सहा रुग्णांना नागपूरला हलविले

By Admin | Updated: August 23, 2014 23:47 IST2014-08-23T23:47:36+5:302014-08-23T23:47:36+5:30

पवनी तालुक्यातील सेंद्री (खुर्द) या हजार लोकवस्तीच्या गावात डेंग्यू आजाराने कहर केला आहे. गावात आठ दिवसांपासून तापाची लागण झाली असून सहा रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

Six patients were shifted to Nagpur | सहा रुग्णांना नागपूरला हलविले

सहा रुग्णांना नागपूरला हलविले

सेंद्री येथे डेंग्यूची साथ : वैद्यकीय पथक दाखल
कोंढा कोसरा : पवनी तालुक्यातील सेंद्री (खुर्द) या हजार लोकवस्तीच्या गावात डेंग्यू आजाराने कहर केला आहे. गावात आठ दिवसांपासून तापाची लागण झाली असून सहा रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
कोंढा प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत येत असलेल्या सेंद्री (खुर्द) गावात आठ दिवसांपासून तापाची साथ आहे. यामध्ये बालकांची संख्या जास्त आहे. वेदांत अमोल चिचमलकर (२), विलास नामदेव सुखदेवे (२८), नैतिक धीरेंद्र आंबेकर (१), पिंकू राजकुमार सुखदेवे (१०), राणी लक्ष्मण सुखदेवे (८), अनिल जाधव गायधने (४०) या रुग्णांना नागपूर येथे हलविण्यात आले आहे. त्यापैकी दोघांची प्रकृती धोक्याबाहेर आहे.
यासंदर्भात कोंढा येथील वैद्यकीय अधिकारी डॉ.प्रभाकर लेपसे यांना विचारले असता ते म्हणाले, सेंद्री खुर्द येथे वैद्यकीय पथकाद्वारे रुग्णांची तपासणी व उपचार केले जात आहे. सेंद्री येथील दोन रुग्णांमध्ये डेंग्यूची लक्षणे तर दोघांमध्ये विषमज्वराची लक्षणे आढळून आल्याचे ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.
दरम्यान सेंद्री (खुर्द) प्राथमिक शाळेतील विद्यार्थी, शिक्षक व उपसरपंच होमराज उपरीकर, पोलीस पाटील जगदीश गायधने, गणपत बनकर, शिक्षकांनी गावात रॅलीद्वारे जनजागृती केली. दुपारी १२ वाजता दरम्यान डेंग्यू व विषमज्वरच्या वाढत्या प्रमाणामुळे गावकरी भीतीत आहेत. गावात आरोग्याच्या सोयी उपलब्ध करण्याची मागणी उपसरपंच होमराज उपरीकर यांनी केली आहे.
करडी पालोरा : करडी : मोहाडी तालुक्याच्या शेवटच्या टोकावरील व कोका अभयारण्याशेजारी असलेल्या ढिवरवाडा गावात डेंग्यू सदृष्य आजाराची लागण झाली आहे. मागील ८ ते १० दिवसापासून नागरिक त्रस्त आहेत. आतापर्यंत सामान्य रुग्णालयातून ७ रुग्णांना सुटी देण्यात आली. मात्र दररोज नवीन रुग्ण रुग्णालयात भरती होत आहेत.
डेंग्यूसदृष्य आजाराने सध्या सामान्य रुग्णालयात अभिषेक यशवंत बेहलपाडे (६), श्रीकृष्ण वातू वनवे (३९), आशा यशवंत बेहलपाडे (२८) भरती असून आज सकाळी शुभम रमेश बिल्लोरे (१०), क्रिष्णा अशोक केवट (३), रजत अशोक केवट यांना भंडारा येथे उपचारासाठी नेण्यात आल्याची माहिती नागरिकांनी दिली. अनमोल अशोक रोटके (७) याला डेंग्यूची लागण झाल्याची पुष्टी झाल्याने त्याला सामान्य रुग्णलायातून नागपुरला हलविण्यात आले. गावातही मलेरिया, टायफाईट व जलजन्य आजाराने नागरिक त्रस्त आहेत. त्वरीत फॉगींग मशीनने फवारणी करण्याबरोबर आरोग्य शिबिर लावण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.
बोअरवेलच्या पाण्यात अळ्या
गावात विविध आजाराचा प्रकोप आहे. ग्रामपंचायतीने नाल्यांची साफसफाई केली. फिनाईल टाकला, गावातून शाळेच्या माध्यमातून प्रभातफेरी काढली. फॉगींग मशीनने धूर फवारणीसाठी आरोग्य विभागाला कळविण्यात आले अशी माहिती सरपंच संगीता वनवे, ग्रामसेवक एस.आर. धांडे यांनी दिली. गावातील एका बोअरवेल्सच्या पाण्यातून अळ्या निघत आहेत. जंतूनाशक औषधी टाकल्यानंतरही अळ्या निघणे बंद झाले नसल्याची माहिती ग्रामपंचायत सदस्य हनुवंत कनपटे यांनी ग्रामपंचायतमध्ये सर्वांसमोर दिली. ग्रामपंचायत हतबल असल्याचे सांगत असून नागरिक दुरुस्तीची व उपाययोजनेची मागणी करीत आहेत.
(लोकमत चमू)

Web Title: Six patients were shifted to Nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.