २००८ पासून सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान बंदीचा निर्णय घेतला.

धूम्रपान बंदी कायदा धाब्यावर
भंडारा : तंबाखूच्या किंवा तंबाखूजन्य पदार्थाच्या सेवनाने होणाऱ्या दुष्परिणामाची दखल घेऊन शासनाने २००८ पासून सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान बंदीचा निर्णय घेतला. या निर्णयाला सात वर्षाचा काळ पूर्ण झाला. तरीही या कायद्याचे सर्रास उल्लंघन होत आहे.
सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान करताना आढळल्यास त्यांच्यावर कारवाई करण्याचे निर्देशित करण्यात आले. परंतु सात वर्षाचा कालावधी संपून या काळात सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान सुरूच आहे. हा कायदा केवळ कागदावरच राहिल्याचे दिसून येते. भंडारा बसस्थानकावर अनेकजण खुलेआमपणे बिडी, सिगारेट पिताना दिसतात.
त्यामुळे त्यांच्या आजूबाजूला असणाऱ्या जनतेला त्रास सहन करावा लागत आहे. इतकेच नव्हे यामुळे या परिसरात नियमित व्यवसाय करणाऱ्या दुकानदारांच्या आरोग्याला धूम्रपानाचे नाहक दुष्परिणाम भोगावे लागणार आहेत. परंतु प्रशासकीय यंत्रणेने या शासन निर्णयाच्या अंमलबजावणीकडे पूर्णत: दुर्लक्ष केल्याचे दिसून येत आहे.
कायद्यानुसार १८ वर्षाच्या खालील मुलाने तंबाखू किंवा तंबाखुजन्य पदार्थाची विक्री करण्यास मनाई आहे. परंतु पानटपरीवर बसून लहान मुले सर्रास तंबाखू व तंबाखुजन्य पदार्थांची विक्री करताना दिसत आहे. त्यामुळे अशा दुकानातून त्या मुलांचे समवयस्क मुले त्यांच्याकडून तंबाखुजन्य पदार्थ सहज मिळवितात. प्राथमिक शाळात शिकणाऱ्या लहान मुलामुलींचे आरोग्य धोक्यात आले आहे. त्यामुळे अन्न व प्रशासन विभागाने परिसरात तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थाच्या बंदीच्या निर्णयाची कठोर अंमलबजावणी करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
शाळकरी मुले-मुली, कामकरी महिला यांच्यासह नोकरशाहीतील कर्मचारी, शिक्षकांसह अनेकजण सार्वजनिक ठिकाणी तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थाचे सेवन करीत असल्याने त्यांचे जीवन धोक्यात आले आहे. राज्यात दरवर्षी सुमारे ८० हजार रुग्णांना तंबाखूमुळे कर्करोग होत असल्याचा वैद्यकीय अहवाल आहे.
सर्वेक्षणानुसार भारतात दररोज २,५०० व्यक्ती तंबाखूमुळे मृत्युमुखी पडतात. भंडारा जिल्ह्यात खर्रा या तंबाखुजन्य पदार्थाचे सेवन मोठ्या प्रमाणात असून त्यामुळे अनेकांना तोंडाचे आजारसुद्धा बळावत असल्याचे निदर्शनास येत आहे.
शाळा, महाविद्यालये आणि सरकारी कार्यालयाच्या १०० मीटर परिसरात तंबाखूजन्य पदार्थाच्या विक्रीवर बंदी घालण्यात आली असली तरी त्यांच्या दाराला लागूनच तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थाची विक्रीचे दुकाने थाटात उभे आहेत. शिक्षक, प्राध्यापक कार्यालयीन कर्मचारी खुलेआम सदर दुकानातून तंबाखूजन्य पदार्थ खरेदी करुन सेवन करीत आहेत. (नगर प्रतिनिधी)