स्वावलंबनाचा वारसा अन् रोजगार देणारे सिरसोली गाव
By Admin | Updated: June 3, 2017 00:23 IST2017-06-03T00:23:57+5:302017-06-03T00:23:57+5:30
स्वावलंबन, श्रमप्रतिष्ठा व स्वयंरोजगार हे गुण वारसान मिळत आपसूक संस्कार होतात तेव्हा स्वत:ची अन् गावाच्याही समृद्धीत वाढ होते.

स्वावलंबनाचा वारसा अन् रोजगार देणारे सिरसोली गाव
लोकमत शुभ वर्तमान : महिन्याकाठी लाखोंची उलाढाल, लोकसहभागातून विकास, पाण्याची समृद्धी
राजू बांते। लोकमत न्यूज नेटवर्क
मोहाडी : स्वावलंबन, श्रमप्रतिष्ठा व स्वयंरोजगार हे गुण वारसान मिळत आपसूक संस्कार होतात तेव्हा स्वत:ची अन् गावाच्याही समृद्धीत वाढ होते. समृद्ध व स्वयंरोजगाराच्या भरवशावर महिन्याकाठी लाखो रूपयांची उलाढाल करत अनेकांच्या हाताला रोजगार मिळवून देणाऱ्या सिरसोली (कान्हळगाव) या गावाने स्वत:ची ओळख निर्माण केली आहे.
तरूणांच्या हातात सत्ता आल्यावर गावाचा कायापालट झाला. विकासकामे लोकसहभागातून करण्यात आलेल्या प्रगतीमुळे १०७४ लोकवस्तीचे सिरसोली (का.) हे गाव लौकिकास पात्र ठरले आहे. १७४ कुटुंबसंख्या असलेल्या या गावात प्राथमिक शिक्षणाची सोय आहे. परंपरागत व्यवसाय, श्रम करण्याची जिद्द, स्वावलंबन, उद्योगाच्या जोरावर ग्रामस्थांना जगण्यासाठी संघर्ष करावा लागत नाही. दहा ते बारा कुटुंब वगळता सर्वांच्या घरी शेती आहे.
४५ शेतकऱ्यांच्या शेतावर इनवेल बोअर आहेत. २५ विहिरी आहेत. समृद्ध सिंचनाच्या भरवशावर या गावाचे ४५ शेतकरी वर्षभर वांगे, चवळी, भेंडी, मिरची आदी भाजीपाला पिकाची लागवड करतात. उत्पादीत माल स्वत:च शहरात नेऊन विकतात. अनेकजण तुमसर, भंडारा, मोहाडी, आंधळगाव या मोठ्या बाजारात बसून स्वत: मालाची विक्री करतात. शेतीत धान, गहू आदी ही पिक घेतले जाते. शेतीला पुरक सिरसोली येथे दुग्ध व्यवसायही आहे. घर तिथे जनावर असा गाव आहे. त्या गावात तीन दूध संकलन केंद्र आहेत. सालई, उसर्रा, वडेगाव, सिरसोली, कान्हळगाव आदी गावातून सुरकन दमाहे, अंकुश दमाहे, गजानन दमाहे दुध संकलन करतात. महिन्याकाठी ३४ लाख रूपयाचा दुग्ध व्यवसाय होतो.
ग्रामविकास दुग्ध सहकारी संस्था आहे. पण थकीत पेमेंटच्या समस्येमुळे ती संस्था डबघाईस आली आहे. या गावात १५ शेतकरी उन्हाळी भाताचे पिक घेतात. कान्हळगाव, पिंपळगाव, सिरसोली, हरदोली या गावातील मजुरांना बारमाही रोजगार मिळवून देणारे गणेश मोहारे, अरुण कस्तुरे, प्रकाश कस्तुरे, सुरेश सव्वालाखे, अशोक कस्तुरे हे शेतकरी आहेत. या गावात लाल मिरची विक्रीचा व्यवसाय गोपी मुटकुरे, राजू मुटकुरे, आरिफ तेले, इस्माईल तेले करतात. या गावात कुक्कुटपालन, फर्निचर मार्ट, पोतीचे शिवणकाम करतात. शेती, दुग्ध, मिरची, भाजीपाला व्यवसायामुळे सिरसोली गाव संपन्न बनले आहे.
भौतिक सुविधावर उधळपट्टी करण्याची प्रवृत्ती या गावात नाही. तरुणांच्या हातात गावाची नाळ आहे. सरपंच कला कस्तुरे, उपसरपंच अंकुश दमाहे तसेच खलील छव्वारे, प्रताप लिल्हारे, अरुण कस्तुरे, रमेश बशिने, राजू बावणे, रुपेश फुलेकर, नरेश सव्वालाखे यांनी स्वबळावर सिरसोली हरदोली, मुरुम रस्ता, कब्रस्तानमधील सपाटीकरण व ओट्याचे काम, बौद्ध विहाराचे सपाटीकरण, मंदिराचे सौंदर्यीकरण, हरदोली रस्त्यावरचे प्रवेशद्वार, स्मशानभूमीतील पानवठा, एक हजार मीटर पाईप लाईन, नवीन टाकीला कंपाउंड, शंकराची मूर्ती, नाला आदी कामे श्रमदान व लोकसहभागातून करण्यात आले.
मुस्लिम, बौद्ध, हिंदूच्या स्मशानभूमीच्या अडचणी दूर करण्यात आले. वीज, रस्ते, सपाटीकरण, नमाज स्थळ सौंदर्यीकरण करण्यात आले.
या गावाचे वैशिष्टय म्हणजे अनेक दशकापासून असलेली दारुबंदी. यात गावाचे पहिले सरपंच मोगल नूरबेग संदल बेग व झिबल दमाहे यांचा वाटा मोठा आहे. १७४ कुटुंबापैकी ७८ कुटुंबांनी परमात्मा एक मानव धर्म स्वीकारला आहे. जयगोपाल दमाहे, पूंजाराम बंधाटे, आसाराम सव्वालाखे, सिरसोली गावचे प्रथम सेवक होते. आसाराम सव्वालाखे यांनी परिसरातील गावात परमात्मा एक मानव सेवेचे मार्गदर्शक व प्रचारक म्हणून काम केले. त्यानंतर नरेश सव्वालाखे मार्गदर्शक म्हणून कार्य करीत आहेत. गावात परमात्मा एक सेवक मंडळाच्या वतीने प्रार्थना स्थळावर सामूदायीक एकतेची ज्योत ५.३० सकाळी पेटविली जाते. सकाळी पहाटे उठून १३५ बालक प्रार्थना स्थळावर जमा होतात. यात त्यांना मानव धर्माची शिकवण व आईवडील व थोरांना नमस्काराची सवय रूजविले जातात. महिन्याच्या एक तारखेला प्रभातफेरी काढली जाते.
वर्षात जयंती पुण्यतिथी कोजागिरी, प्रगटदिन, सेवक संमेलन, हळदीकुंकू कार्यक्रम घेतले जातात. सिरसोली गावात अंधश्रद्धा, स्वच्छता अभियान, दारुबंदी व व्यसनमुक्तीचे धडे गिरविले जातात. प्रभाकर अजाबराव दमाहे हा युवक लग्नकार्य व इतर कार्यक्रमात कचऱ्याची सफाई करण्यासाठी पुढे येतो. त्याला ‘स्वच्छतादूत’ म्हणून ग्रामपंचायत कडून मानधन दिले जाते.
स्व.बळीराम कस्तुरे यांनी १० एकर शेती दान केली. ४० वर्षापूर्वी गावात स्वच्छतागृहाची योजना राबविली. आचार्य विनोबा भावे यांचे ते अनुयायी होते. संत गाडगेबाबा, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, सीताराम स्वामी या संतांच्या सोबत राहण्याचा त्यांना योग आला होता. भूदान चळवळीत त्यांनी काम केले. कृष्ण महर्षी डॉ.शिवाजी पटवर्धन स्मृती समाजसेवक पुरस्कार व वैनगंगा मानवता सेवा संघ पुरस्कार २००७ रोजी त्यांना देण्यात आला. आज या गावात उद्योग, व्यवसाय यामुळे गावात समृद्धी आली. गाव पाणी समृद्धही झाला आहे. पाण्याची टंचाई नाही. वीज, रस्ते, पाणी, स्वच्छता, खेळाचे मैदान, एमआरईजीएस मधून शेतीसाठी तयार झालेले पक्के रस्ते, यामुळे गावात विकासाची पताका झळकत आहे. तरुणांच्या कामामुळे २००७ ला निर्मल गावाचा पुरस्काराही प्राप्त या गावाने केला आहे.
कर्तृत्ववान महिलांची भरारी
दूध उत्पादक म्हणून सिरसोलीच्या महिला आघाडीवर आहेत. स्वत: गाई म्हशींचे दूध काढण्याचा कामही करतात. यात सीमा दमाहे,प्रमिला कस्तुरे, अर्चना दमाहे, देवकी लिल्हारे, मंगला गाढवे, शालू दमाहे, राजकुमार कस्तुरे, कुसुम बंधाटे, कलावती मते, रेखा गाढवे या कर्तृत्ववान महिलांचा समावेश आहे. सिरसोली कान्हळगाव या दोन गावाचे अंतर हाकेवर आहे. कान्हळगावात शनिवारी आठवडी बाजार भरतो. त्या बाजारात ९९ टक्के भाजीविक्रेते सिरसोलीचेच असतात. यात प्रामुख्याने भाजी विकणाऱ्या महिलाच अधिक दिसून येतात.